गोमंतकीय भजनकलेची अंगभूत वैशिष्ट्ये

सुदेश आर्लेकर
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

परंपरा’ आणि ‘नवता’ यांचा सुरेख संगम गोमंतभूमीच्या भजनकलेत प्रकर्षाने दिसून येतो. किंबहुना, शतकानुशतके मराठी भाषेच्या माध्यमातून चालत आलेल्या परंपरेची जोपासना करीत त्यात नावीन्य आणण्याची, स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण भर घालण्याची हातोटी गोमंतकीयांमध्ये आहे.

परंपरा’ आणि ‘नवता’ यांचा सुरेख संगम गोमंतभूमीच्या भजनकलेत प्रकर्षाने दिसून येतो. किंबहुना, शतकानुशतके मराठी भाषेच्या माध्यमातून चालत आलेल्या परंपरेची जोपासना करीत त्यात नावीन्य आणण्याची, स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण भर घालण्याची हातोटी गोमंतकीयांमध्ये आहे. परंपरा आणि नवता यांची सांगड घालूनच ही कला या भूमीत अधिकाधिक वृद्धिंगत होत आहे. गोमंतकीयेतर प्रांतांतील भजन आणि गोमंतभूमीतील भजन याचा अनेक बाबतींत अनुबंध जरूर आहे; तथापि, गोमंतकाच्‍या भजनाची काही अंगभूत वैशिष्ट्ये आहेत. अद्वितीय स्वरूपाच्या त्या वैशिष्ट्यांमुळेच गोव्याच्या भजनकलेला आणि भक्तिपरंपरेला जगाच्या पाठीवर आगळेवेगळे महत्त्व आणि लौकिक प्राप्त झालेला आहे.

उभे राहून भजन करण्याची पद्धत गोव्यात कुठेही नाही. अपवाद फक्त पेडणे तालुक्यातील पालये येथील ’ढोलकी भजन’. पण, ते भजन थोड्या वेगळ्या धाटणीचे आणि ते भजन महाराष्ट्रातील वारकरी पद्धतीच्या भजनाशी व दिंडीशी साधर्म्य दाखवणारे आहे. कदाचित, त्याबाबत काही सांस्कृतिक कारणे असावीत. पालये हा भाग महाराष्ट्राच्या सीमेलगत आहे. पोर्तुगिजांची राजवट अगदी कमी प्रमाणात अर्थात सुमारे दीडशे वर्षे पेडणे तालुक्यावर होती. त्यापूर्वी सावंतवाडी येथील संस्थानची राजवट तिथे होती, हा मुद्दाही आपण त्यासंदर्भात विचारात घ्यावाच लागेल. पालयेतील ढोलकी भजन उभे राहूनच व नाचत-गात टाळ आणि ढोलकी वाजवून केले जाते. ती परंपरा तिथे अजूनही आहे. गोव्यात उभे राहून भजन करण्यासंदर्भातील अन्य एक उदाहरण म्हणजे आरत्यांचे गायन. आरत्यांचे गायन सर्वत्र सर्वधारणपणे उभे राहूनच केले जाते. परंतु, त्याला पूर्णस्वरूपी भजन म्हणता येत नाही. गोव्यात जेव्हा बैठ्या स्वरूपाचे भजन कार्यक्रम होतात, तेव्हा मात्र सर्वसाधारणपणे बसूनच आरतीगायन केले जाते. महाराष्ट्रातही बैठ्या स्वरूपातील भजने होतात. पण, महाराष्ट्रातील बहुतांश भजन कार्यक्रम उभे राहूनच होत असतात.

भजनसम्राट कै. मनोहरबुवा शिरगावकर यांनी गोमंतकीय भजनाला वेगळी बैठक प्राप्त करून दिलेली आहे. त्यांनी दाखवलेल्या मार्गामुळेच गोमंतकीय भजनात भारतीय रागदारी संगीताचा विपुल वापर होत असतो. 

