व्वा.. गणेश 'आश्चर्य'..!; तब्बल १०२ किलो वजन कशासाठी कमी केलं? वाचा..

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 17 डिसेंबर 2020

नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्यने १०२ किलो वजन कमी करत  सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्याचे आधी २०० किलो वजन होते जे आता ९८ किलो एवढे कमी झाले आहे.

मुंबई- बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्यांचे वेट लॉस हे एक अनोखं समीकरण.  याआधी अभिनेत्री भूमी पेडणेकर, गायक अदनाम सामी आणि अभिनेता राम कपूर यांनी आपल्या शरीरात मोठा बदल करत आपले वजन कमी केले होते. यात आता आणखीन एक नाव जोडले गेले आहे. नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्यने १०२ किलो वजन कमी करत  सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्याचे आधी २०० किलो वजन होते जे आता ९८ किलो एवढे कमी झाले आहे.

गणेश आचार्य यांनी 'दी कपिल शर्मा शो'च्या सेटवर आल्यानंतर सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. गणेश मागील काही दिवसांपासून अत्यंत मेहनत घेत होता. तो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरूनही अनेकदा आपल्या व्यायामाचे व्हिडिओज शेअर करत असतो.  

मिळालेल्या माहितीनुसार या फिटनेसची सुरूवात 'हाउसफूल ३' च्या सेटवर झाली होती. या सिनेमात गणेश एका गाण्यावर काम करत होता. अचानक त्याच्या गुडघ्यात एक जोराचा झटका आला. या गोष्टीला गांभीर्याने घेत त्याने एका माध्यमाला एका नव्या प्रवासाला सुरूवात करत असल्याचेही सांगितले होते. त्यानंतर आपल्या प्रवासाबाबतही त्याने बोलताना सांगितले की, 'सुरूवातीचे दोन महिने माझ्यासाठी अत्यंत कठीण होते. मला फ्लोटिंग शिकतानाच १५ दिवस लागले. यानंतर सावकाश माझा ट्रेनर अजय नायडू याने माझ्याकडून पाण्यात क्रंचेस मारण्याचा सराव करून घेतला.  आता मी ७५ मिनिटांच्या अवधीत ११ व्यायामाचे प्रकार सहज करून घेतो. त्यानंतर मात्र अतिशय थकवा जाणवतो.  वेट लॉसने माझ्या आयुष्यात एक आमुलाग्र बदल घडवला.' 

आपल्या शरीरात झालेल्या आमुलाग्र बदलानंतर पुढे बोलताना तो म्हणाला की, 'मी जेव्हा जाड होतो तेव्हाही नृत्य करत होतो.  आता मात्र, यात फरक एवढाच पडला की, माझी उर्जा दुप्पट झाली आहे. माझ्या कपड्याचे लेबलही ७ एक्सेलवरून कमी होत एल झाले आहे.' गणेशचा लेबल हा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे.  हा सिनेमा नृत्यावर आधारित आहे. यात तो १० वर्षांच्या मुलाच्या वडिलांचे पात्र साकारणार आहे.   

संबंधित बातम्या