नव्या वर्षात वाजणार या नाटकांची तिसरी घंटा

दैनिक गोमन्तक
बुधवार, 30 डिसेंबर 2020

राजेश देशपांडे दिग्दर्शित आणि प्रिया बेर्डे निर्मित ‘लाखाची गोष्ट’ हे नवे विनोदी नाटक, ‘शांतेचं कार्ट चालू आहे’, ‘ह्याचं करायचं काय’ या नाटकांची प्रेक्षकांसाठी फेब्रुवारी महिन्यात तिसरी घंटा वाजणार आहे.

मुंबई: निर्मात्यांनी धाडस करून करोना काळात नाटय़सृष्टीवर पडलेला पडदा डिसेंबरअखेरीस बाजूला केला आहे. आता ‘पुन्हा नव्याने सुरुवात’चा जयघोष कितपत यशस्वी होईल याबाबत नाटय़परिवारात शंका व्यक्त केली जात असतानाच प्रेक्षकांनी दिलेला प्रचंड प्रतिसाद बघून अनेक निर्माते जोमाने तयारीला लागले आहेत. तेव्हा आता करोनामुळे थांबलेल्या आणि काही नवीन नाटय़कृतीची मेजवानी जानेवारी महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि आर्थिक गणिता बघून साशंक असलेल्या नाटय़सृष्टीने पुनरागमनाची नांदी करून प्रेक्षकांचा उत्साह वाढवला आहे. सध्याची परिस्थिती बघता  नाटक करणे ही जोखीम असल्याने काही मोजक्याच संस्थांनी पुढाकार घेतलेला दिसून येत आहे; परंतु गेल्या काही आठवडय़ांमध्ये प्रेक्षकांनी नाटकावर दाखविलेल्या विश्वासामुळे नाटय़विश्वात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान वर्षअखेरीस सुरू झालेले नाटय़विश्व नव्या वर्षांत गतिमान होण्याचे संकेत दिसत आहे. येत्या जानेवारीत साधारण पंधरा ते सोळा नाटकांचे प्रयोग होणार असून यात काही नवीन नाटकांचाही समावेश करण्यात आल्याचे  समजत आहे.

अभिनेते अशोक सराफ आणि निर्मिती सावंत यांचे ‘व्हॅक्यूम क्लीनर’  आणि अभिनेत्री वंदना गुप्ते, प्रतीक्षा लोणकर यांचं  ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’ या दोन नाटकांचे प्रयोग ९ आणि १० जानेवारीला मुंबई-पुण्यात होणार आहेत. यांचे ‘साखर खाल्लेला माणूस’ हे शुभांगी गोखले आणि प्रशांत दामले यांचं नाटक जानेवारीच्या दुसऱ्या आठवडय़ात, तर सुनील बर्वे यांचे ‘तिसरे बादशाह हम’ हा नाटक प्रयोग आणि मंगेश कदम यांचे ‘के दिल अभी भरा नही’ हे दोन प्रयोग जानेवारीच्या शेवटच्या आठवडय़ात येणार आहे. उमेश कामत यांचे ‘दादा एक गुड न्यूज आहे’ हे नाटकदेखील याच दरम्यान येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोबतच अद्वैत थिएटर्सचे ‘निम्मा शिम्मा राक्षस’, ‘अलबत्या-गलबत्या’, ‘आरण्यक’, ‘इब्लिस’, याही कलाकृती नविन वर्षात प्रयोगांसाठी सज्ज आहेत. भद्रकालीचे निर्माते प्रसाद कांबळी यांनी येत्या नवीन वर्षांत तीन नव्या कलाकृती घेऊन येत असल्याची घोषणा २२ डिसेंबरला केली आहे. तर ‘वस्त्रहरण’ आणि  ‘देवबाभळी’ या कलाकृतीही लवकरच प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे, असे कांबळी यांनी सांगितले. हल्लीच ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या संदीप पाठक यांच्या एकपात्री अभिनयाने गाजलेल्या नाटकाचा २७ डिसेंबरला पुण्यात प्रयोग झाला, पुढेही हा नाटकांचा दौरा सुरूच राहणार आहे. राजेश देशपांडे दिग्दर्शित आणि प्रिया बेर्डे निर्मित ‘लाखाची गोष्ट’ हे नवे विनोदी नाटक, ‘शांतेचं कार्ट चालू आहे’, ‘ह्याचं करायचं काय’ या नाटकांची प्रेक्षकांसाठी फेब्रुवारी महिन्यात तिसरी घंटा वाजणार आहे.

नव्या वर्षी वाजणार या नाटकांची तिसरी घंटा

 • एका लग्नाची पुढची गोष्ट 
 • आमने-सामने
 • यदा कदाचित
 • इशारो इशारो में
 • सही रे सही
 • संत तुकाराम
 • तू म्हणशील तसं
 • व्हॅक्यूम क्लीनर
 • साखर खाल्लेला माणूस
 • हरवलेल्या पत्त्यांचा बंगला 
 • दादा, एक गुड न्यूज आहे 
 • के दिल अभी भरा नहीं
 • आरण्यक
 • इब्लिस
 • निम्मा शिम्मा राक्षस
 • अलबत्या- गलबत्या

 

संबंधित बातम्या