अभिनेत्री स्पृहा जोशी सांगत आहे तिच्या फॅशन स्टेटमेंटबद्दल...

अभिनेत्री स्पृहा जोशी सांगत आहे तिच्या फॅशन स्टेटमेंटबद्दल...
अभिनेत्री स्पृहा जोशी सांगत आहे तिच्या फॅशन स्टेटमेंटबद्दल

बालपणीच ‘दे धमाल’ मालिकेतून छोट्या पडद्यावर एन्ट्री केल्यानंतर अग्निहोत्र, एका लग्नाची दुसरी गोष्ट, एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारणारी अभिनेत्री स्पृहा जोशी. ‘उंच माझा झोका’ या मालिकेत साकारलेल्या रमाबाई रानडे यांच्या भूमिकेचं सर्वत्र विशेष कौतुक झालं. अनेक नाटकं आणि चित्रपटांतही काम केलं. सध्या तिच्या ऑनलाईन नेटक ‘मोगरा’ या नाटकाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अशी उत्कृष्ट गीतकार, अभिनेत्री, कवयित्री आणि सूत्रसंचालिका स्पृहा जोशी सांगत आहे तिच्या फॅशन स्टेटमेंटबद्दल...

आपण ज्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल असतो, त्या कपड्यांत आपण छान वावरतो. त्यामुळे मी नेहमीच कम्फर्टला प्राधान्य देते. मला शॉपिंग करायला आणि वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालायला आवडतं. इंडियन आणि वेस्टर्न अशा दोन्ही प्रकारचे कपडे घालायला आवडतात. मग त्यात जीन्स टॉप असोत, कुर्तीज असोत, वेगवेगळ्या प्रकारचे स्कर्टस्‌, वन पिसेस असोत या सगळ्या प्रकारचे कपडे घालणं मी तितकंच एन्जॉय करते. शॉपिंग करताना ब्रॅंडचा मी फार विचार करत नाही. त्यामुळे ब्रॅण्डेड गोष्टींचा मुद्दा आला की माझे स्टायलिस्ट जे कपडे मला देतात, ते मी आवडीने आणि प्रेमाने घालते.

मला पैठणी, कांजिवरमपासून ते चंदेरी अशा सगळ्या प्रकारच्या साड्या नेसायला आवडतात; पण एक आहे की, वजनाने जड असतील, अशा साड्या मला आवडत नाहीत. त्यामुळे कॉटन आणि लिनन मटेरिअलच्या साड्यांवर माझं विशेष प्रेम आहे. तसंच मला माझ्या आईने, आजीने किंवा सासूबाईंनी नेसलेल्या जुन्या साड्या नेसायला प्रचंड आवडतात. त्यात एक वेगळ्या प्रकारची ऊब असते.

‘उंच माझा झोका’ या मालिकेत रमाबाई रानडे यांची भूमिका साकारताना मला नऊवारी साडी नेसायची होती आणि ‘रंगबाज फिर से’ या वेब सिरीजमध्ये माझी राजस्थानी पद्धतीची वेशभूषा होती. या दोन्हीही प्रकारच्या वेशभूषांमध्ये मी छान कम्फर्टेबल होते. वेशभूषा ही तुम्हाला त्या व्यक्तिरेखेत शिरायला फार मदत करते, असा माझा स्वतःचा अनुभव आहे. मोगरा हे आमचं नेटक आम्ही आपापल्या घरून सादर करतो. तसं जरी असलं तरी त्यातल्या प्रत्येक व्यक्तिरेखेची मानसिकता, आपल्या आधी आणि आपल्या नंतर कोणी काय रंगाचे कपडे घातले आहेत, प्रत्येकाच्या घरातलं फर्निचर कसं आहे, या सगळ्याचा विचार करून आमची वेशभूषा ठरवली आहे आणि प्रत्येक प्रयोगात आम्ही ती एकच वेशभूषा फॉलो करतो.

मला माझा मेकअप छान करता येतो. कार्यक्रम किंवा कुठे इंटरव्ह्युजना जाताना मी स्वतः माझा मेकअप करते. फक्त स्क्रिनवर दिसण्यासाठी जो मेकअप केला जातो, त्याला एक वेगळं कौशल्य लागतं. तो एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. त्यामुळे मला आपल्या मेकअप आर्टिस्ट्‌सबद्दल खूप आदर आहे. ज्वेलरीच्या बाबतीत मी खूप पर्टिक्‍युलर आहे. मला वजनाने हलकी आणि नाजूक काम असलेली ज्वेलरी खूप आवडते. सोन्याचे दागिने घालण्याकडे माझा फारसा कल नाहीये. त्याऐवजी मला चांदीची ज्वेलरी घालायला खूप आवडते. मी खूप कम्फर्टेबल फूटवेअरची चाहती आहे. माझी उंची कमी असल्यामुळे बऱ्याच वेळा मला हिल्स घालाव्या लागतात; पण फ्लॅट शूज, पटकन पायात चढवता येणारे फूटवेअर घालायला मला खूप आवडतात आणि रेग्युलर वापरातल्या माझ्या चपला या कायम फ्लॅटफूट असतात. शेवटी मी इतकंच सांगेन की, ज्या कपड्यांमध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल असे कपडे तुम्ही घाला. त्यामुळे आपोआप एक सहजता येते तुमच्या वागण्या-बोलण्यामध्ये तुम्ही घातलेल्या कपड्यांमुळे. छान दिसणं हे आलंच पण त्या पलीकडे जाऊन आपला कम्फर्ट खूप महत्त्वाचा आहे.

शब्दांकन : राजसी वैद्य

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com