शास्त्रीय गायक पं. जसराज यांचे अमेरिकेत निधन

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

गुरूजी नाहीत‌ यावर अजूनही विश्वास बसत नाही. ते माझे दैवत होते. जेव्हा जेव्हा गातो,‌ त्यावेळी ते मला आठवत. आमच्यातील नातं हे आत्मिक होते. आमचं नातं खूप घट्ट होतं. गुरूजींनी चार-पाच‌ दशकं‌ रसिकांना आनंद दिला आणि या काळातील गायकांना देखील खूप दिले. त्यामुळे शतकातील एक अनमोल कलावंत होते. त्यांची जागा भरून काढणारं ते असतानाही कुणी नव्हतं. - पं. संजीव अभ्यंकर

नवी दिल्ली/ न्यूजर्सी: हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताभोवती स्वर्गीय अशा भक्तीरसपूर्ण सुरांची आरास उभी करणारे, मेवाती घराण्याचे संगीतमार्तंड पंडित जसराज (वय ९०) यांनी आज अमेरिकेतील न्यूजर्सीमध्ये अखेरचा श्‍वास घेतला. स्थानिक प्रमाणवेळेनुसार आज पहाटे ५ वाजून १५ मिनिटांनी जसराज यांचे हृदविकाराच्या झटक्याने निधन झाले अशी माहिती त्यांची कन्या दुर्गा जसराज यांनी दिली.

पंडित जसराज यांच्यामागे पत्नी मधुरा, संगीतकार पुत्र शारंगदेव आणि मुलगी दुर्गा आहेत. पंडित जसराज यांच्या निधनानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, नितीन गडकरी आदी मान्यवरांसह कला, संगीतक्षेत्रातील अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. 

हरियानातील हिसार जिल्ह्यातील पिली मांडोरी खेड्यामध्ये जन्मलेल्या पंडितजींनी बालवयातच संगीताचे धडे गिरवायला सुरुवात केली. जसराज यांचे वडील पंडित मोतीराम हेही शास्त्रीय गायक होते. वडिलांचे निधन झाले तेव्हा जसराज केवळ चार वर्षांचे होते. पुढे जसराज यांनी त्यांचे बंधू पंडित प्रताप नारायण यांच्यासोबत सूरसाधना केली. तरुणपणी हैदराबादेत वास्तव्यास असलेल्या पंडितजींनी  गुजरातमधील साणंद येथे मेवाती घराण्याच्या तालमीमध्ये संगीत आराधना केली. तबल्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास हा पुढे सुरांपर्यंत पोचला.

अनेकदा  साणंदच्या राजदरबारामध्ये देखील पंडितजींच्या गायकीच्या मैफली रंगल्या. पुढे १९४९ मध्ये कोलकत्याला गेलेल्या पंडितजींनी आकाशवाणीसाठी गायन सुरू केले. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या कन्या मधुरा शांताराम या पंडितजींच्या अर्धांगिनी होत.

संगीतक्षेत्रातील अभूतपूर्व अशा योगदानाबद्दल पंडित जसराज यांना अनेक राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले. भारत सरकारने त्यांचा पद्मश्री, संगीत नाटक अकादमी, पद्मभूषण, पद्मविभूषण आदी पुरस्कारांनी गौरव केला होता. एका लघुग्रहालाही जसराज यांचे नाव देण्यात आले होते.

भक्तिरसाचा अविष्कार
‘भक्तिरस’ हा जसराज यांच्या गायकीचा प्राण, ८० वर्षांच्या संगीत कारकिर्दीमध्ये त्यांच्या असंख्य मैफली गाजल्या त्या बंदिशींमुळे. आपल्या गायनाच्या माध्यमातून रसिकांना भावार्थाची ओळख करून देणाऱ्या पंडितजींनी सुरांची उत्कटता नेमकेपणाने दाखवून दिली. संथ, दीर्घ, धीरगंभीर आणि आलापी हे जसराज यांच्या गायनाचे वैशिष्ट्य होते. मंद्र सप्तकातील स्वरावली, तारषड्ज यांच्यावर त्यांचे प्रभुत्व होते, त्यांच्या गायनातील सरगमचा संचार अनेक कलासंशोधकांसाठी आजही अभ्यासाचा विषय आहे. जसराज यांच्या संगीताने रसिकांच्या कानांना केवळ तृप्तीच दिली नाही तर, रागसंगीताचे शास्त्र माहीत नसणाऱ्या रसिकांना देखील मैफलीमध्ये खेचून आणले.

