अभिनेता आमीर खानच्या तुर्कस्तान दौऱ्यामुळे वाद

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

आमीरखान माझाही आवडता अभिनेता आहे. पण आमच्यासाठी देश सर्वांत प्रिय आहे. देशाच्या अस्मितेबाबत तुम्ही कोणतीही सूट मिळवू शकत नाही.- उमा भारती, भाजप नेत्या

नवी दिल्ली: लाल सिंग चढ्ढा या आगामी चित्रपटानिमित्त तुर्कस्तानला गेलेल्या अभिनेता आमीर खानचा दौरा वादात सापडला असून विश्‍व हिंदू परिषद व उमा भारतींसह अनेक नेत्यांनी आमीरवर टीकेची झोड उठवली आहे. जम्मू-काश्‍मीरचे कलम ३७० रद्द करणे आणि राममंदिराची निर्मिती या मुद्यांना तुर्कस्तानने विरोध केल्याने संघपरिवार संतप्त आहे.

दशकभरापूर्वी तारे जमी पर चित्रपटाबद्दल ज्या भाजप नेत्यांनी संसदीय दालनांत बोलावून कौतुकाचा वर्षाव केला होता त्याच आमीरचे भारतीय स्वातंत्र्यदिनीच तुर्कस्तानच्या अध्यक्षांच्या पत्नी एमीन एर्दोगन यांची भेट घेतल्याचे चित्र प्रसिद्ध होताच संतप्त प्रतिक्रिया उमटली. भारताच्या अंतर्गत विषयांत नाक खुपसणारा देश हा शत्रूराष्ट्रच आहे व अशा देशात जाऊन स्नेहभेटी घेणे कोणाही भारतीयाला शोभत नाही, अशी भूमिका संघ परिवाराने घेतली आहे.

विश्‍व हिंदू परिषदेचे प्रवक्ते विनोद बन्सल यांनी सांगितले की काही अभिनेते आर्थिक हितासाठी राष्ट्रीय हिताला तिलांजली देत आहेत. कोणी पाकिस्तानात जाऊन बाजवा याला गळामिठी मारतो तर कोणी तुर्कस्तानच्या अध्यक्षांच्या पत्नीच्या आशीर्वादासाठी  धडपडतो, हे दुःखद आहे. 

संबंधित बातम्या