करचुकवेगिरीप्रकरणी तापसी पन्‍नू व अनुराग कश्‍यपची आयकर विभागाकडून रात्री उशीरापर्यंत चौकशी

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 4 मार्च 2021

आयकर विभागाच्या आयटी सेलने बुधवारी बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यासह त्यांच्या भागीदारांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकले.

मुंबई : आयकर विभागाच्या आयटी सेलने बुधवारी बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यासह त्यांच्या भागीदारांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकले. फॅंटम फिल्म्सविरूद्ध कर चुकवण्याच्या चौकशीअंतर्गत छापे टाकण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई आणि पुणे येथे 30 ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. दुसरीकडे आयकर विभागाने तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप यांची बुधवारी रात्री उशीरापर्यंत करचुकवेगिरी प्रकरणात चौकशी केली आहे. हे छापासत्र आजही सुरू राहू शकते अशा चर्चा आहेत. बुधवारी प्राप्तिकर विभागाची ही कारवाई रात्री उशिरापर्यंत चालली. छापा टाकणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले, कागदपत्रे आणि संगणक इत्यादी उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.

तापसी पन्नू,अनुराग कश्यप यांच्याविरोधात आयकर विभागाची छापेमारी

तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप दोघेही बर्‍याच राजकिय-सामाजिक मुद्द्यांवरील मतं खुलेपणाने व्यक्त करतात. दोघेही सध्या पुण्यात शूटिंग करत आहेत. इतर ज्यांच्यावर छापे टाकण्यात आले होते त्यात फॅंटम फिल्म्स प्रॉडक्शन हाऊसच्या काही कर्मचार्‍यांचा समावेश आहे, जे 2018 मध्ये बंद पडले. यात तत्कालीन प्रमोटर कश्यप, दिग्दर्शक-निर्माता विक्रमादित्य मोटवाने, निर्माता विकास बहल आणि निर्माता-वितरक मधु मंटेना यांचा समावेश आहे.

The Girl on The Train अ‍ॅक्टिंगपासून ते डायरेक्शन पर्यंत घसरली चित्रपटाची गाडी

प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, या प्रॉडक्शन हाऊसमधील काही व्यवहार विभागाच्या नजरेत होते आणि कर चुकवल्याच्या आरोपाअंतर्गत चौकशीसाठी पुढील पुरावे गोळा करण्यासाठी ही कारवाई केली गेली. फॅंटम फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या चित्रपटांमधून मिळालेल्या कमाईचीही चौकशी केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांनी 2018 मध्ये आलेल्या 'मनमर्जियां' या चित्रपटात एकत्र काम केले होते आणि आता ते 'दोबारा' या नव्या चित्रपटात एकत्र काम करत आहेत.
 

संबंधित बातम्या