पार्थिव भारतात आणण्याचे प्रयत्न
पंडित जसराज यांचे पार्थिव मुंबईत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पंडित जसराज यांच्या पत्नी मधुरा, संगीतकार पुत्र शारंगदेव आणि मुलगी दुर्गा सगळेच मुंबईत आहेत. पंडित जसराज यांचे मेहुणे मुंबईचे माजी नगरपाल किरण शांताराम यांनी पार्थिव भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

ध्रुवतारा
पं. संजीव अभ्यंकर
गुरूजी नाहीत‌ यावर अजूनही विश्वास बसत नाही. ते माझे दैवत होते. जेव्हा जेव्हा गातो,‌ त्यावेळी ते मला आठवत. आमच्यातील नातं हे आत्मिक होते. आमचं नातं खूप घट्ट होतं. गुरूजींनी चार-पाच‌ दशकं‌ रसिकांना आनंद दिला आणि या काळातील गायकांना देखील खूप दिले. त्यामुळे शतकातील एक अनमोल कलावंत होते. त्यांची जागा भरून काढणारं ते असतानाही कुणी नव्हतं. आताही ती जागा कुणी भरून काढू शकणार नाही. अशी कलावंत आपली जागा निर्माण करतात आणि ती ध्रुव ताऱ्यासारखी तशीच अढळ राहते. वयाच्या नव्वदीतही ते रसिकांना स्टेजवर हवे होते, हाही इतिहास त्यांनी रचला. एक अतिशय लोभस आणि सर्वांना मोहून टाकणारी त्यांची‌ गायकी होती. गायन क्षेत्रात बौद्धिक आणि लालित्यपूर्ण गायकी एकावेळी एका व्यक्तीत असणे अवघड असते. गुरुजींकडे दोन्ही होते. त्यामुळेच ते असामान्य असे होते. मी तेरा वर्षांचा असल्यापासून त्यांच्याकडे शिकू लागलो. त्यापूर्वी लहान वयातच दीड तासांची मैफली करू लागलो होतो. त्यांच्याकडे गेलो त्यावेळी ते म्हणाले की हा तिसऱ्या जन्मातील गातो आहे.

