‘गायकाला ‘रियाजा’ची भूक लागणे महत्त्वाचे’

.
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

संगीतश्रेष्ठ पं. जसराज यांचे नुकतेच देहावसान झाले. त्यांच्या अविस्मरणीय आठवणी प्रत्येकाच्या हृदयात आहेत. या आठवणी संगीताच्या माध्यमातून प्रत्येकाला नेहमीच जगण्याची प्रेरणा देत राहतील. प्रसिद्ध लेखिका अमिता सलत्री यांनी १४ जानेवारी १९९९ रोजी पं. जसराज यांची मुलाखत घेतली होती. ही मुलाखत आठवणींच्या स्वरुपात खास वाचकांसाठी...

श्रोत्यांसमोर गाणं सादर करताना ‘जनताही जनार्दन है’ असं समजून, प्रत्यक्ष परमेश्‍वरासमोरच आपण गात आहोत अशी भावना प्रत्येक गायकाने मनात ठेवून त्याप्रमाणे गावं. ‘हर एक रागमे भी भगवान होता है, उसे अच्छी तरह गाया नही तो भगवानका अपमान होता है’ - संगीतश्रेष्ठ पं. जसराजजींची अशी ही संगीतधारणा.

संगीतमार्तंड पं. जसराज हे उत्तर भारतीय शास्त्रीय गायनातील एक उच्च कोटीचे गायक आहेत. साडेतीन सप्तकेपर्यंत सहज फिरणाऱ्या स्वच्छ, बुलंद, सुरेल आणि भावगंभीर आवाजामुळे पं. जसराज यांच्या मैफलीत रसिक गुंग होऊन जातात. पद्मभूषण, संगीतमार्तंड, स्वामी हरिदास संगीतरत्न, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, शिरोमणी अल्लाउद्दीन पुरस्कार, जॉईंट इंटरनॅशनल पुरस्कार असे देशविदेशांतून अनेक किताब व पुरस्कार मिळालेले आहेत.

पं. जसराज यांचा जन्म संगीत कलाकारांची थोर परंपरा असलेल्या कुटुंबात झाला. आपले पिताश्री कै. पं. मोतीरामजी या आपल्या मोठ्‍या भावाकडून त्यांना मेवाती घराण्याची सखोल आणि दीर्घकालीन तालीम मिळालेली आहे. तसेच मोती घराण्याचेच एक श्रेष्ठी आणि सनदचे महाराणा श्री. जयवंतसिंगजी या त्यांच्या अध्यात्मिक गुरूकडूनही त्यांना मार्गदर्शन लाभलेले आहे.

जयकृष्णमूर्ती, रुक्मिणीदेवी, एम. एस. शुभलक्ष्मी, शामागुडी श्रीनिवास अय्यर वगैरे संगीतश्रेष्ठींनी पं. जसराजींच्या गायनकलेचं नेहमीच कौतुक केले आहे. ‘अपने गानेसे प्रत्यक्ष भगवानकी प्रचिती करनेवाला यह गायक है’ असं ते सारे पं. जसराजजींबद्दल नेहमीच बोलायचे. या सर्वांच्या सहवासातील कित्येक किस्से पं. जसराजजींनी मला सांगितले.

आज सारे जग शांतीच्या शोधात आहे. संगीत हे एकमेव माध्यम असं आहे जे आपल्याला खरीखुरी मनःशांती मिळवून देऊ शकते आणि त्यातल्या त्यात भारतीय संगीत हे मानवाला अंतर्मुख करणारे आहे. ‘ववह समाधीकी तरफ जानेवाला है, समाधीका मतलब शांती । हमारे संगीतसे और जादा शांती कोई भी म्युझिक नही दे सकता’, पंडितजी भारतीय संगीताची महती सांगत होते. ‘पॉप-रॉक’कडे झुकणारे भारतीय कलाकार शेवटी भारतीय संगीताकडे वळतीलच यात शंका नाही. ज्यांना देवाने स्वर समजण्याचे मन आणि कान दिले नाहीत. केवळ तेच पॉप-रॉक संगीत ऐकतील, हेही तेवढंच खरं.

