हा तर केंद्राच्या धरसोड धोरणाचा परिणाम

हा तर केंद्राच्या धरसोड धोरणाचा परिणाम
Amol Kolhe

मुंबई

कोरोना महामारीचा सामना करताना केंद्राच्या धरसोड धोरणामुळे देशभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा लाखापर्यंत पोहचला आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
राज्यासह देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढण्यास केंद्र सरकारचे धरसोडीचे धोरण जबाबदार आहे. संसर्गजन्य संख्या 80 हजारपर्यंत गेल्यानंतर स्थलांतरित मजुरांना सोडण्यासाठी आपण रेल्वे सुरू केली. विमाने सुरू करत आहोत. ही धोरणातील उणीव नाही का, असा सवालही त्यांनी या वेळी केला. केंद्र सरकारकडून येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सुरुवातीपासूनच एकसूत्रता नाही, त्यात धरसोड वृत्ती दिसत आहे. दर दोन-अडीच दिवसांनी एक नवी सूचना येत होती. अशा वेळी अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांचा गोंधळ उडतो. महाराष्ट्राने लॉकडाऊनचा दुसरा टप्पा व्यवस्थित पार पाडला होता; मात्र देशपातळीवर नेमके काय झाले याविषयी संभ्रम आहे, असेही ते म्हणाले. अर्थव्यवस्थेला चालना देण्याबाबत पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या घोषणेचे स्वागत आहे; मात्र ही सगळी परिस्थिती ज्यामुळे उद्‌भवली, त्या कोव्हिड- 19 बद्दल काय पावले उचललीत, याबद्दल एक शब्दही त्यांनी आपल्या भाषणात काढला नाही असेही ते म्हणाले.

आपण नेमके कोणाला फसवतोय?
कोरोना चाचणीच्या संख्येवरूनही कोल्हे यांनी नाराजी व्यक्त केली. इतर देशांत चाचण्यांची संख्या मोठी आहे. आपल्याकडे केवळ 500 ते 600 चाचण्या होत आहेत. मग आपण नेमके कोणाला फसवतो आहोत. जगाला की स्वत:ला? कोव्हिडवर नियंत्रण मिळवल्याचे जगाला दाखवण्याच्या नादात आपण कमी चाचण्यांची चूक तर करत नाही ना, असा प्रश्‍नही कोल्हे यांनी या वेळी उपस्थित केला.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com