प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांचे निधन

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

बालसुब्रह्मण्यम यांची प्रकृती काल (ता. २४) रात्रीपासून चिंताजनक झाली होती. आज दुपारी एक वाजून चार मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर उद्या (शनिवारी) अंत्यसंस्कार होणार आहेत.

चेन्नई: कोरोना संसर्ग झाल्यामुळे गेल्या महिन्याच्या सुरुवातीपासून खासगी रुग्णालयात उपचार घेणारे प्रसिद्ध पार्श्वगायक, संगीत दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते श्रीपती पंडितरथिलु उर्फ एस. पी. बालसुब्रह्मण्यम (वय ७४) यांचे आज निधन झाले. गेल्या दीड महिन्यापासून ते कोरोनाशी लढत होते. बालसुब्रह्मण्यम यांची प्रकृती काल (ता. २४) रात्रीपासून चिंताजनक झाली होती. आज दुपारी एक वाजून चार मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर उद्या (शनिवारी) अंत्यसंस्कार होणार आहेत.   

आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सुब्रह्मण्यम यांनी स्वत: पाच ऑगस्टला जाहीर केले होते. त्यांच्यावर चेन्नईमधील एमजीएम हेल्थकेअर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे काही दिवसांपूर्वीच त्यांचे पुत्र आणि गायक एस. पी. चरन यांनी सांगितले होते. बालसुब्रह्मण्यम यांनी नुकतीच झालेली अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा आणि क्रिकेटचे काही सामनेही पाहिल्याचे चरन  यांनी सांगितले होते. यामुळे त्यांच्या चाहत्यांना दिलासा मिळाला होता. मात्र, काल अचानक संध्याकाळनंतर त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याचे रुग्णालयाने सांगितले होते.  ते जीवरक्षक प्रणालीवर होते. आज बालसुब्रह्मण्यम यांच्या निधनाचे वृत्त पसरताच त्यांच्या हजारो चाहत्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली होती. चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनीही त्यांच्या घरी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्यामागे पत्नी सावित्री, पुत्र चरन आणि कन्या पल्लवी हे आहेत. 

तेलुगू कुटुंबात जन्मलेल्या बालसुब्रह्मण्यम यांनी संगीताचे कोणतेही औपचारिक शिक्षण घेतले नव्हते. साठच्या दशकात तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या ‘एस. पी. बाला’ यांना एम. जी. रामचंद्रन यांनी तमिळ चित्रपटसृष्टीत आणले. त्यानंतर मागे वळून पाहता त्यांनी तेलुगू, तमिळ, हिंदी, कन्नड, मल्याळी, संस्कृत, इंग्रजी आणि उर्दू भाषेत अनेक सुमधूर गाणी म्हटली. हिंदीतील ‘हम आपके है कौन’, ‘मैने प्यार किया’, ‘साजन’, ‘एक दुजे के लिये’ या चित्रपटांसाठी त्यांनी गायलेली गाणी भारतीय रसिकांमध्ये विशेष प्रिय झाली. सोळा भाषांमध्ये मिळून त्यांनी चाळीस हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. यासाठी त्यांचे नाव गिनेस बुकमध्येही नोंदले गेले आहे. उत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून त्यांना सहा राष्ट्रीय पुरस्कारांसह इतर अनेक सन्मान मिळाले आहेत. त्यांनी डबिंग, ॲक्टिंग आणि संगीत दिग्दर्शक म्हणूनही काम केले आहे.

सोळा भाषेत गाणी
साठच्या दशकात ‘एस. पी. बाला’ यांना एम. जी. रामचंद्रन यांनी तमिळ चित्रपटसृष्टीत आणले. त्यानंतर मागे वळून पाहता त्यांनी विविध भाषेत अनेक सुमधूर गाणी म्हटली. सोळा भाषांमध्ये मिळून त्यांनी चाळीस हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. यासाठी त्यांचे नाव गिनेस बुकमध्येही नोंदले गेले आहे. उत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून त्यांना सहा राष्ट्रीय पुरस्कारांसह इतर अनेक सन्मान मिळाले आहेत.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या