संगीतातील मधुरस्वर!

.
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

माझे गाणे म्हणजे परमेश्वराची सेवा, असे म्हणणाऱ्या पंडित जसराज यांच्याशी माझा स्नेह साठ वर्षांहून अधिक काळापासून होता. गुणीदास संगीत संमेलनापासून सुरू झालेला आमच्या मैत्रीचा प्रवास, जसराज यांच्या जाण्याने आता थांबला आहे. नादमधुरस्वर हे त्यांच्या गायकीचे वैशिष्ट्य होते. त्यांनी आपल्या स्वरांनी संगीताला वेगळी उंची प्राप्त करून दिली. - पंडित शिवकुमार शर्मा

गुणीदास संगीत संमेलनात १९५५ मध्ये आमची पहिली भेट झाली आणि तेव्हापासून आमची ओळख आहे. आम्ही खूप चांगले मित्र होतोच पण, पंडित जसराज हे मला बंधूसमान होते. गेली कित्येक वर्ष आमची ओळख आहे. त्यांच्या जाण्याने शास्त्रीय संगीतात एक पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे जाणे हे आपले खूप मोठे नुकसान आहे. त्यांनी संगीत विश्वात स्वतःचे एक अढळ स्थान निर्माण केले. त्यांचे संगीत हे शास्त्रीय होते आणि आध्यात्मिकही होते.

शास्त्रीय संगीतात प्रत्येक रागाचा एक स्वभाव आहे. गायकीचे शब्द त्या त्या रागात बसवले तर, त्याच्यातून अनोखी रसउत्पत्ती होते आणि ज्याला गायनातील अंग कमी आहे अशा व्यक्तीला ते संगीत भावतं. पंडितजींनी तेच केलं. त्या त्या रागानुसार तो तो रस निर्माण करणारे शब्द रागात वापरून ते गायले. त्यामुळे शास्त्रीय संगीताला एक वेगळी उंची प्राप्त झाली. त्यांच्या आवाजात एक मधुरता होती. असा एकही पुरस्कार नाही जो त्यांना मिळाला नाही. अगदी पद्मविभूषणपर्यंत असंख्य पुरस्कार त्यांना प्राप्त झाले. त्यांचे नाव जसराज आणि एका सरकारकडून त्यांना ‘रसराज’ हा पुरस्कार मिळाला होता. कारण पंडितजी रागाच्या स्वभावानुसार रस निर्माण करणारे शब्द वापरून तो राग गायचे आणि श्रोतेदेखील त्या रसात रंगून जायचे. म्हणून त्यांना तो पुरस्कार दिला. 

अगदी शेवटच्या दिवसापर्यंत ते आपल्या शिष्यांना शिकवत होते. दुसऱ्या देशातील शिष्यांना ते ऑनलाइन शिकवायचे. कोणताही आजार नाही, औषधोपचार नाहीत, एखाद्या ऋषीमुनींप्रमाणे त्यांनी आपले प्राण सोडले आहेत. ते आता या जगात नाहीत परंतु, त्यांचे संगीत कायमच अजरामर राहील. 

संगीताच्या विविध प्रकारांवर त्यांनी खूप संशोधन केले. हवेली संगीतावर त्यांनी बरंच काम केलं. हवेली संगीत जे मंदिरांमधून गायले जात असे, त्यांनी ते मंचावरील शास्त्रीय गायनात आणले. यासारखे अनेक प्रकार त्यांनी शास्त्रीय संगीतात आणले. ते ख्याल आणि भजनं गात असत. त्यांच्या आवाजात एक जादू होती. असे कलाकार फार कमी निर्माण होतात. ते असे शास्त्रीय गायक होते ज्यांनी अमेरिकेला जाऊन शास्त्रीय गायनावर खूप काम केलं. तिथे त्यांनी शास्त्रीय गायनाच्या अनेक शाळा सुरू केल्या. अनेक प्रदेशात त्यांनी शास्त्रीय संगीताचा प्रसार केला. आम्ही अनेक वेळा एका मंचावर गायलो आहोत. ते शुद्ध शाकाहारी होते. त्यांचं खाणं हे अगदी वेळेवर असायचं. ते कोणत्याही कामात वेळेला फार महत्त्व द्यायचे. ते फार आध्यात्मिक होते. मनापासून आणि नित्यनियमाने देवाची पूजापाठ करायचे. ते कायम सगळ्यांच्या स्मरणात राहतील आणि त्यांच्या संगीतातून ते नेहमीच आपल्यासोबत असतील.

मी १९६२ मध्ये मुंबईत आलो तेव्हापासून पं. जसराज आणि माझे जिव्हाळ्याचे नाते होते. आम्ही खूप कार्यक्रम एकत्र केले. पुण्यात झालेला कार्यक्रम अजूनही स्मरणात आहे. त्यांचा आवाज भारदस्त होता आणि वाघासारखे मैफलीत गायचे ते. - पं. हरिप्रसाद चौरसिया 

शास्त्रीय संगीतातील एक स्तंभ आज निखळला आहे. त्यांना मी कित्येक वेळा भेटलो आहे आणि त्या भेटीत आमच्या नेहमी संगीतावर चर्चा व्हायच्या. ते नेहमी  आम्हाला प्रेरणा द्यायचे. त्यांची मुलगी दुर्गाबेनच्या (दुर्गा जसराज) कार्यक्रमाला ते यायचे आणि तल्लीन होऊन जायचे. -उस्ताद रशीद खान

संबंधित बातम्या