आपल्या देशात शांतता नांदवण्यासाठी आपल्यासारखे ‘संगीतश्रेष्ठ’ काही प्रयत्न करू शकतील का, या माझ्या प्रश्‍नावर ते म्हणाले, की केवळ स्वार्थी राजकारण्यांमुळे आमच्या देशात अशांती माजली आहे. खरंं तर प्रत्येक राजकारणी हा सुशिक्षित आणि सुसंस्कारित हवा. विधानसभा, लोकसभा यासारख्या जागा अगदी मंदिरासारख्या आहेत. अशा पवित्र ठिकाणी जर हे गुंड राजकारणी वावरायला लागले तर आपल्या देशाचे भविष्य ते काय असेल? अशावेळी आमच्यासारखे संगीत तपस्वी कशा प्रकारे बरे प्रयत्न करतील शांती नांदवण्यासाठी? आता एक मात्र करता येईल की संगीतकारांनी विशेषतः तुमच्यासारख्या पत्रकारांनी राजकारणात उतरायला हवं. म्हणजे काही तरी बदल होईल. ‘पद्मश्री, पद्मभूषण या पदव्या देताना आम्हा कलाकारांची जणू झडतीच घेतली जाते. तुम्हाला कधी पोलिसांनी पकडलं होतं का, तुम्ही कधी तुरुंगात वगैरे गेला नाहीत ना? वगैरे विक्षिप्त प्रश्‍न आम्हाला त्यावेळी विचारले जातात. मग या राजकारण्यांचाच ‘बायोडाटा’ का नाही तपासला जात! त्यांना मुख्यमंत्री, प्रधानमंत्री करताना त्यांनी केलेल्या अनैतिक बाबींचा विचार करायला नको का? सारं विधानच बदलणं गरजेचे आहे आता. पंडितजी राजकारण्यांबद्दल अगदी चिडून  बोलत होते. मतदाराने मत देताना त्या त्या उमेदवाराचा वैयक्तिक बायोडेटा पडताळून पहाणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असं ते पुढे म्हणाले.

कित्येक संगीत कलाकार असे आहेत की त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांची अगदी कंगाल स्थिती होते. अशा कलाकारांची सरकारने पर्व करायची गरज आहे नाही का? या विषयावर बोलताना ते म्हणाले की सरकारला कुठल्याही कलाकाराचे काहीच पडलेले नाही. अशावेळी जनतेचेच कर्तव्य आहे की अशा कंगाल स्थितीतल्या कलाकारांची सेवा करणे, मानवतेच्या दृष्टिने या कलाकारांकडे बघितले पाहिजे. कारण संगीत ही कला सर्वच कलाकारांना श्रीमंत बनवत नाही. पैसा मिळवणं हे साध्य या कलेमागे नसतेच जणू. कलाकारांना पेंशन मिळणं तसं गरजेचे आहे. खरंतर आपल्या देशात प्रत्येक शाळेत ‘संगीत’ ही कला सर्वच कलाकारांना श्रीमंत बनवत नाही. पैसा मिळणं तसंं गरजेचे आहे. खरंतर आपल्या देशात प्रत्येक शाळेत ‘संगीत’ हा विषय सक्तीता केला गेला तर या कलाकारांना रोजगार मिळू शकेल. महाराष्ट्रामध्ये तसा प्रयत्न सुरू केला आहे. इतरत्रही ते व्हायला हवं. आमच्यासारख्या कित्येक ज्येष्ठ-श्रेष्ठ कलाकारांनी संगीताच्या क्षेत्रात भारत देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्याच्या बदल्यात तरी भारत सरकारने संगीत हा विषय प्रत्येक शाळेत सक्तीचा करायला हवा. म्हणजे आमच्या कष्टांचे चीज होईल आणि भारत देशात कलाकारांच्या खाणी निर्माण होतील. 

उत्तम गायकीचं रहस्य काय? या प्रश्‍नावर बोलताना पंडितजी पटकन म्हणाले की ‘each artist has to challenge himself to be perfect’ दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कलाकाराचा स्वभाव हा त्याच्या गाण्यातून उतरत असतो. तेव्हा कलाकाराने सर्वप्रथम विनम्र आणि विनयशील असावे. मृदू-मुलायमता त्यांच्या स्वभावात असावी. ‘आहे ब्रह्माहंषी’ - मीच म्हणजे सारं काही, ही त्याची भावना असता कामा नये. तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक कलाकार हा केवळ देवच घडवत असतो. तेव्हा कलाकाराने आपल्या कलेमार्फत त्याचे आभार मानले पाहिजेत. ही धन्यता त्याने मृदू गायकीतून देवाशी प्रगट करायला हवी. ‘चिल्ला के नही।’ आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट अशी आहे की संगीत हा एक व्यवसाय बनवू नये. ती एक तपश्‍चर्याच समजावी. पैशाची ‘आस’ न ठेवता तुम्ही जेव्हा या तपश्‍चर्येत बुडाल तेव्हाच तुम्ही नामांकित व्हाल - ते पुढे म्हणाले.

