‘पांचजन्य’मधून आमीरविरूद्ध ‘शंख’

पीटीआय
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

‘भारतात २०१४ नंतर असहिष्णुता वाढल्याचे सांगणारा बॉलिवूड निर्माता-अभिनेता आमीर खान याला मानवाधिकार हननाबद्दल जगात बदनाम झालेला तुर्कस्तान अत्यंत सहिष्णू देश असल्याचे वाटत असल्यानेच त्याने त्या देशात जाऊन त्यांच्या अध्यक्षांच्या पत्नीच्या भेटीत धन्यता मानली काय?’ असा जळजळीत सवाल ‘पांचजन्य’ आणि ‘ऑर्गनायझर’मधून करण्यात आला.

नवी दिल्ली, ‘भारतात २०१४ नंतर असहिष्णुता वाढल्याचे सांगणारा बॉलिवूड निर्माता-अभिनेता आमीर खान याला मानवाधिकार हननाबद्दल जगात बदनाम झालेला तुर्कस्तान अत्यंत सहिष्णू देश असल्याचे वाटत असल्यानेच त्याने त्या देशात जाऊन त्यांच्या अध्यक्षांच्या पत्नीच्या भेटीत धन्यता मानली काय?’ असा जळजळीत सवाल ‘पांचजन्य’ आणि ‘ऑर्गनायझर’मधून करण्यात आला. 

‘ऑर्गनायजर’ व ‘पांचजन्य’च्या ताज्या अंकात आमीर खान याच्या तुर्कस्तानच्या भेटीबाबत तिखट मतप्रदर्शन केले आहे. केंद्रात मोदी सरकार आल्यावर भारतात असहिष्णुता वाढल्याने आपण भितीपोटी सपत्नीक भारताबाहेर जाण्याच्या विचारात असल्याचे सांगणाऱ्या आमीरने तुर्कस्तान भेट व चिनी उत्पादनांची जाहिरात केली, याकडे या लेखात लक्ष वेधण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, मागच्या ५-६ वर्षांत बॉलिवूडपटांमध्ये देशभक्तीची लाट आली व दुसरीकडे येथेच असे काही निर्माते-अभिनेते आहेत ज्यांना आपल्या देशाचे शत्रु चीन व तुर्कस्तान जास्त प्रिय वाटू लागले आहेत. चीनच्या ‘विवो’चा ब्रॅंड ॲम्बेसेडर असलेला आमीर खान चीनमध्ये जास्त चालतो. त्याचा दंगल तिकडे हिट करविला जातो व त्याच विषयावरील सलमान खानचा ‘सुल्तान’ मात्र चीनमध्ये आपटतो हे का होते ? मुस्लिम जगताचा खलिफा बनण्याच्या धडपडीत असलेल्या तुर्कस्तानने जम्मू-काश्‍मीरवर मुद्यावरून पाकिस्तानला जाहीर पाठिंबा दिला. स्वतःला सेक्‍युलर मानणाऱ्या आमीर खानने त्याच तुर्कस्तानात आगामी चित्रपटाचे चित्रीकरण का ठेवले ? जगात सर्वाधिक पत्रकार ज्या देशात कैदेत आहेत, जेथे मानवाधिकारांचे उल्लंघन सर्वाधिक होते व सोशल मीडियावर जिथे बंदी आहे, अशा देशाच्या इशाऱ्यावर आमीर का नाचत आहे? असेही सवाल या लेखात विचारण्यात आले आहेत. 

संबंधित बातम्या