कला अकादमीच्याही कार्यक्रमांना मुरड..!

dainik gomantak
गुरुवार, 21 मे 2020
टाळेबंदीमुळे सहा कार्यक्रमांचे सादरीकरण नाही.

पणजी, 

टाळेबंदीमुळे थिएटर, नाट्‍यगृह बंद ठेवण्याच्या अटीमुळे कला अकादमीला यंदा मार्च-एप्रिलमधील कार्यक्रमांना मुरड घालावी लागली. त्यामुळे स्वतः आयोजन करणाऱ्या सहा कार्यक्रम अकादमीला यंदा करता आले नसल्याची माहिती कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी दिली.
गावडे म्हणाले की, कला अकादमी दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत असते. त्यात नाटक, संगीत महोत्सव, विविध जागतिक दिनानिमित्त कार्यक्रमांचा समावेश असतो. त्याशिवाय अकादमीचे महत्त्वाची अशी भजन प्रशिक्षण कार्यशाळाही होऊ शकलेली नाही. राज्यस्तरीय भजन स्पर्धेसाठी ही कार्यशाळा महत्त्वाची असते. त्यासाठी राज्यातून अनेकजण या कार्यशाळेत सहभागी होतात.
कला अकादमीच्या विविध कार्यक्रमांची रसिक आवर्जुन वाट पहात असतात. राज्यातील तियात्र प्रेमींसाठी अकादमी तियात्र स्पर्धा घेते. यावर्षीची तियात्र ‘ब' गट स्पर्धा टाळेबंदीमुळे होऊ शकली नाही, असे सांगून गावडे म्हणाले की, मार्च महिन्यातील २७ रोजी होणारा जागतिक रंगभूमी दिन होऊ शकला नाही. यावर्षी या दिनानिमित्त कला अकादमीने रुद्रेश्‍वरचे महाराष्ट्र राज्यात प्रथम आलेल्या नाटकाचे सादरीकरण ठेवले होते. त्याशिवाय १७ एप्रिलचा रोजीचा तियात्रदिन समारंभ होऊ शकला नाही. त्यानंतर २४ एप्रिल रोजी होणारा दिनानाथ दर्शन म्हणजे दिनानाथ मंगेशकर पुण्यतिथीनिमित्त नाट्‍यसंगीत कार्यक्रम रसिकांसाठी महत्त्वाचा असतो. तोही झाला नाही. तसेच जागतिक नृत्य दिनानिमित्त कार्यक्रमही करता आला नाही.
अकादमीची राज्यस्तरीय भजन स्पर्धा महत्त्वाची असते, ती स्पर्धा सुरू होण्यापूर्वी जूनमध्ये भजन सादरीकरण करणाऱ्या कलाकारांसाठी प्रशिक्षण दिले जात होते. परंतु मागील वर्षापासून ते प्रशिक्षण १५ मेनंतर सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. आता टाळेबंदीचा काळच मे महिन्यात आल्याने हे प्रशिक्षणही अकादमीला सुरू करता आले नाही. भजनाविषयी वर्षातून चार कार्यशाळा घेतल्या जातात, असे गावडे म्हणाले.

संबंधित बातम्या