अभिनेत्रीचे बनावट इन्स्टाग्राम, यू-ट्युब खाते

अवित बगळे
बुधवार, 22 जुलै 2020

आणखी दोन कंपन्या पोलिसांच्या रडारवर

मुंबई

अभिनेत्री कोयना मित्राने आपल्या नावाने इन्स्टाग्राम व यू-ट्युबवर बनावट खाते सुरू असल्याची तक्रार मुंबई पोलिसांकडे केली आहे. यापूर्वी बॉलीवूड गायिका भूमी त्रिवेदीने अशाच प्रकारची तक्रार मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडे केली होती. कोयना मित्राप्रकरणी पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली असून त्याचा शोध सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, समाज माध्यमावर बनावट खाते, फॉलोअर्स तयार करणाऱ्या आणखी दोन कंपन्या पोलिसांच्या रडारवर आल्या आहेत.
अशा कंपन्या बनावट खाते तयार करून त्यावर बनावट फॉलोअर्स, लाईक्‍स व कमेंट तयार करतात. काही दिवसांपूर्वीच याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणी तपास करणाऱ्या विशेष पथकाने आणखी दोन कंपन्यांची ओळख पटवली असून त्याही समाज माध्यमांवर बनावट खाते तयार करत असल्याचा संशय आहे. 11 जुलै रोजी प्रसिद्ध गायिका भूमी त्रिवेदीने तिचे अशापद्धतीचे बनावट खाते तयार केल्याची तक्रार पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडे केली होती. आता कोयना मित्रानेही ओशिवरा पोलिसांकडे अशी तक्रार केली आहे.

36 हजारांहून अधिक फॉलोअर्स
विशेष म्हणजे कोयना मित्राच्या बनावट इन्स्टाग्राम खात्याचे 36 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. या खात्याच्या माध्यमातून माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रकार होऊ शकतो, अशी मला भीती कोयनाने तक्रारीत व्यक्त केली आहे. याशिवाय यू-ट्युबवरही अशाच पद्धतीने कोयनाच्या नावाने खाते तयार करण्यात आले असून त्यात अश्‍लील चित्रफिती आहेत. हे प्रकरण आता गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाकडे सोपवण्यात आले आहे.

संबंधित बातम्या