परिवारांत सहकार्य हवेच!

श्याम अ. गावकर
मंगळवार, 25 ऑगस्ट 2020

आपल्या घरातील व्यक्तीची धडपड, ही त्याच्या स्वार्थासाठी नसून सर्वांच्या सुखासाठी असते. हे लक्षात घेऊन त्याला मदत करण्याची जबाबदारी घरातील इतरांनी उचलण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असते. नात्यातील जिवंतपणा अबाधित ठेवण्यासाठी जीव तोडून काम करणाऱ्यांना समजून घेऊन त्याच्यावर टीका करण्याऐवजी त्याला त्याच्या कामामध्ये प्रोत्साहित केले पाहिजे. त्याला आवश्यक धीर दिला पाहिजे.

जीवनात प्रगती करायची असल्यास माणसाने मोठी स्वप्ने पाहावीत. आपले ध्येय निश्चित करायला हवे. त्यासाठी मनात काही प्रश्न निर्माण करून त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करावा. उदाहरण द्यायचे झाल्यास आपल्या सुखकर भवितव्यासाठी जीवनात आपल्याला काय करायचं आहे. कोण व्हायच? सध्याच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येकाने स्पर्धेत उतरून स्वतःला तयार ठेवण्याची अत्यंत गरज आहे.

आजच्या घडीला, दैनंदिन जीवनाचा विचार केल्यास जीवनात संघर्ष महत्त्वाचा आहे. हे सर्वांना मान्य असेल. कारण मोठमोठ्या व्यक्तींची आत्मचरित्रे वाचल्यास प्रत्येकाने संघर्षात्मक वातावरणावर मात करून वर आलेले आहेत. हे तत्त्वज्ञान आहे.

मित्रांनो सकाळ झाली, की प्रत्येकाची विचारचक्रे गतिमान होतात. जंगलात राहणारी हरीण विचार करतं, की खूप वेगाने धावायचं आहे, नाही तर सिंह आपल्याला मारून टाकेल, सिंह सकाळी उठल्यावर विचार करत असतो, की मला हरणापेक्षा गतीने धावायचं आहे. नाही तर मी उपाशी राहीन. जीवनाची ही रीतच अशी आहे, की स्वतःचं अस्तित्व जपून आपला मार्ग सुकर करण्याची यशस्वी जीवन जगण्यासाठी माणसाने धावण्याची गरज आहे. अन्यथा मागे राहण्याची भीती असते.

मित्रांनो, एक गोष्ट पक्की ध्यानात ठेवा. आपल्या वाटेला आलेली वेळ ही एखाद्या वाहत्या नदीसारखी असते. नदीच्या किनारी राहून आपण ज्या पाण्याला स्पर्श करतो, त्या पाण्याला परत स्पर्श करू शकत नसतो. कारण नदीच्या प्रवाहाबरोबर वाहून गेलेलं नदीतील पाणी परत येत नाही. तसेच वेळेचे आहे. निघून गेलेली वेळ परत मागवता येत नाही. त्यासाठी मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करण्याची क्षमता माणसाने विकसित करण्याची गरज आहे. योग्य वेळी घेतलेले योग्य निर्णय जीवनाला कलाटणी देणारे असतात, शिवाय मनातील ध्येय साध्य करण्यासाठी मदतगार ठरतात.

ध्येयपूर्तीसाठी आपण ज्यावेळी झगडत असतो, अशावेळी खूपदा माणूस स्थैर्यासाठी वावरत असताना आपल्या कुटुंबाकडे हवं तितकं लक्ष देऊ शकत नसतो, अशावेळी कुटुंबातील सदस्यांची जबाबदारी असते, की ध्यैर्य पूर्तीसाठी झगडणाऱ्या व्यक्तीला सहकार्य करून त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याची अशावेळी कुटुंबातील सदस्यांनी जाणले पाहिजे, की मनातील इच्छांनी झाडावरचं फूल पदरात पडत नसतं, तर ते पदरात पाडून घेण्यासाठी कर्तृत्वाच्या फांदीला हलवावे लागते, अशावेळी घरातील प्रत्येक सदस्यांचे सहकार्य फारच अपेक्षित ठरते.

ध्येय प्राप्तीसाठी एखादा व्यक्ती ज्यावेळी धडपडत असतो. त्यावेळी तो प्रचंड दबावाखाली असतो. त्याचे एकच ध्येय असते, मनात बाळगलेले स्वप्न पूर्ण करण्याचे. एखादा व्यक्ती ज्यावेळी ऑफिस काम करत असतो. त्यावेळी बॉसच्या सांगण्याप्रमाणे काम करावे लागते. ते पूर्ण करताना वेळेचे बंधन पाळले जात नसल्याने खूपदा नात्यामध्ये कडवटपणा निर्माण होत असतो. फार बिझी राहिल्याने तो 
आपल्या कुटुंबाकडे हवे, तेवढे लक्ष देऊ शकत नसल्याने निर्माण झालेली दरी रुंदावण्यापेक्षा ती भरून काढण्याची जबाबदारी त्याच्या कुटुंबातील प्रत्येकाने उचलली पाहिजे, अशा अवस्थेत आपल्या माणसांना धीर देण्याची गरज असते.

आपल्या घरातील व्यक्तीची धडपड, ही त्याच्या स्वार्थासाठी नसून सर्वांच्या सुखासाठी असते. हे लक्षात घेऊन त्याला मदत करण्याची जबाबदारी घरातील इतरांनी उचलण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असते. नात्यातील जिवंतपणा अबाधित ठेवण्यासाठी जीव तोडून काम करणाऱ्यांना समजून घेऊन त्याच्यावर टिका करण्या ऐवजी त्याला त्याच्या कामामध्ये प्रोत्साहित केले पाहिजे. त्याला आवश्यक धीर दिला पाहिजे व आपण सर्वजण तुझ्यामागे आहोत, असा भास त्याच्या मनात निर्माण करण्याची गरज आहे.

