लकी अली.. ओ सनम.. आणि गोवा..सोशल मीडियावर का होतंय व्हायरल? बघा व्हिडिओ ..

गोमंतक ऑनलाईन टीम
सोमवार, 14 डिसेंबर 2020

नफिसा अली सोधी या अभिनेत्रीने गोव्यातील एक व्हिडिओ इंस्टाग्रॅमवर शेअर केला आणि इंस्टासह सर्वच प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ अक्षरश: ट्रेंडिंग झाला.

पणजी- 'ओ सनम' 'गोरी तेरी अखियाँ' या गाण्यांनी भारतातीलच नव्हे तर जगभरातील प्रेक्षकांच्या स्मृतीत आणि आपसूक ओठांवर जागा मिळवली. 90च्या दशकात ही गाणी गावून संगीत रसिकांच्या मनावर राज्य करणारा एक गायक जगापासून कायम अलिप्त होता. मात्र, नफिसा अली सोधी या अभिनेत्रीने गोव्यातील एक व्हिडिओ इंस्टाग्रॅमवर शेअर केला आणि इंस्टासह सर्वच प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ अक्षरश: ट्रेंडिंग झाला. तो गायक म्हणजे अर्थातच लकी अली. हातात गिटार घेऊन गायला बसलेल्या लकी अली यांनी 'ओ सनम' म्हणत गाण्याला सुरूवात केल्यावर चाहते उधळले. या व्हिडिओच्या खाली नफिसा यांनी 'लकी अली अंरबोळमध्ये उत्सफूर्तपणे लाईव्ह आलाय. एका स्वप्नांच्या उद्यानात', असे कॅप्शन देत हा व्हिडिओ इंस्टाग्रॅमला पोस्ट केला आहे. यासाठी प्रेक्षकांनीही त्यांचे आभार मानले.

दरम्यान, हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर असंख्य लोकांनी हा व्हिडिओ शेअर केला. त्यानंतर चाहत्यांच्या कमेंट्सचा अक्षरक्ष: पाऊस पडत होता. यात एका युजरने म्हटले होते की, 'क्षणार्धात आठवणींचा पूरच डोळ्यांसमोर आला.' चेन्नई एक्सप्रेस सिनेमातील अभिनेता निकितन धीर याने कमेंट करताना म्हटले की,'ज्या चाहत्यांसमोर लकी अली गातोय ते अतिशय लकी आहेत.' एका अन्य चाहत्याने 'बाजूला बसलेले प्रेक्षक अतिशय लकी आहेत', असे म्हटले. एकाने म्हटले की, 'अनप्लग्ड कसं असावं, तर असं', अशा उत्स्फूर्त कमेंट्स केल्या आहेत.

संबंधित बातम्या