आजचे कलाकार  हे ‘इन्स्टंट’ प्रकार मानतात. तुरंत ते नं. १ व्हायला बघतात. अशा उतावीळ कलाकारांना आपला काही डोस! - असं मी म्हणताच पंडितजी म्हणाले, पहिल्या वर्गात शिकणाऱ्याने जर लगेचच एम.ए.ची डिग्री मिळविण्याची अपेक्षा केली तर ते केवढे हास्यास्पद ठरेल बरं! भारतीय संगीताबाबतीत तर श्रेष्ठांकडून असं म्हटलं गेलं आहे की चार जन्म संगीताची आराधना केल्यानंतर पाचव्य जन्मात काय तो कोणीही परिपूर्ण असा संगीतश्रेष्ठ बनू शकतो. अशी ती महान आणि खोल संगीत परंपरा आहे. तेव्हा अगदी पहिल्याच जन्मात मी ‘मोठा’ संगीतकार झालो अशी घमेंडी कुणीही बाळगू नये. आता जे जे संगीतमार्तंड झाले आहेत त्यांनी नक्कीच समजावं की हा आपला पाचवा जन्म आहे. 

‘रियाज’बद्दल बोलताना पंडितजी म्हणाले की, कमीतकमी ८ ते १० तास रियाज हा व्हायलाच हवा. प्रत्येक कलाकाराला केवळ अन्नाची भूक लागून चालत नाही. त्याला रिजाजची भूक सतत लागणं महत्त्वाचं आहे. गंडाबंधन करताना गूळ आणि चणे खायला देतात. त्याचा सखोल अर्थ मी जेव्हा पंडितजींना विचारला तेव्हा ते आधी हसले. म्हणाले, चांगला प्रश्‍न आहे. याचा अर्थ असा, की हे चणे लोखंडी चणे समजून खा. तुझ्या हातात लोखंडी चणे खायची प्रचंड शक्ती येऊ दे. म्हणजेच रियाजमध्ये एवढी शक्ती यावी की ‘तुम किसी लोहे को भी पिघला सकोगे ।’’ 
`
संगीत या एकाच क्षेत्रातून ‘सर्वधर्मसमभाव’ ही भावना खोलवर रुजली जात असते. ‘इस क्षेत्र में जात-पात, धर्म कुछ नही, जिसमें हम रियाज करते है, वोही हमारा घराना है । जसे आमचे शिष्य हे सगळ्या धर्माचे असतात तसे आमचे चाहतेही सर्वधर्मीय असतात. त्यामुळे संगीत हे एकच क्षेत्र सर्व मनांना, हृदयांना जोडणारे आहे. ‘एकात्मता’ साधणारे आहे, पण सरकारने सुरू केलेली धर्मनिरपेक्षता मात्र अर्थहीनच आहे. कारण त्यांनी अल्पसंख्याकांना खूपच डोक्यावर चढविले आहे. याची मला अत्यंत चीड येते. मी असं म्हणतो म्हणून तुम्ही जरूर लिहा हं. - थोड्याशा नाराजीनेच पंडितजी बोलत होते.

भारतात कित्येक ठिकाणी पंडितजींचे गुरुकुल म्हणजे संगीताश्रम आहेत. शिवाय कॅनडा येथे गेली १० वर्षे पं. जसराज स्कूल आॅफ म्युझिक फाऊंडेशन ही संस्था चालवतात. न्यू जर्सी येथे त्यांची जसराज म्युझिक अकादमी चालते. वर्षातून दीड-दोन महिने तेथे राहून शिष्यांना संगीताचे धडे देतात. अशा प्रकारचे गुरुकुल गोव्यातही सुरू करायला माझी तयारी आहे, असं ते ठामपणे म्हणाले. 

आपल्यासारख्या कलाकारांना लोक देवासमान मानतात. असं मी जसराजजींना नम्रपणे म्हटल्यावर ते प्रसन्नपणे हसले. ‘कलाकारांंको माननेकी परंपरा कबसे चलती है, मालुम है? मला त्यांनी पुराणातली एक कथा ऐकवली. नारदमुनींनी एकदा भगवान विष्णूला विचारलं, ‘भगवान, आप रहते कहॉं है? - धरातलमें, स्वर्गलोकमें या भूलोकमें? कहॉं?’ तर भगवान विष्णू म्हणाले, ‘नाहं वसामि वैकुंठे, योगीनामची हृदय न च (मी वैकुंठात, स्वर्गात, भूतलावर किंवा योगीच्या हृदयात रहात नसतो.) 

‘मद्भक्ता यत्र गायन्ति, तंत्र तिष्ठा मी नारदा ।’

(माझे भक्त जेथे माझं गुणगान करतात तेथेच मी रहातो रे नारदा) गाना-बजाना यह एक भगवानकी देन है, और भगवान जिसपे खुश होता है, उसकोही वह गायक या संगीतकार बनाता है, आणि त्या कलाकारामध्येच जणू देवाचं वास्तव्य असतं. म्हणून जनतेला कलाकार हा देवासारखा वाटतो आणि कलाकारांना जनता ही जनार्दन वाटते. तर असं हे कलाकार आणि श्रोता यांनी एकमेकांत देवत्व जर पाहिलं तरच ही संगीत कला चिरंतर राहील. यात अतिशयोक्ती नाही...

संबंधित बातम्या