IFFI 2021 उद्‌घाटन सोहळ्यातील ते अभिमंत्रित चार क्षण

जेष्ठ मार्टीन स्कोर्सेसी, सत्यजीत रेंबद्दल जे बोलले ते ऐकून प्रत्येक भारतीय चित्रपट रसिकांचा उर अभिमानाने भरून आला असेल.
IFFI 2021 उद्‌घाटन सोहळ्यातील ते अभिमंत्रित चार क्षण
IFFI 2021 उद्‌घाटन सोहळ्यातील ते अभिमंत्रित चार क्षण Dainik Gomantak

इफ्फी च्या परवाच्या डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर होणाऱ्या शुभारंभाच्या कार्यक्रमात सर्वात हृद्य क्षण कुठले होते तर जेव्हा, या सोहळ्यात ‘सत्यजित रे जिवनगौरव पुरस्कार’ मिळाल्यानंतर सन्माननीय सिनेमा दिग्दर्शक मार्टिन स्कोर्सेसी आणि इस्तेवान झाबो यांनी आपले आभाराचे शब्द प्रकट करताना श्रेष्ठ भारतीय चित्रपट दिग्दर्शक सत्यजीत रे यांच्यासंबंधाने काढलेल्या आठवणी. जेष्ठ मार्टीन स्कोर्सेसी, सत्यजीत रेंबद्दल जे बोलले ते ऐकून प्रत्येक भारतीय चित्रपट रसिकांचा उर अभिमानाने भरून आला असेल. ते म्हणाले, मी ‘पाथेर पांचाली’ हा त्यांचा चित्रपट पाहिला आणि त्यांच्या चित्रपटांबद्दल माझे प्रेम सुरु झाले. पश्‍चिमी जगात वाढलेल्या माझ्यासारख्यासाठी हा एक नवीन अनुभव होता. एक नवीन जग माण्यासाठी उघडत होते. रे माझ्यासाठी एक ‘मास्टर्स’ होते. रे हे असे चित्रपट दिग्दर्शक होते की ज्यांचे काम मी अनेक वर्षे माझ्या चित्रपटांतून गिरवित आलो आहे.

मार्टीन स्कोर्सेसी, रे यांच्या चित्रपटातून वापरण्यात येणाऱ्या पार्श्वसंगीताबद्दल देखील भरून बोलले. ते म्हणाले, पाथेर पांचालीसाठी रविशंकरनी जे संगीत एका विलक्षण स्फुर्तीने तयार केले होते त्याची एक रिकॉर्ड त्यांना मिळाली. स्कोर्सेसी ती घेऊन आपल्या पालकांकडे गेले. स्कोर्सेसीचे पालक मध्यमवर्गीय कुटुंबातले हाेते. त्यांनी तशाप्रकारचे संगीत पूर्वी कधीच एेकले नव्हते. स्कोर्सेसी त्यांच्यासाठी घेऊन आलेले संगीत ऐकून त्यांना फार आनंद झाला होता. स्कोर्सेसी असेही म्हणाले, त्यांच्या चित्रपटांच्या पार्श्वसंगीतावरही सत्यजित रे यांच्या चित्रपटातल्या पार्श्वसंगीताचा प्रभाव आहे.

पुढे मार्टीन स्कोर्सेसी सत्यजित रे यांच्या चित्रपटांबद्दल जे बोलले ते खरोखरीच फार हर्षभरीत करणारे होते. ते म्हणाले, “आपण सत्यजित रे यांचे चित्रपट नेहमीच आपल्याबरोबर बाळगताे. जेव्हा जेव्हा त्यांना एकाग्र व्हायचे असते, तेव्हा ते रे यांचे चित्रपट पुन्हा पाहतात. त्यांच्याकडे रे यांचे सारेच चित्रपट आहेत. जरी त्यांनी ते सारेच पाहिलेले नसले तरी.” मार्टीन स्कोर्सेसींनी आपल्या मुलीला, ती 12 - 13 वर्षांची होती तेव्हा ‘पाथेर पंचाली’ दाखविला. स्कोर्सेसीसाठी तो एक भावनिक क्षण होता. स्कोर्सेसींना वाटते की, त्यामुळे नक्कीच त्यांच्या मुलीचा जगाबद्दलचा आणि दुसऱ्या संस्कृतीबद्दलचा दृष्टीकोन बदलून गेला असेल. त्यांची मुलगी आता 22 वर्षांची आहे.

IFFI 2021 उद्‌घाटन सोहळ्यातील ते अभिमंत्रित चार क्षण
दुसऱ्या घटस्फोट नंतर तिसऱ्या लग्नाच्या तयारीत आमिर खान..!

हंगेरीयन चित्रपट दिग्दर्शक इस्तेवान झाबो यांनी देखील सत्यजित रे यांच्याबद्दल आपल्या आठवणी सांगितल्या. सत्यजीत रे यांना झाबो भारतात भेटले. सत्यजीत रे हे त्यांना जेवायला घेऊन गेले होते. झाबो सांगतात, ‘सत्यजीत रें बरोबर घालवलेला तो एक तास फार अपूर्व असा होता. “सिनेमाबद्दल आम्ही चर्चा करत होतो. आणि या माध्यमांच्या एका सखोल जाणिवेत आम्ही उतरलो होतो.” झाबो आणि स्कोर्सेसी या सोहळ्यात स्वतः जरी हजर राहू शकले नसले तरी त्यांनी रिकॉर्ड करून पाठवलेल्या त्यांच्या या भावनांनी कालचा सोहळा खऱ्या अर्थाने अनुपम झाला. बाकी त्या साऱ्या कचकडी आणि तोंडदेखल्या एकमेकांच्या स्तुतीच्या त्या कृत्रिम देखाव्यात, हे अवघे क्षण तेवढे भारतीयांच्या कृतार्थतेचे होते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com