कित्येक वेळा पतीच्या व्यवस्थेमुळे घरात खटले उडण्याचे प्रकार घडतात. पती आपल्याला वेळ देत नाही, अशा तक्रारी प्रत्येक घरात सर्रासपणे ऐकायला मिळतात. यावेळी एक गोष्ट प्रत्येक पत्नीच्या मनात का येत नसावी, की आपला पती जे काही करत आहे, ते आपल्या सर्वांच्या भवितव्यासाठी किंवा आपल्या सुखी संसारासाठी आजच्या घडीला महागाई इतकी वाढलेली आहे, कि सुखसोयी पूर्णत्वास नेण्यासाठी माणसाकडे पैसा असण्याची गरज आहे आणि परिस्थितीशी झगडणाऱ्या माणसाचा हा सारा खटाटोप पैसे मिळवण्यासाठी चाललेला असतो.

जीवनातील काही गोष्टी या ओंजळीतील पाण्यासारख्या असतात. त्या तशाच स्वीकारण्यात आनंद असतो. आपणा सर्वांना माहीत असतं, ओजळीतील पाणी आपण अधिक वेळ धरून ठेवू शकत  नाही. त्यासाठी पर्यायी व्यवस्था करून जीवनात आलेल्या चांगल्या गोष्टी भवितव्यासाठी साठवून ठेवण्याची कलात्मक नजर माणसाकडे असायला हवी. निसर्गाने माणसाला दिलेल्या विचार करण्याच्या क्षमतेला पारखून मिळालेल्या वरदानाचा वापर स्वहितासाठी करण्याची कला माणसाकडे असायला हवीच.

स्वतःला सिद्ध करतेवेळी आपल्या आवडत्या माणसांना वेळ देणे कठीण जाते. अशा वेळी कित्येकदा मतभेदाचे वातावरण निर्माण होते. नाते विस्कळीत होऊ लागतात. अशावेळी प्रत्येकाने सामंज्यसपणे तोडगा काढण्यासाठी एकमेकांमध्ये संवाद घडवून आणावा. संवादातून बऱ्याच गोष्टी सोडविता येतात, असा आजवरचा खूप लोकांचा विश्वास आहे.

संवादाचा ज्यावेळी विचार येतो, त्यावेळी संवाद प्रणालीवर प्रत्येकाने अधिक भर द्यावा. कारण हा एक असे माध्यम आहे, ज्यामुळे निर्माण झालेल्या घरगुती समस्येवर सहज तोडगा निघू शकतो. काही वेळा संवाद साधण्यात माणसांमधील अहंकार आडवा येतो. माणसांमध्ये अहंकार नक्कीच असावा पण ज्यावेळी स्वतःच्या घरातील माणसांचा संबंध येतो त्यावेळी अहंकाराला पाठ करून एकमेकात संवाद साधल्याने बऱ्याच समस्या चुटकीसरशी सुटाव्या होण्यास मदत होतात.
नात्यामध्ये समस्या निर्माण होण्याअगोदर कुटुंबातील सर्व घटकांमध्ये साधकबाधक चर्चा होण्याची गरज असते. दैनंदिन जीवनातील व्यस्ततेचे योग्य प्रकारे व्यवस्थापन केल्यास बऱ्याच अंशी समस्या निर्माण होत नसतात. घरात आल्यानंतर प्रत्येकाने आपले काम स्वतः करण्याची सवय लावून घेणे व फावल्या वेळेत दुसऱ्याला सहकार्य करावे. पतीच्या व्यवस्थेला समजून घेऊन त्याला धीर आणि सहकार्य करावे. घरातील मुलांना स्वावलंबनाचे धडे देऊन आपली कामे स्वतः करण्यास त्यांना लहानानांही प्रवृत्त करावे. पती-पत्नीनी मुलांविषयी समस्यांवर एकत्रितपणे विचार विनिमय करावा. केवळ पैसे कमविण्यात धन्यता मानू नये. तर पैशाचा यथायोग्य उपयोग करण्यात कौटुंबिक सामंजस्य असायला हवे.

प्रमुख व्यक्ती ज्यावेळी घराबाहेर स्थिरावण्यासाठी धडपडत असतो, त्यावेळी त्यांनीही काही महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष दिले पाहिजे. आपली धडपड निरर्थक न जाण्यासाठी कामासंबंधीच्या नेटवर्ककडे अधिक लक्ष दिले पाहिजे. नेटवर्किंग जितके मोठे आणि सशक्त तितके यश लवकर मिळण्यास मदत होत असते. आजच्या घडीला प्रत्येक क्षेत्रात गुरु हा असतोच त्या गुरूचे मार्गदर्शन माणसाच्या जीवनात महत्त्वाचे ठरत असते. शिवाय अपडेट माहिती व माणसामध्ये प्रामाणिकपणा, सचोटी असायला हवी असते. एकंदरीत काय तर ढोर मेहनत करण्यापेक्षा स्मार्ट काम करण्याची गरज असते. स्मार्ट काम करणाऱ्यांना वास्तवात काय चालले आहे, याचे भान असते व अशी माणसे सार्वजनिक आयुष्यात समतोल साधण्याचा प्रयत्न करत असतात.

सरते शेवटी माणसाच्या जीवनात धीर महत्त्वाचा असतो. जीवनाच्या वेलीवर यशाची फुलं फुलायला थोडा वेळ नक्कीच लागेल. कारण फूल हे हळुवार उमलत. त्याला स्वेच्छेने फुलू द्या.

संबंधित बातम्या