गोमंतकीय सिनेमांची ‘फिल्म बझार’मध्ये निवड

गोमंतकीय सिनेमांची ‘फिल्म बझार’मध्ये निवड
Goa Films selected as best film in film festivalDainik Gomantak

दोन दिवसांवर आलेल्या इफ्फीतील (IFFI 2021) विविध विभागात निवडलेल्या सिनेमांची (Movies) घोषणा आता होताना दिसत आहे. या दिवसात काही दर्दी सिनेरसिक एनएफडीसी फिल्म बझारमध्ये (Film Festival) निवडलेल्या सिनेमांच्या यादीकडेही डोळे लावून बसलेले असतात. फिल्म बझारातल्या ‘रेकम्डेशन’ विभागात देशभरातील उत्तम अशा फक्त 19 सिनेमांची निवड होत असते. आणि गोमंतकीयांच्या अभिमानाची गोष्ट म्हणजे यावर्षी या विभागात युवा लेखक-दिग्दर्शक मिरांशा नाईकच्या ‘वाट’ या सिनेमाद्वारे गोमंतकीय सिनेमाने मानाचे स्थान मिळवले आहे.(Goa Films selected as best film in film festival)

गेल्या 15 वर्षांपासून इफ्फीमध्ये एनएफडीसीच्यावतीने ‘फिल्म बझार’चे आयोजन करण्यात येते. आशिया खंडातील सिनेमांना यामध्ये प्रामुख्याने स्थान देण्यात येत असते. निवडलेल्या सिनेमांना, त्यांच्या कर्त्यांना जगभरातील मान्यवर सिनेकर्मी मार्गदर्शन करतात. त्याचप्रमाणे हे सिनेमे जगभरातील निर्माते, सहनिर्माते, सिनेमहोत्सव आयोजकांकडून विकतही घेतले जातात. त्यामुळे फिल्म बझारमध्ये सिनेमाची निवड होणे ही कोणत्याही सिनेकर्मीसाठी आनंदाची गोष्ट असते. या पार्श्वभूमीवर संपूर्णपणे गोव्यात तयार झालेल्या ‘वाट’ ह्या मराठी सिनेमाला ‘फिल्म बझार’ने अधिकृतरित्या ‘रेकम्डेशन’ करणे ही महत्वपूर्ण आणि गौरवाची बाब आहे.

मिरांशा नाईकने लिहिलेला अणि दिग्दर्शित केलेला ‘वाट’ हा त्यांचा दुसरा सिनेमा आहे. त्यांचा पहिला कोंकणी सिनेमा ‘जुझे’ देशविदेशातील विविध मानाच्या सिनेमहोत्सवामध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्याला उत्तम प्रतिसादही लाभला होता. एनएफडीसी फिल्म बझारच्या ‘वर्क इन प्रोग्रेस’ आणि सिनेमा पूर्ण झाल्यानंतर ‘रेकम्डेशन’ या दोन्ही विभागात ‘जुझे’ची निवड झाली होती.

Goa Films selected as best film in film festival
म्हणून इफ्फी हवी!

‘वाट’ ह्या सिनेमाच्या पटकथेची निवड काही वर्षांपूर्वी एनएफडीसी फिल्म बझारमध्ये ‘वर्क इन प्रोग्रेस’ या विभागातदेखील निवड झाली होती. त्यावेळी सदर सिनेमाच्या पटकथेचे नाव ‘होली फायर’ असे होते आणि सिनेमा कोंकणी भाषेमध्ये होता. पण मधल्या काळात काही अपरिहार्य कारणांमुळे सिनेमाची भाषा आणि नाव दोन्ही बदलण्यात आले. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर या सिनेमाचे चित्रिकरण गोव्यामध्ये करण्यात आले. तर दुसरी लाट ओसरल्यानंतर फ्रान्समध्ये जाऊन सिनेमाचे संकलन आणि इतर निर्मिती पश्चात बाबी पूर्ण करण्यात आल्या आहेत.

देशभरातून आलेल्या 100 हून अधिक सिनेमांमधून निवडलेल्या १९ चांगल्या सिनेमांमध्ये ‘वाट’ या माझ्या चित्रपटाची वर्णी लागणे, ही माझ्यासाठी आणि आमच्या संपूर्ण टीमसाठी आनंदाची आणि उत्साहाची बातमी आहे. ‘फिल्म बझार रेकम्डेशन’ हा नव्या सिनेकर्मींसाठी महत्त्वाचा मंच आहे. याठिकाणी सिनेमाची निवड झाली तर सिनेमाचा पुढील प्रवास अधिक सुकर होत असतो. अंधश्रध्दा माणसाला कोणत्या स्तरापर्यंत नेऊ शकते, हे आम्ही या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. एनएफडीसीने या सिनेमाला ‘रेकम्डेशन’ दिल्यामुळे हा विषय आम्हाला सर्वदूर नेता येईल.अशा भावना दिग्दर्शक,निर्माता मिरांशा नाईक यांनी व्यक्त केल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com