उद्यापासून राजधानीत 'इफ्फी'चा माहोल

शनिवारपासून मांडवी तीरावर रंगणाऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवाची (International Film Festival of India) अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
उद्यापासून राजधानीत 'इफ्फी'चा माहोल
International Film Festival of IndiaDainik Gomantak

पणजी : शनिवारपासून मांडवी तीरावर रंगणाऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवाची (International Film Festival of India) अधिकृत घोषणा करण्यात आली असून, राज्यात 20 नोव्हेंबरपासून पुढील आठ दिवस इफ्फीचा माहौल अर्थात ‘सिनेमांचे दिवस’ असतील.

कोरोनामुळे (Covid-19) जानेवारी 2021प्रमाणेच नोव्हेंबरमध्ये होणारा हा इफ्फीदेखील हायब्रीड प्रकारामध्ये होणार असून यावर्षी 73 देशांतील विविध भाषांतील सुमारे 148 सिनेमांचा आस्वाद सिनेरसिकांना घेता येणार आहे. त्याचप्रमाणे यावर्षीचा इफ्फी ‘आझादी का अमृत महोत्सव’, आणि ‘गोवा अ‍ॅट 60’ या संकल्पनेवर साजरा होणार असल्याची घोषणा सिनेमहोत्सव संचलनालयाचे प्रमुख चैतन्य प्रसाद यांनी गोवा मनोरंजन सोसायटीतील पत्रकार परिषदेमध्ये केली. यावेळी गोवा मनोरंजन सोसायटीचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

International Film Festival of India
IFFI 2021: द पॉवर ऑफ द डॉग

दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी इफ्फीचा उद्घाटन सोहळा श्‍यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये होणार असून, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. उदघाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन सिनेनिर्माता करण जोहर आणि मनीष पॉल करणार आहेत. उद्घाटन कार्यक्रमानंतर पणजी आयनॉक्स येथे ‘किंग ऑफ द वर्ल्ड’ या सिनेमाने महोत्सवाचा पडदा उघडणार आहे. यावर्षी इफ्फीमध्ये बॉलिवूडमधील अभिनेते सलमान खान, रणवीर सिंग, श्रध्दा कपूर, रितेश देशमुख, जेनेलिया डिसोझा, राशी खन्ना, मोनी रॉय आदींसह इतर कलाकार उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, उद्घाटन कार्यक्रमामध्ये प्रसिध्द अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमामालिनी तसेच गीतकार प्रसून जोशी यांना इंडियन फिल्म पर्सनॅलिटी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी शिमला येथे केली.

‘ओटीटी’ माध्यमांना विशेष स्थान

कोरोना काळात देशभरात आणि जगभरात ओटीटी माध्यमावरून सिनेमा पाहण्याच्या संख्येत झालेली लक्षणीय वाढ लक्षात घेत यावर्षीच्या इफ्फीमध्ये ओटीटी माध्यमांना विशेष स्थान देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे इफ्फीच्या अधिकृत आभासी पडद्यावरूनही निवडक सिनेमे आणि मास्टर क्लास यांचे प्रसारण होणार आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com