भारतातर्फे मल्याळम चित्रपट ‘जल्लिकट्टू’ऑस्करच्या शर्यतीत

भारतातर्फे मल्याळम चित्रपट ‘जल्लिकट्टू’ऑस्करच्या शर्यतीत
Malayalam film jallikattu is the official entry of India for Oscar awards

नवी दिल्ली : कत्तलखान्यातून पळून गेलेल्या रेड्याची आणि त्याला पकडण्यासाठी धडपड करणाऱ्या गावकऱ्यांची कथा रंगविणाऱ्या ‘जल्लिकट्टू’ या मल्याळी भाषेतील चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारांसाठी भारतातर्फे अधिकृतरित्या नामांकन देण्यात आले आहे. लिजो जोस पेलिसरी यांनी तो दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात अँटनी वर्गीस या अभिनेत्याची प्रमुख भूमिका आहे. 

‘जल्लिकट्टू’ चित्रपट केरळमध्ये गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित झाला होता. तो गेल्याच वर्षी टोरांटो आणि बुसानमधील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही दाखविण्यात आला होता. या दोन्ही महोत्सवात चित्रपटाला दर्शकांची आणि परीक्षकांची पसंती मिळाली होती. याच चित्रपटासाठी पेलिसरी यांना ‘इफ्फी’मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचे पारितोषिक मिळाले होते. भारतातर्फे ऑस्करसाठी पाठविण्यात आलेला हा दुसरा मल्याळी चित्रपट आहे. याआधी २०११ मध्ये ‘अदमिंते मकन अबु’ हा चित्रपट पाठविण्यात आला होता. गेल्या वर्षी झोया अख्तर यांच्या ‘गली बॉय’ची भारतातर्फे निवड झाली होती. मात्र, ऑस्करच्या अंतिम नामांकन यादीत आतापर्यंत केवळ मदर इंडिया (१९५७), सलाम बाँबे (१९८८) आणि लगान (२०११) हे तीनच भारतीय चित्रपट पोहोचले आहेत. कोरोना पार्श्वभूमीमुळे दरवर्षी प्रमाणे फेब्रुवारीत न होता यंदाचा पुरस्कार सोहळा २५ एप्रिल २०२१ ला होणार आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com