बंदीश बॅन्डिट्‌स: नाट्य आणि सुरांची बहारदार मैफल

विशाखा टिकले-पंडित
सोमवार, 17 ऑगस्ट 2020

एक वेगळा विषय, त्याची उत्तम मांडणी, अप्रतिम अभिनय आणि जोडीला लाभलेली अद्‌भुत सुरांची बरसात अशा बहारदार मैफलीचा आनंद घ्यायचा तर अमेझॉन प्राईम व्हिडीओवरील ‘बंदीश बॅन्डिट्‌स’ ही वेबसीरिज आवर्जून पाहावी.

एक वेगळा विषय, त्याची उत्तम मांडणी, अप्रतिम अभिनय आणि जोडीला लाभलेली अद्‌भुत सुरांची बरसात अशा बहारदार मैफलीचा आनंद घ्यायचा तर अमेझॉन प्राईम व्हिडीओवरील ‘बंदीश बॅन्डिट्‌स’ ही वेबसीरिज आवर्जून पाहावी.

कथानकाला सुरुवात होते ती राठोड कुटुंबापासून. पंडित राधेमोहन राठोड, ज्यांनी आपले अख्खे आयुष्य राठोड घराण्याच्या गायकीला समर्पित केलेले असते. आपली दोन्ही मुले घराण्याचा संगीत वारसा पुढे चालवण्यास समर्थ नसल्याचे लक्षात आल्यावर पंडितजींसमोर एक आशेचा किरण असतो तो म्हणजे त्यांचा नातू राधे. पंडितजींकडून गंडा बांधून घेण्यासाठी राधे कितीही मेहनत घ्यायला तयार असतो. शास्त्रीय संगीताच्या आराधनेत रमलेल्या राधेच्या आयुष्यात तमन्नाचा प्रवेश होतो, तमन्ना ही पॉप संगीतातील लोकप्रिय गायिका असते. एका हिट गाण्याच्या शोधात असलेल्या तमन्नाला राधेच्या रूपात एक उत्तम जोडीदार लाभतो. पैशांच्या गरजेखातर राधे नाईलाजाने पॉप व्हिडीओचा पर्याय स्वीकारतो. एकीकडे शास्त्रीय संगीत आणि पॉप म्युझिकचा एकत्रित व्हिडीओ जबरदस्त हिट होतो, तर दुसरीकडे राधे आणि तमन्नामधील प्रेम फुलायला लागते. यातच कथेत प्रवेश होतो प्रसिद्ध गायक दिग्विजय याचा. दिग्विजय हा पंडितजींचा सगळ्यात मोठा मुलगा, त्याला आणि त्याच्या आईला एकटे सोडून पंडितजी दुसरे लग्न केलेले असते. दिग्विजयच्या येण्याने अनेक घडामोडी घडतात आणि शेवटी घोषणा होते एका जुगलबंदीची. या घोषणेनंतर कथा नेमके काय वळण घेते ते या मालिकेत मांडण्यात आले आहे.

या कथेतल्या मुख्य पात्रांच्या स्वतःच्या वेगवेगळ्या कथा आणि व्यथा आहेत. जगासमोर महान म्हणून गौरवली गेलेली व्यक्ती व्यक्तिगत आयुष्यात किती अहंकारी आणि कोत्या मनोवृत्तीची असू शकते, त्याचे उदाहरण पंडितजींचे आयुष्य दाखवते. नियमांच्या अतिरेकापायी खचलेल्या कुटुंबाची कथा यात दिसते. पालकांच्या अतिमहत्त्वाकांक्षेपायी आत्मविश्‍वास हरवलेल्या तमन्नाचे दुःख यात दिसते. शाश्‍वत कला की झटपट मिळणारे यश आणि पैसा या कात्रीत अडकलेली तरुणाई अशा अनेक विषयांना स्पर्श करत कथा पुढे सरकते. प्रत्येक भागात कथा नवीन वळण घेते. शेवटच्या काही भागात कथा एका वेगळ्या उंचीवर पोहोचते. राधेची आई मोहिनी त्याला संगीत समजून घेण्याबद्दल सांगते, त्याची तयारी करून घेते ते भाग अतिशय सुंदर पद्धतीने सादर करण्यात आले आहेत. जोधपूरच्या सौंदर्याची झलकही यात पाहायला मिळते. नसिरुद्दीन शहा यांनी पंडितजींची व्यक्तिरेखा अक्षरशः जिवंत केली आहे. काही भागांमध्ये केवळ देहबोलीतून त्यांनी अप्रतिम परिणाम साधला आहे. तीच गोष्ट दिग्विजय साकारणाऱ्या अतुल कुलकर्णी यांची, या दोन दिग्गज कलाकारांच्या सादरीकरणाला चांगली साथ मिळालीय ती मोहिनी साकारणाऱ्या शिबा चढ्ढा यांची.  शंकर-एहसान-लॉय या त्रिकुटाच्या संगीताने सजलेली ही मालिका सध्याच्या वेबविश्‍वात येणाऱ्या मोजक्‍या दर्जेदार कलाकृतींपैकी एक आहे.  

संबंधित बातम्या