कैद्यांचे विश्व उलगडणारा ‘द बिग हिट’ इफ्फीत हाऊसफुल

सुहासिनी प्रभूगांवकर
सोमवार, 18 जानेवारी 2021

तुरुंगातील कैद्यांच्या नाट्य शिबीरातून साकार झालेल्या नाटकातून यशस्वी एकपात्री कलाकृती कशी बनते, त्या नाट्याचे पैलू उलगडणारा ‘द बिग हिट’ फ्रेंच सिनेमा इफ्फीत भाव खाऊन गेला. 

पणजी :  तुरुंगातील कैद्यांच्या नाट्य शिबीरातून साकार झालेल्या नाटकातून यशस्वी एकपात्री कलाकृती कशी बनते, त्या नाट्याचे पैलू उलगडणारा ‘द बिग हिट’ फ्रेंच सिनेमा इफ्फीत भाव खाऊन गेला. इफ्फीतील कॅलिडोस्कोप विभागात मोजके चित्रपट दाखवण्यात येणार असून त्यांतील ‘द बिग हिट’ संध्याकाळी कला अकादमीतील दीनानाथ मंगेशकर थिएटरवर दाखवला गेला.

मास्क वापरणे, सामाजिक दूरी पाळणे या संहितेत इफ्फीतील सिनेमा अडकला आहे. थिएटरात एक आसन मोकळे सोडून बसावे लागते, त्यामुळे ५० टक्के सिनेरसिकांनाच सिनेमाचा लाभ घेता येतो. दिवसभरात जागतिक सिनेमालाच चांगली उपस्थिती लागलेली दिसली. ‘द बिग हिट’ हा फ्रेंच सिनेमा त्या तुलनेत हाऊसफुल्ल गेला. 

एतिन हा कलाकार काम नसल्यामुळे तुरुंगात नाट्यशिबीर घेतो. ‘वेटिंग फॉर गोदो’ हे नाट्य कैद्यांकडून साकार करून घेण्यासाठी त्याला सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागतो. कैद्यांची मानसिकता बदलणे, त्यांचे पाठांतर, तालमी घेणे सोपे नसते परंतु हळुहळू कैदी त्या नाट्यात शिरतात, यशस्वीरित्या नाट्य सादर केल्यानंतर पॅरिसमधील सर्वांत मोठ्या थिएटरात ज्यावेळी नाटकाचा प्रयोग व्हायचा असतो त्यादिवशी कैदी पळून गेल्यामुळे कैद्यांना कलाकार कसे घडवले त्याची कथाच अखेर दिग्दर्शक भावनावश होऊन प्रेक्षकांसमोर मांडतो त्यावेळी प्रेक्षक त्याला उभ्याने अभिवादन करतात, जोरदार टाळ्या त्याला मिळतात.

या टाळ्या माझ्या नव्हेत, तुमच्या आहेत, असे तो कैद्यांना सांगतो आणि एकपात्रीचे यशस्वी प्रयोग करतो, पुन्हा एकदा नाट्यात व्यस्त होतो. मध्यंतरी बरेच नाट्य घडते त्या नाट्याची कथा म्हणजेच ‘द बिग हिट’ सिनेमा आहे. थोडासा संथगतीने जाणारा पण नाट्यमय असा हा सिनेमा आहे. या सिनेमाला युरोपियन चित्रपट महोत्सवात पुरस्कारही मिळालेले आहेत.

तसंच,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थिएटरमध्ये मास्कसह, सामाजिक अंतराचे पालनही सक्तीचे करण्यात  आले असून, दर्शक सर्व नियमावलीचे पालन करून कलाकृतींचा आनंद लुटत आहेत. 

संबंधित बातम्या