गोमंतभूमीला भजनाची दीर्घकालीन परंपरा लाभलेली आहे. मूळचे पालये-पेडणे येथील असलेले थोर गोमंतकीय संतकवी सोहिरोबानाथ आंबिये, अन्य एक गोमंतकीय संतकवी असलेले गोव्याच्या तिसवाडी तालुक्यातील डोंगरी येथील कृष्णंभट बांदकर, गोव्यातील भजन-सप्ताहांचे प्रवर्तक जगन्नाथबुवा बोरीकर अशा महान विभूतींनी स्वत:च्या योगदानाद्वारे ही परंपरा अधिक भावसमृद्ध केलेली आहे. त्यांच्यानंतरच्या काळात भजनसम्राट कै. मनोहरबुवा शिरगावकर यांनी स्वत:ची वैशिष्ट्यपूर्ण शैली निर्माण करून गोमंतकीय भजनाला वेगळा आयाम दिला. त्यामुळेच ते भजनकलेला वेगळी अशी शिस्तबद्ध बैठक प्राप्त करून देऊ शकले. भजनकलेला त्यांनी कलात्मक साजही चढवला.

ज्याप्रमाणे नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ शोधणे अशक्यप्राय आहे, तद्वत गोमंतकीय भजनाचे कूळ आणि मूळ शोधणे अशक्यप्रायच आहे. तसा प्रयत्न करणे हा व्यर्थ खटाटोप ठरेल. कारण, एखाद्या घटनेबाबतचा खराखुरा इतिहास जाणून घ्यायचा झाल्यास त्यासाठी सर्वप्रथम आवश्यक असतात ती ऐतिहासिक साधने. भजनकलेच्या संदर्भातील पोर्तुगीजपूर्व काळातील कोणतेही साधार पुरावे आज उपलब्ध नाहीत. किंबहुना, पोर्तुगीज आक्रमकांनी त्यासंदर्भातील पुरावे नष्ट केले असण्याचीच जास्त शक्यता वाटते. सोहिरोबानाथ आंबिये, कृष्णंभट्ट बांदकर, जगन्नाथबुवा बोरीकर यांच्यापूर्वीही गोव्यात भजनाची परंपरा होतीच. ती नेमकी कधी सुरू झाली, हे शोधून काढणे तसे प्राप्प परिस्थितीत तसे महाकठीणच आहे. असे कोणतेही पुरावे आज गोमंतकीय भजन परंपरेबाबत उपलब्ध नाहीत. त्यामुळे आपण त्याबाबत कोणतेही ठोस विधान करूच शकत नाही. त्याबाबत आपण केवळ अनुमान व्यक्त करू शकतो.

कै. मनोहरबुवांनी निर्माण केलेला आणि ‘मनोहारी भजनाचा बाज’ या समर्पक नामाभिधानाने सर्वपरिचित असलेला गोमंतकीय भजनाचा वैशिष्ट्यपूर्ण बाज आणखीन समृद्ध करण्यात प्रामुख्याने मनोहरबुवांचे  सहकारी कलाकार नरहरीबुवा वळवईकर, भजनाचार्य सोमनाथबुवा  च्यारी, मनोहरबुवांचे सुपुत्र नाना शिरगावकर, वामनराव पिळगावकर इत्यादी रथी-महारथींचे योगदान न विसरण्याजोगे आहे. अन्य काही महत्त्वाची कलाकार मंडळीही आहे. तथापि, ती प्रतिभावंत कलाकारांची श्रेयनामावली फारच मोठी असल्याने ती सर्व नावे सांगत बसण्याचा मोह मी इथेच आवरता घेतो. गोमंतकाची भजन परंपरा समृद्ध केलेल्या व सध्या करणाऱ्या ऋषितुल्य कलाकारांची नामावली या लेखात देणे शक्य नसले तरी, अशा कलाकारांच्या मांदियाळीमुळे गोमंतकीय भजनाला रुबाबदार अशी झालर प्राप्त झाली आहे, असे कृतज्ञतापूर्वक म्हणावेच लागेल.

संबंधित बातम्या