इफ्फी 2021 : स्वतःच्या मर्जीने जगा ! मेहरुन्निसाने स्त्रियांना दिला संदेश

सुहासिनी प्रभुगावकर
गुरुवार, 21 जानेवारी 2021

इफ्फीत दाखवल्या जाणाऱ्या मेहरुन्निसा या सिनेमाची चर्चा उद्‍घाटनाआधीच सुरू झाली होती. 

पणजी :  दुसऱ्यांनी सांगितलेले ऐकू नकोस, पुरुषसत्ताक पद्धतीला बळी पडू नकोस, स्वतःच्या मर्जीने जीवन जग, असा संदेश इफ्फीच्या मंचावरून भारतीय स्त्रियांना आज मेहरून्निसाने दिला. इफ्फीत दाखवल्या जाणाऱ्या मेहरुन्निसा या सिनेमाची चर्चा उद्‍घाटनाआधीच सुरू झाली होती. 

त्रोटक असे कथानक मार्गदर्शिकेत सांगितल्यामुळे उत्सुकता सिनेप्रेमींना होती. त्यामुळे कला अकादमीतील थिएटरवर मेहरुन्निसा सिनेमाला संध्याकाळी गर्दीही होती. सिनेमाचे दिग्दर्शक, निर्माते, कलाकारांच्या हजेरीत मेहरुन्निसा थिएटरमध्ये अवतरली आणि स्त्री पुरुषांच्या जोरदार टाळ्या घेऊन गेली. 

मनाला चटका लावून गेलेल्या सुशांतसिंग राजपूतचा आज वाढदिवस

नवाबी थाटात, नवाबी परंपरेत राहणारी बडी अम्मी नवाब पतीच्या निधनानंतर विवाहानंतर आपल्या चुराडा झालेल्या स्वप्नांचा पाठपुरावा करते. विवाहानंतर अभिनेत्रींना स्वतःच्या आवडी-निवडी जोपासता येत नाहीत, तसेच ज्येष्ठ झाल्यावर तिला बॉलिवूडमध्ये कोणी विचारतं, कोणी विचारत नाहीत, तिच्या वाट्याला दुय्यम भूमिका येतात, ज्येष्ठ पुरुष मात्र हिरोच राहातात. 21 व्या शतकातही पुरुषसत्ताक पद्धती भारतात आहे, असे ती रोखठोकपणे एका मुलाखतीत सांगते.

स्त्रियांनी स्वतःला हवे, तसे जगावे, या तिने केलेल्या आवाहनाला स्त्रियाच नव्हे, पुरुषही दाद देतात. ज्येष्ठत्वाकडे झुकूनही खणखणीत आवाजात बोलणारी ‘बडी अम्मी’ त्या मुलाखतीतून सर्वांना आपल्या पायाशी आणते. 1857 मधील लढ्यात महिला आघाडीवर होत्या. हा इतिहास असून त्या कथानकानुसार वास्तव समाजापर्यंत सिनेमातून पोहोचवण्यासाठी अम्मीची नात आलिया तिला मदत करते. 

आलियाचे कथानक निर्मात्यापर्यंत पोहोचावे, म्हणून त्याच्या गाडीसमोर आडवे येणारी अम्मी, नातीसोबत मद्याचे घुटके घेणारी, सिगाराचा झुरका घेणारी व तिला तिच्या आवडी जपण्याचा, वागण्याचा सल्ला देणारी अम्मी आणि परंपरेच्या जोखडात अडकलेल्या मुलीशी संघर्ष करणारी अम्मी अशी मेहरुन्निसाची विविध रूपे सिनेमात पाहायला मिळतात.

संबंधित बातम्या