शरद केळकर...१५ मिनिटांसाठी आला अन् भाव खाऊन गेला

गोमंतक ऑनलाईन टीम
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

हे पात्र साकारताना शरद केळकरची संवाद फेक, अदाकारी अप्रतिम असून त्याला चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये का दाखवलं नाही अशी विचारणा आता प्रेक्षक सोशल मीडियावर करत आहेत.

मुंबई- काल अक्षय कुमारचा नवीन चित्रपट लक्ष्मी पडद्यावर आला. मात्र, या चित्रपटाने प्रेक्षकांना नाराज केल्याचेच चित्र दिसत होते. अक्षय कुमार याचा मोठा चाहता वर्ग असून त्याच्याकडून या चित्रपटात चांगल्या कामाची अपेक्षा होती. मात्र, त्याला फॅन्सच्या अपेक्षांची पूर्ती करण्यात यशस्वी होता आले नाही. उलट या चित्रपटात फक्त १५ मिनिटांपूरताच पडद्यावर झळकणारा अभिनेता शरद केळकर भाव खाऊन गेला. 

या चित्रपटात शरद केळकरने खऱ्या लक्ष्मीचे पात्र साकारले आहे. एका तृतीयपंथीयाचं पात्र शरदने जोरदार पेलले आहे. फक्त १५ मिनिटांसाठी पडद्यावर दिसणाऱ्या शरदने अक्षयलाही मागे टाकले आहे. या चित्रपटाला अनेक दुषणं लावण्यात येत आहेत. मात्र, शरदच्या अभिनयासाठी प्रेक्षक त्याचं भरूभरून कौतूकही करत आहेत. 

हे पात्र साकारताना शरद केळकरची संवाद फेक, अदाकारी अप्रतिम असून त्याला चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये का दाखवलं नाही अशी विचारणा आता प्रेक्षक सोशल मीडियावर करत आहेत. शरद या चित्रपटात एक सरप्राईज पात्र म्हणून समोर आला आहे. शरदला अजून थोडावेळ मिळाला असता तर तो चित्रपटात अक्षयवर भारी पडला असता अशी प्रेक्षकांमध्ये चर्चा आहे.

सोशल मीडियावर शरदच्या नावाची चांगलीच चर्चा असून त्याने साकारलेल्या पात्राचे फोटो प्रेक्षकांकडून व्हायरल करण्यात येत आहेत. एकीकडे संपूर्ण चित्रपटात अक्षय कुमार दिसत असताना फक्त १५ मिनिटांमध्ये आपले काम करून भाव खाऊन जाणारा शरद केळकर या मराठमोळ्या अभिनेत्याने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले यात शंका नाही.  
 

संबंधित बातम्या