आधीचे दोन जन्म त्याचं‌ गाऊन झाले आहे. त्यामुळे तो पूर्णवेळ गायक होणार असेल, तर मी त्याला शिकवेन. आता तुम्ही पालकांनी ठरवायचे की त्याला इंजिनिअर करायचे की गायक. आई-बाबांनी आधी ठरवलेच होते की गुरूजी शिकविणार असतील, तर पूर्णवेळ गाणं करू द्यायचं. मग प्रवास सुरू झाला. त्यावेळी आई-बाबांना त्यांनी सांगितले होते की आता तुम्ही त्याची काळजी करू नका. कारण मी जिथे जाईल, तिथे हा असेल. मी घरी असलो, ‌तर तो घरी असेल. दिल्लीत मैफलीत गात असेल, तर तो माझ्याबरोबर असेल. ते एक जबाबदार गुरू होते. एकदा जबाबदार स्वीकारली, तर पार पाडत. मी सर्व सोडून गायन करतो म्हणून त्यांच्या नेहमी बरोबर असायचो. असे करीत त्यांच्या चारशे मैफलींना मी स्वरसाथ केली आहे. त्यांच्याकडून मला बौद्धिक आणि आत्मिक ताकद त्यांच्याकडून मिळत‌ राहिले. ते लोभस, सर्वांना हवेहवे वाटायचे, दिलखुलास एक सच्चा कलाकार होते. त्यामुळे त्यांनी माणसे‌ खूप जोडली. एखाद्या शिष्याने साथ करताना चांगले गायले, तर ते ‘जियो बेटा’ म्हणायचे. मला तर ही दाद मोठ्या पुरस्कारासारखीच वाटायची. मला त्यांचा ३८ वर्षे सहवास लाभला. मी‌ दहा वर्षे त्यांच्याबरोबर पूर्णवेळ राहिलो. ते संगीतातील माझे वडीलच होते. त्यांच्या‌ दोन ह्रद्य आठवणी मला सांगाव्याशा वाटतात. ग्वाल्हेरला तानसेन संगीत महोत्सव‌ होतो. १९८७ मधील गोष्ट आहे. मी‌ त्यांच्याबरोबर होतो. त्यावेळी गुरुजी विमानाने जात आणि आम्ही रेल्वेने जात. कारण विमानाची तिकिटे तेव्हा खूप महाग असत. तसं‌ आम्ही ग्वाल्हेरला गेलो. त्या महोत्सवात गुरूजी कलावती गायले. त्यावेळी माझी‌ स्वरसाथ इतकी चांगली झाली की आयोजक गुरुजींना म्हणाले, ‘संजीव को हम गिफ्ट देना चाहते है!’ त्यावर गुरुजी म्हणाले, ''फिर उसका प्लेन का तिकिट दे दो मेरे साथ.'' आयोजकांनी कसलाच विचार न करता मला विमानाचे‌ तिकिट दिले आणि मी गुरूजींबरोबर आलो. पुण्यात २८ जानेवारी १९९० मध्ये‌ गुरुजींचा षठ्यब्दीपूर्ती सोहळा झाला. त्यासाठी पं. भीमसेन जोशी, पं. रविशंकर, पं. बालमुरली कृष्ण, पं. शिवकुमार शर्मा असे अनेक दिग्गज कलाकार होते. माझे गायनही होते. माझ्यानंतर शिवकुमार शर्मा आणि उस्ताद झाकीर‌ हुसेन मंचावर येणार होते. त्या कार्यक्रमात टिळक स्मारकमध्ये माझे गायन झाले आणि गुरुजी स्टेजवर आले आणि मला मिठी मारली. माझ्यासाठी केवढी मोठी दाद होती. त्यांचे असे अनेक अनुभव माझ्याबरोबर संचित म्हणून आहेत. पण आता‌‌ ते नाहीत हे पचविणे फार कठीण आहे.

शास्त्रीय गायक पं. जसराज यांना श्रद्धांजली
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील महान गायक पं. जसराज यांच्या निधनाने गोमंतकीय प्रथितयश शास्त्रीय गायक तथा अभिजात शास्त्रीय संगीतावर प्रेम करणाऱ्या गोमंतकीय रसिकांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्या जाण्याने हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताची अपरिमित हानी झाली आहे अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मोठी असामी हरपली
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील मेवाती घराण्याचे अध्वर्यू पं.जसराजजी यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्काच बसला. ते महान गायक व त्याचबरोबर थोर गुरू होते. त्यांच्या जाण्याने भारतीय शास्त्रीय संगीत पोरके झाले आहे. ही हानी कधीही भरून न येणारी अशी आहे. रामनाथी येथे १९७६  मध्ये अखिल भारतीय गांधर्व मंडळाचे संगीत संमेलन झाले होते त्यावेळी प्रथम त्यांचे गाणे ऐकले.त्यानंतर अनेक मैफली ऐकण्याचा योग आला. अत्यंत गोड गळ्याचा हा गायक. मेवाती घराण्याचा त्यांनी प्रसार केला. अलीकडे पं. भीमसेन जोशी, गानसरस्वती किशोरीताई, पं. तुळशीदास बोरकर, पं. सुधीर माईणकर अशा थोर कलाकारांना आम्ही मुकलो आणि आज त्या परंपरेतील जसराजजी हे अंतरले ही मनावर आघात करणारी घटना आहे. त्यांचा वारसा शिष्यानी व अभ्यासकांनी पुढे चालवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
 - पं. कमलाकर नाईक (आग्रा घराण्याचे बुजुर्ग गायक)

