कोरोना ची कहानी ‘लेट्स राईज अगेन''

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 29 डिसेंबर 2020

आज सायंकाळी गावडे यांच्या हस्ते कला व संस्कृती खात्याच्या कर्मचाऱ्यांनी तयार केलेल्या ५० मिनिटांच्या ‘लेट्स राईज अगेन'' या कोरोनावरील चित्रपटाच्या भित्तीपत्रिकेचे आणि सिडीचे अनावरण करण्यात आले.

पणजी: गोव्याची ओळख, समस्या आणि त्यावर उपाय अशा अनुषंगाने जाणारी चिपत्रटाची कथा आली आणि ती कथाही तेवढीच दमदार असेल तर नक्कीच कला व संस्कृती संचालनालय त्या चित्रपटाच्या निर्मितीसाठी साह्य करेल, असे आश्‍वासन मंत्री गोविंद गावडे यांनी दिले. 

संस्कृती भवन येथील परिषदगृहात आज सायंकाळी गावडे यांच्या हस्ते कला व संस्कृती खात्याच्या कर्मचाऱ्यांनी तयार केलेल्या ५० मिनिटांच्या ‘लेट्स राईज अगेन'' या कोरोनावरील चित्रपटाच्या भित्तीपत्रिकेचे आणि सिडीचे अनावरण करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला संचालनालयाचे संचालक सगुण वेळीप, उपसंचालक अशोक परब, चित्रपट दिग्दर्शक तथा कला व संस्कृती खात्याचे थिएटर आर्टचे शिक्षक जयेंद्रनाथ हळदणकर, गीतकार संतोष शेटकर यांची उपस्थिती होती. 

मंत्री गावडे म्हणाले की, कला व संस्कृती खात्याची ‘लेट्स राईज अगेन'' या चित्रपटाची पहिलीच निर्मिती. या चित्रपटाच्या दिग्दर्शनापासून अभिनयापर्यंत सर्व काम खात्याच्या कर्मचाऱ्यांनी केले आहे. कोरोना या महामारीविषयावर जागृती करणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती कोरोनाच्या काळात करण्यात आली आहे. अनेक अचणींना तोंड देत कर्मचाऱ्यांनी कोविड रुग्णालयात जाऊनही चित्रिकरण केले आहे. कोरोनाविषयी समाजजागृती करण्याचे काम हा चित्रपट करणारा ठरेल. आम्ही चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सर्व समाजमाध्यमांचा वापर करणार आहोत. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा चित्रपट सहभागी करण्यासाठी खाते प्रयत्न करणार आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या चित्रपट निर्मितीसाठी पाठिंबा दिल्याने ही कलाकृती निर्मितीला आल्याचे सांगत गावडे म्हणाले की, इफ्फीसाठी आम्ही कला अकादमीची ठरल्यानुसार जागा देणार आहोत. त्या जागेत रंगरंगोटी, सजावट किंवा आवश्‍यक त्या सोयी इफ्फीच्या व्यवस्थापनास करावी लागणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. याप्रसंगी दिग्दर्शक हळदणकर, संचालक वेळीप यांनी मनोगत व्यक्त केले. उपसंचालक परब यांनी आभार मानले.

संबंधित बातम्या