गंगूबाई काठियावाडी चित्रपटासाठी संजय लीला भन्साळी आणि आलिया भटला न्यायालयाचे समन्स; वाचा काय आहे कारण

दैनिक गोमंतक
गुरुवार, 25 मार्च 2021

गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि चित्रपटाची नायिका आलिया भट यांना प्रचंड विरोध होत असून त्यांच्या चित्रपटालाही विरोध केला जात आहे. याशिवाय हा चित्रपट कायद्याच्या कचाट्यातही अडकला आहे. मुंबईच्या चीफ मेट्रोपॉलिटन मेजिस्ट्रेट यांनी आलिया भट्ट, संजय लीला भन्साळी आणि दोन कादंबरी लेखकांना समन्स बजावले आहे. या सर्वांना 21 मे रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

बाबू रावजी शाह नावाच्या व्यक्तीने याबाबत न्यायालयात धाव घेतली असून ते स्वतःला गंगूबाई  काठियावाडी  यांचा दत्तक मुलगा मानतात. शाह यांच्या तक्रारीनंतर हे  समन्स पाठविण्यात आलेत. गंगूबाई काठियावाडी चित्रपटात आपल्या कुटुंबाची बदनामी केली जात असल्याचा आरोप बाबू रावजी शाह यांनी केलाय.  तसेच, हा चित्रपट पुस्तकातील घटनेवर आधारित आहे. मात्र या पुस्तकात लिहिलेल्या घटना खोट्या असून त्यातील  वस्तुस्थितीवर आधारित नाहीत. त्यामुळे हे  पुस्तकच खोटे असल्याचा आरोप शाह यांनी केला आहे. याच कारणास्तव संजय लीला  भन्साळींच्या या चित्रपटाविरोधात आणि पुस्तकाविरोधात शाह यांनी न्यायालयात दाद मागितली आहे. यामुळे याचिकाकर्ते शाह यांनी  गंगूबाई  काठियावाडी चित्रपटाचा प्रोमो आणि ट्रेलर थांबवण्याची विनंती केली. 

Goa Budget 2021: गोव्यातील सर्व रस्‍त्‍यांचे हॉटमिक्स डांबरीकरण; तर साधनसुविधा...

यापूर्वी शाह यांनी मुंबईच्या सत्र न्यायालयात जाऊन पुस्तकाच्या लेखकांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. परंतु हे  पुस्तक 2011 मध्ये प्रकाशित झाले आहे, मात्र शाह यांनी 2020 मध्ये न्यायालयात दाद मागीतल्याने न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती.  याशिवाय ते गंगूबाई काठियावाडी यांचा दत्तक मुलगा असल्याचे कोणतेही कायदेशीर पुरावे शाह यांना सादर करता आले नाहीत. त्याचबरोबर  चित्रपटाच्या निर्मात्यांनी आणि लेखकांनीही शाह यांना घरातील इतर सदस्यांसोबत कधीही पहिले नसल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर, पुस्तकातील उल्लेखानुसार, शाह यांनी गंगुबाई यांच्या कुटुंबियांशी वाईट कृत्य केले, याकडे लक्ष वेधले. यानंतरही बाबूरावजी शाह यांचा युक्तिवाद फेटाळल्यानंतर त्यांनी चित्रपट निर्माते आणि लेखकांविरूद्ध फौजदारी कारवाईत कौटुंबिक मानहानीचा दावा दाखल केला.

यानंतर मॅजिस्ट्रेट न्यायलयाने, या पुस्तकाच्या आणि चित्रपटाच्या प्रोमोमुळे बाबूरावजी शाह आणि त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे मान्य केले होते. यासह, शाह यांनी 11 डिसेंबर 2020 रोजी नागपाडा पोलिस ठाण्यात दाखल केलेली तक्रार देखील पुढे केली होती. या तक्रारीनुसार आलिया भट्ट,  संजय लीला भन्साळी आणि दोन कादंबरी लेखकांना समन्स बजावले आणि त्यातील केवळ एकाने प्रतिसाद दिला.

दरम्यान, गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचे शूटिंग सध्या मुंबईच्या फिल्मसिटीमध्ये सुरू आहे. शूटच्या सेटच्या डिझाईनसाठी जवळपास साडेतीन कोटी रुपये खर्च झाले आहेत. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला होता.  त्यात आलियाचा गंगूबाई काठियावाडीचा अंदाज सर्वानाच खूप आवडला होता.  आलिया भट्टच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वात प्रभावी भूमिकेचे वर्णन केले जात असून हा चित्रपट तिच्या कारकीर्दीतील एक वेगळी वाट असेल,  असा विश्वास व्यक्त केला जात आहे. हा चित्रपट गंगूबाई काठियावाडी लेखक हुसेन झैदी यांच्या 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' या पुस्तकाच्या एका अध्यायवर आधारित आहे. या चित्रपटामध्ये मुंबईच्या माफिया क्वीन गंगूबाईची कहाणी दाखविण्यात येणार आहे. गांगुबाई हे 60 च्या दशकात मुंबईतील माफियांचे एक मोठे नाव होते. या चित्रपटात आलिया भट्टसह अजय देवगन, इमरान हाश्मीही दिसणार आहेत.
 

संबंधित बातम्या