Hava Maryam Ayesha लेकी अफगाणिस्तानच्या

आणि काबूलच्या चित्रपटसृष्टीत सन्नाटा पसरत गेला.
Hava Maryam Ayesha
Hava Maryam AyeshaDainik Gomantak

तालिबान (Taliban) नामक वावटळ अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) पुन्हा घुसल्यानंतर परागंदा व्हावे लागलेल्या दोन अफगाणी चित्रपट निर्देशिकांची (Film director) कहाणी 2019 च्या ‘इफ्फी’च्या (Iffi) सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून जागतिक स्तरावरच्या पन्नास महिला-दिग्दर्शकांच्या चित्रपटांचा ‘वर्ल्ड पॅनोरामा’ (World Panorama) या विभागात खास समावेश करण्यात आला होता.

या पन्नासजणींमध्ये अभिमानाने खडी होती अफगाणिस्तानच्या ‘हावा, मरियम, आयेशा'' (Hava Maryam Ayesha) या चित्रपटाची निर्माती - दिग्दर्शक सारा करिमी आणि ‘कुरुत’ या लघुपटाची दिग्दर्शक शहरबानू सादात. अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपल्या कलाकृतींद्वारा चमकलेल्या, पुरस्कार मिळवून आपल्या मायभूमीचे नाव रोशन करणाऱ्या या चित्रकर्मी आज कुठे आहेत? धर्मांध तालिबानींच्या हातात गेलेल्या मायभूमीतून परागंदा होत, निर्वासित बनून परक्या देशात आश्रय घेणे त्यांच्या नशिबी आले आहे. आज त्या सुखरूप आहेत म्हणून सुटकेचा, आनंदाचा श्वास घेता येतोय, पण उद्या त्या कुठल्याही देशात आश्रयाला गेल्या तरी तालिबानी संस्कृती त्यांना सुरक्षित जगू देईल का?

Hava Maryam Ayesha
तालिबानच्या भीतीने गायक गायण सोडून विकायला लागला भाजी

मूळच्या अफगाणवंशीय असल्या तरी सारा आणि शहरबानू जन्मल्या तेहरानमध्ये. साराला साधारण समजू लागले त्या काळात अफगाणिस्तानमध्ये तालिबानी हुकूमत प्रस्थापित झाली. स्त्रियांना शरियानुसार तयार करण्यात आलेल्या या नियमांचे पालन करण्याची सक्ती करण्यात आली. अनेक कठोर नियमांमध्ये अफगाणी स्त्रीचे जिणे जखडले गेले.

तालिबानी आदेशांचा अवमान केल्यामुळे भारतीय लेखिका सुष्मिता बॅनर्जीची हत्या करण्यात आली, हेही इथे आठवल्यावाचून राहात नाही. 1995 मध्ये सुष्मिता तालिबानने फर्मावलेल्या फाशीच्या फर्मानांमधून निसटून, जीव बचावून भारतात पळून आली होती. तिचे ‘काबुलीवालेर बंगाली बोहू’ हे आत्मकथन गाजले; पुढे तिने ‘तालिबानी अत्याचार : देशो-बिदेशे’, ‘मुल्ला ओमार, तालिबान ओ आमि’ अशी पुस्तके लिहून अफगाणी स्त्रियांच्या दुःख वेदनेला वाचा फोडली. ‘काबुलीवालेर’वर ‘एस्केप फ्रॉम तालिबान’ हा चित्रपटही निर्माण झाला. पण, पुढे जेव्हा ती सासरी परत गेली, तेव्हा तालिबान्यांनी तिचे अपहरण करून हत्या केली. तिचे प्रेत गावाबाहेर सापडले, तिला वीस गोळ्या घालण्यात आल्या होत्या.

Hava Maryam Ayesha
Afghanistan Crisis: अफगानी पॉप स्टारचा खुलासा, पाकिस्तानने तालिबान्यांना दिला दुजोरा

हे ऐतिहासिक वास्तव बघत, या मुली मोठ्या होत होत्या. त्यातल्या त्यात सुदैव एवढेच की त्यांचे शिक्षण थांबले नाही. साराने ब्रॅटिस्लावामधल्या म्युझिक ॲण्ड परफॉर्मिंग आर्टस् अकादमीतून चित्रपटविषयक पीएचडी पदवी प्राप्त केली. तिचे मन मायभूमीच्या ओढीने तिला काबूलला परत घेऊन आले. तिने स्वतःची मल्टिमीडिया कंपनी सुरू केली, त्याद्वारे तीस लघु/माहितीपटांची निर्मिती -दिग्दर्शन केले. तिच्या लघु /माहितीपटांनी अनेक पुरस्कार पटकावून अफगाणिस्तानला प्रगत चित्रपटदृष्टी असणाऱ्या चित्रकर्मींची कर्मभूमी म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशझोतात आणले. 2019 साली ती अफगाण फिल्म या सरकारी आस्थापनेची पहिली महिला अध्यक्ष बनली. या पदासाठी तिला चार पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरावे लागले होते. सारापुढे मोठे आव्हान खडे होते. जर आम्हीच आमच्या कथा सांगितल्या नाहीत, तर इतर लोक त्या कशा सांगतील, ही भूमिका घेऊन ती कामाला लागली होती.

शहरबानूनेही आपल्या मातीतल्या माणसांना भेडसावणाऱ्या समस्या केंद्रस्थानी असणारे विषय निवडून, त्यावर ‘नॉट अॅट होम’, ‘वुल्फ ॲण्ड शीप’, ‘ऑर्फनेज’ हे लघुपट बनवले. 2019 साली ‘इफ्फी’त प्रदर्शित झालेल्या ‘द इंटरडिपेन्डन्स’ या शृंखलेद्वारा माणूस आणि निसर्गामधल्या बनत्या-बिघडत्या नातेसंबंधांचे, हवामान बदलाच्या संकटाचे आणि त्यातून उत्तरे शोधण्याच्या प्रयत्नांची चित्रणे सादर करणारे जे 11 लघुपट होते, त्यात शहरबानूच्या ‘कुरुत’चा समावेश होता. असाच दृष्टिकोन साराच्या पहिल्या ‘हावा, मरियम, आयेशा’ या चित्रपटातही दिसून येतो.

अशी या दोघींची कारकीर्द सुरू होती, पण अमेरिकेतल्या सत्तापालटानंतर सगळे चित्र बदलले. नव्या राष्ट्राध्यक्षांनी अफगाणिस्तानातले आपले सैन्यदल माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला. तालिबानी वादळ पुन्हा एकदा काबूलच्या दिशेने चाल करून येणार ही चिन्हे स्पष्ट दिसू लागल्यामुळे काबूलच्या चित्रपटसृष्टीत सन्नाटा पसरत गेला.

-यशोधरा काटकर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com