Manoj Bajpai Birthday: गावात थिएटर नसतांना बघितलं होतं अभिनेता होण्याचं स्वप्न

Manoj Bajpai Birthday: गावात थिएटर नसतांना बघितलं होतं अभिनेता होण्याचं स्वप्न
Happy Birthday Manoj Bajpai had struggled hard to become an actor

मुंबई: अनेक चित्रपटांमध्ये खलनायकांपासून ते कॉमेडीयन पर्यंत मनोज बाजपेयी यांनी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज मनोज बाजपेयी चित्रपटसृष्टीचा एक परिचित चेहरा असला तरी त्यांचा या चित्रपट जगातला प्रवास इतका सोपा नव्हता. मनोज यांचा जन्म 1969 मध्ये पश्चिम चंपारण जिल्ह्यातील नरकटियागंजमधील बेलवा या छोट्याशा गावात झाला.(Happy Birthday Manoj Bajpai had struggled hard to become an actor)

त्याचे वडील शेती करायचे. मनोज बाजपेयी यांनी आयुष्यात खूप संघर्ष केला.
मनोज यांनी आपले शालेय शिक्षण बेतिया जिल्ह्यातील राजा हायस्कूलमधून केले. यानंतर ते सत्यवती महाविद्यालय, त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या रामजस महाविद्यालय पदवीसाठी प्रवेश घेतला. 4 वेळा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश नाकारल्यानंतर त्यांनी बॅरी ड्रामा स्कूलमधील बॅरी जॉनबरोबर थिएटर केले.

मनोज बाजपेयी यांनी आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात दूरदर्शनवर प्रसारित होणार्‍या 'स्वाभिमान' या मालिकेतून केली होती. शेखर कपूरने त्यांना चित्रपटांमध्ये पहिली संधी दिली होती. 1994 मध्ये शेखर कपूरच्या बॅंडिट क्वीनपासून चित्रपटसृष्टीत मनोज यांनी पदार्पण केले होते पण राम गोपाल वर्मा यांच्या 'सत्य' या चित्रपटाद्वारे त्यांना 1998 साली मोठी ओळख मिळाली. 'सत्य' आणि 'शूल' या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला आहे. तर अमृता प्रितम लिखित कादंबरीवर आधारीत 'पिंजार' या चित्रपटातील शानदार अभिनयाबद्दल त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (स्पेशल ज्युरी) देखील मिळाला होता.

अभिनेता व्हायचं आहे, असं मनोज बाजपेयी यांनी बालपणातच ठरवलं होतं. वयाच्या 17 व्या वर्षी त्यांनी मला अभिनेता व्हायचंय अस घोषीत केलं होतं. आधीपासूनच अभिनय करण्याची इच्छा असल्याचे मनोज यांनी सांगितले होते. अमिताभ बच्चन स्टारर फिल्म 'जंजीर' पाहिल्यानंतर त्यांना वाटलं की आता अभिनयाशिवाय इतर काही ते करू शकणार नाही. ज्या काळात त्यांनी अभिनेता होण्याचे स्वप्न पाहिले तेव्हा गावात थिएटर पण नव्हते. पण त्यांनी मनापासून विचार केला होता आणि त्यासाठी त्यांनी साहित्याचा सहारा घेतला होता. 

मनोज बाजपेयी यांचे दोन विवाह झाले आहेत. त्यांचे पहिले लग्न 1990 साली झाले होते. तथापि, त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही. त्यानंतर त्यांनी 2006 साली बॉलिवूड अभिनेत्री शबाना रझासोबत लग्न केले. शबानाला नेहा या नावानेही ओळखले जाते. त्यांना एक मुलगीही झाली आहे आणि आता ते दोघेही आपल्या मुलीसोबत खूप आनंदी आहेत. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com