संगीत विश्व निर्माण केले
पं. जसराज यांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील पारंपरिक मेवाती घराण्याच्या गायकीचा जगभर प्रसार केला.स्वतःची स्वतंत्र गायकी व स्वरविश्व त्यांनी निर्माण केले. त्यांची  गायलेली भजने सुद्धा हृदयाला भिडायची. त्यांचे गाणे भरपूर ऐकायला मिळाले व तो वेगळा आनंदानुभव होता. 'कलांगण' मडगाव तर्फे त्यांची मैफल घडवून आणण्याचा प्रयत्न केला, परंतु काही कारणामुळे ते शक्य झाले नाही याची रुखरुख लागून राहिली होती.हवेली संगीताचाही त्यांनी आनंद दिला. संजीव अभ्यंकर, रतनमोहन शर्मा सारखे अनेक शिष्यही त्यांनी घडवले.
- पं. रामराव नायक (किराणा व ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ शास्त्रीय गायक)

शास्त्रीय गायक होण्याची प्रेरणा
पं. जसराजजी यांना जवळून पाहण्याचा, त्यांच्या मैफलीत तांबोऱ्याची व स्वरसाथ करण्याचा भाग्ययोग मला लाभला.ते माझे अतिशय आवडते गायक होते व  लहानपणी त्यांचे गाणे ऎकूनच शास्त्रीय गायक होण्याची प्रेरणा झाली. ते पारंपरिक मेवाती घराण्याचे गायक होते परंतु त्यांनी स्वतःची वेगळी शैली निर्माण केली. चांगले  शिष्य घडवले.त्यांच्या गायकीत माधुर्य होते. भावपूर्णता होती. सौंदर्याबद्दलची विलक्षण दृष्टी होती. मैफलीत कधीही त्यांनी रसहानी होऊ दिली नाही त्यांच्या गाण्यात रस ओत प्रोत भरलेला असायचा. ते खऱ्या अर्थाने महान कलाकार होते. आवर्जून गाणं ऐकावं अशा मोजक्या कलाकारांपैकी ते होते. त्यांच्या जाण्याने फार मोठी हानी झाली आहे.
- डॉ. शशांक मक्तेदार (ग्वाल्हेर घराण्याचे प्रथितयश गायक तथा गोवा संगीत महाविद्यालयाचे प्राचार्य)

संगीत संमेलनाची शान वाढविली
आमच्या सम्राट संगीत संमेलनात पं. जसराज हे पाच सहा वेळा गायिले होते. पं. भीमसेन जोशी, जसराजजी, अजय चक्रवर्ती, राजन साजन मिश्रा यांच्या मैफली ऐकण्यास रसिक उत्सुक असायचे. रात्री उशिरा सुरू होणाऱ्या त्यांच्या मैफली चार चार तास चालायच्या एवढे रसिक  तल्लीन व्हायचे. या कलाकारांनी सम्राट संगीत संमेलनाची शान वाढविली. पं. जसराज यांनी त्यांची मैफल आयोजित करताना खूप सहकार्य दिलं. अमुकच बिदागी हवी असा हट्ट कधीच धरला नाही. आमच्या संगीत संमेलनात ते आनंदाने गायचे. या निमित्तानं आम्हाला त्यांचा सहवास लाभला.त्यांना जवळून अनुभवता आले. शास्त्रीय संगीत न  कळणाऱ्या आमच्यासारख्याना सुद्धा ते मैफलीत तल्लीन करायचे हे त्यांचे वैशिष्ट्य होते.त्यांनी रसिकांना भरभरून आनंद दिला.खरंच असा गायक होणे नाही.
- गुरुप्रसाद शिंक्रे ( संस्थापक, सम्राट क्लब इंटरनॅशनल व सम्राट संगीत संमेलन)

पद्मविभूषण पंडित जसराजजी यांच्या निधनामुळे मला झालेले दु:ख व्यक्त करण्यासाठी शब्द पुरेसे नाहीत. ते अत्युच्च दर्जाचे गायक होते. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि चाहत्यांच्या दु:खात मी सहभागी आहे.
- सचिन तेंडुलकर, माजी कसोटीपटू

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या