होम मिनिस्टरना घरातच पैठणी जिंकण्याची संधी

Dainik Gomantak
बुधवार, 3 जून 2020

आदेशभावोजी साधणार व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क

मुंबई

लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू झाला आहे. अशा वेळी महिलांना घरबसल्या पैठणी जिंकण्याची संधी मिळाली आहे. होम मिनिस्टरसाठी ही आनंदाची बातमी आणली आहे आदेशभावोजींनी.
झी मराठी वाहिनीवरील "होम मिनिस्टर' या कार्यक्रमाचे यंदा 16 वे वर्ष आहे. हा कार्यक्रम कमालीचा लोकप्रिय ठरला आहे. सूत्रसंचालक आदेश बांदेकर यांनी या कार्यक्रमातील गंमत दिवसेंदिवस वाढवत नेली. या कार्यक्रमामुळे तमाम वहिनीसाहेबांचे ते लाडके भावोजी ठरले. या लोकप्रिय कार्यक्रमात महिलांना घरच्या घरी पैठणी जिंकण्याची संधी मिळणार आहे. आता नवीन भागांची संपूर्ण तयारी झाली आहे. "घरच्या घरी' या विशेष भागात आदेश बांदेकर व्हिडीओ कॉलद्वारे प्रेक्षकांशी संपर्क साधणार आहेत.
एका वेळेला फक्त एका कुटुंबात जाता येत होते. आता लॉकडाऊनमुळे अनेक जणांना भेटता येत आहे. सगळे आपापल्या घरांत आहेत. मी माझ्या घरातून थेट सगळ्या घरांत फिरून येत आहे. सध्या सगळीकडे नकारात्मक वातावरण आहे. अशा परिस्थितीत "होम मिनिस्टर' आनंद पसरवणार आहे, असे आदेश बांदेकर म्हणाले.

घरातच चित्रीकरण
सध्या चित्रीकरण बंद असल्यामुळे कार्यक्रमाचे काही जुने भाग दाखवण्यात येत होते. आता "वर्क फ्रॉम होम' पद्धतीने चित्रीकरण सुरू झाले आहे. आदेश बांदेकर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधून महिलांना प्रश्‍न विचारणार आहेत.
 

संबंधित बातम्या