'ब्लॅक पँथर' स्टार चडविक बोसमन यांचे 43 व्या वर्षी निधन

पीटीआय
रविवार, 30 ऑगस्ट 2020

कॅडविक बोस्मनचे कर्करोगामुळे निधन, सिनेजगतावर शोककळा

लॉस एंजेल्स: ‘ब्लॅक पॅंथर’प्रमाणेच अनेक हॉलिवूडपटांमध्ये स्वतःच्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटविणारा युवा अभिनेता कॅडविक बोस्मन (वय ४३) याचे आज आतड्याच्या कर्करोगामुळे निधन झाले. मागील चार वर्षांपासून कॅडविकचा या आजाराशी संघर्ष सुरू होता अशी माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी दिली. 

आज त्याच्याच कुटुंबीयांनी ट्विटरवर एक निवेदन प्रसिद्ध करून निधनाची माहिती दिली. बोस्मनला २०१६ मध्ये कर्करोगाचा आजार जडला होता. बोस्मनचे निधन झाले तेव्हा त्याच्यासोबत त्याचे पत्नी आणि अन्य कुटुंबीय देखील उपस्थित होते.

कॅडविकच्या कुटुंबीयांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, ‘‘ तो खरा लढवय्या होता, त्याच्या अनेक चित्रपटांवर चाहत्यांनी मनापासून प्रेम केले.’’ अनेक जटिल शस्त्रक्रिया आणि केमोथेरपीला सामोरे जात कॅडविकने ‘मार्शल’, ‘दा ५-ब्लड्स’, ‘मा रेनीज ब्लॅक बॉटम’ या चित्रपटांचे चित्रीकरण पूर्ण केले होते. कॅडविकच्या कुटुंबीयांनी त्याच्यावर प्रेम करणाऱ्या लाखो चाहत्यांचे आभार मानत या कठीण काळामध्ये देखील आमचा खासगीपणा जपला जावा अशी विनंती  केली आहे. कॅडविकच्या निधनानंतर हॉलिवूडमधील अनेक दिग्गज अभिनेत्यांनी शोक व्यक्त केला असून सिनेजगतावर शोककळा पसरली आहे

दिग्दर्शनाचे उच्च शिक्षण
कॅरोलिन आणि लेरॉय बोस्मन या आफ्रिकी आणि अमेरिकी दाम्पत्याच्या पोटी कॅडविकचा जन्म झाला होता, पुढे त्याने दिग्दर्शन क्षेत्राचे उच्च शिक्षण घेत हॉवर्ड विद्यापीठातून पदवी घेतली होती.  लंडनमधील ब्रिटिश अमेरिकी ड्रामा अकॅडमी आणि न्यूयॉर्कमधील डिजिटल फिल्म अकॅडमीमध्येही त्याने चित्रपटक्षेत्राशी निगडित उच्च शिक्षण घेतले होते. सुरुवातीला नाट्य  मार्गदर्शक म्हणून  काम केल्यानंतर कॅडविकने अभिनय क्षेत्रामध्ये पूर्णवेळ करिअर करण्यासाठी लॉस एंजेल्स गाठले होते.

रुपेरी पडद्यावरील कारकिर्द
‘थर्ड वॉच’ या छोट्या मालिकेच्या माध्यमातून कॅडविकने २००३ मध्ये लहान पडद्यावर पदार्पण केले. पुढे ‘लॉ अँड ऑर्डर’, ‘सीएसआयः एनवाय’ आणि ‘इआर’ या लोकप्रिय शोच्या माध्यमातून  त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ‘दि एक्स्प्रेसः दि एर्नी डेव्हिस स्टोरी’ हा २००८ सालचा त्याचा स्पोर्ट ड्रामा लक्षवेधी ठरला.२०१२ साली रिलीज झालेल्या ‘दि किल होल’ या चित्रपटामध्ये तो सर्वप्रथम मुख्य भूमिकेत दिसला. ‘४२’ या चित्रपटामध्ये त्याने बेसबॉलपटू जॅकी रॉबिन्सन याची साकारलेली भूमिका विशेष गाजली होती. जेम्स ब्राउन यांच्या जीवनावर आधारित ‘गेट ऑन अप’ या चित्रपटामध्येही त्याने काम केले होते. पण ‘ब्लॅक पँथर’मधील भूमिकेने त्याला जागतिक ओळख दिली. २०१६ मध्ये आलेला ‘कॅप्टन अमेरिकाः सिव्हिल वॉर’ या चित्रपटामुळे कॅडविक घराघरांत पोचला. कॅडविकच्या ‘ब्लॅक पँथर’ने इतिहास रचला होता, या चित्रपटाने १.३ अब्ज डॉलरची कमाई केली होती, यामुळे कॅडविक सुपर हिरो बनला. या चित्रपटाला ऑस्करचे नामांकन देखील मिळाले होते.

संबंधित बातम्या