नातं संपत असतानाही मधुबालाच्या वडिलांना sorry न म्हणणाऱ्या नायकाचा आज ९८वा वाढदिवस

गोमंतक ऑनलाईन टीम
शुक्रवार, 11 डिसेंबर 2020

चित्रपट रसिकांच्या मनावर कित्येक वर्ष अधिराज्य गाजवणारा अभिनेता दिलीप कुमार आज आपला ९८वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात त्यांच्याविषयी काही महत्वाचे किस्से.. 

नवी दिल्ली- भारतीय चित्रपट रसिकांच्या मनावर कित्येक वर्ष अधिराज्य गाजवणारा अभिनेता दिलीप कुमार आज आपला ९८वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात त्यांच्याविषयी एक किस्सा.. 
 
सुमारे ४० दिवसांपर्यंत 'नया दौर'चे बाहेर चित्रीकरण होणार होते. यासाठी मधुबालाचे वडील तिला चित्रीकरणासाठी पाठवण्यास इच्छूक नव्हते. यामुळे बीआर चोपडा यांनी मधुबालाच्या जागी वैजयंतीमालाची निवड केली. यानंतर हे प्रकरण एवढे वाढले की त्यांना थेट न्यायालयापर्यंत जावे लागले. दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्या प्रेमावरही याचा परिणाम झाला. याप्रकरणामुळे दोघांचे प्रेम प्रकरणही न्यायालयात पोहोचले. न्यायालयात दिलीप कुमार यांनी मधुबालाबरोबरचे नाते विसरून दिग्दर्शकाच्या बाजूने साक्ष दिली.  

 मधुबालाकडे ते आकर्षित असल्याचे दिलीप कुमार यांनी आपल्या आत्मकथेत मान्य केले आहे. दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते. मात्र, मधुबालाच्या वडीलांना हे मान्य नव्हते. यातच बीआर चोपडा यांच्या 'नया दौर'च्या निमित्ताने न्यायालयात प्रकरण गेल्याने मधुबालाचे वडील आणि दिलीप कुमार यांच्यातील संबंध आणखी लयास गेले.

न्यायालयात काही दिवस खटला चालवल्यानंतर या प्रकरणाचा निकाल लागला. त्यानंतर दिलीप कुमार यांनी मधुबालाला लग्नाची मागणी घातली. मात्र, मधुबालाने घडल्याप्रकाराबद्दल आपल्या वडिलांची माफी मागावी, असा हट्ट धरला. दिलीप साहेबांनी मात्र, असे करण्यास साफ नकार दिल्याने दोघेही एकमेकांपासून कायमचे दूर गेले.  

काही काळानंतर झालेल्या मुगल-ए-आजम या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान ते एकमेकांपासून ते एवढे दूर गेले होते की, त्यांनी साधी ओळखही दाखवली नाही. यानंतर दिलीप कुमार यांचे मन सायरा बानो कडे वळले. त्यांनी बानो यांच्याशी विवाह रचला.   

आपल्या शेवटच्या काळात जेव्हा मधुबाला आजारी असायच्या तेव्हा त्यांनी दिलीप कुमार यांना भेटायची इच्छा दाखवली. त्या अतिशय अशक्त झाल्या होत्या. मधुबाला यांची अवस्था बघून दिलीप कुमार अत्यंत दु:खी झाले. त्यावेळी मधुबाला यांनी दिलीप कुमार यांच्या डोळ्यात बघून उद्गार काढले, 'हमारे शहजादे को उनकी शहजादी मिल गई है, मै बहोत खुश हूं'. यानंतर १९६९मध्ये वयाच्या ३५व्या वर्षीच मधुबाला यांचे निधन झाले.  

संबंधित बातम्या