पूनम पांडेची दिवाळी यंदा गोव्यातच; जामीनाला विरोध करणाऱ्या अर्जावर 21 नोव्हेंबरला सुनावणी

गोमंतक ऑनलाईन टीम
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

अटक झाल्यानंतर पूनम पांडेला जामीन मिळाला. मात्र, तो जामीन रद्द करावा म्हणून मडगावच्या सत्र न्यायालयात अर्ज देण्यात आला होता. या अर्जावर आता 21 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. 

मडगाव-  अभिनेत्री पूनम पांडे हिच्या गोवा कनेक्शनमध्ये आता दिवाळीची भर पडली आहे. आपले लग्न, करवा चौथ गोव्यात केल्यानंतर तिला आता दिवाळीही गोव्यातच साजरी करावी लागणार आहे. यामागे कारण आहे, काही दिवसांपूर्वी तिच्यावर दाखल झालेला गुन्हा. अटक झाल्यानंतर तिला जामीन मिळाला. मात्र, तो जामीन रद्द करावा म्हणून मडगावच्या सत्र न्यायालयात अर्ज देण्यात आला होता. या अर्जावर आता 21 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार असून हा अर्ज निकालात निघाल्यानंतरच या दाम्पत्याला गोवा सोडता येणार आहे. 

अतिरिक्त सत्र न्यायाधीश एडगर फर्नांडिस यांच्यासमोर काल हा अर्ज सुनावणीसाठी आला होता. पूनम यांच्या वकीलाने अर्जदाराच्या अर्जाला आव्हान देणारे निवेदन न्यायालयात सादर केले होते. यानंतर फर्नांडिस यांनी 21 नोव्हेंबरपर्यंत ही सुनावणी स्थगित केली आहे. 

अभिनेत्री पूनम पांडेला मिळालेला जामीन रद्द करण्यात यावा यासाठी सम्राट भगत यांनी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर पूनमच्या वकीलांनी हरकत घेताना या प्रकरणी जलस्त्रोत  अभियंत्याने तक्रार दिली असून भगत हे स्वत:ला तक्रारदार कसे म्हणवून घेऊ शकतात, असा सवाल उपस्थित केला. साक्षीदार होण्यापलिकडे त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. त्यामुळे त्यांच्याकडे हा अर्ज दाखल करण्याचा अधिकार नाही, असे लेखी निवेदन न्यायाधिशांना दिले आहे.    

संबंधित बातम्या