तामिळनाडूच्या राजकारणात आणखी एक अभि'नेता'; याआधी कोणत्या कलाकारांनी केला होता राजकारणात प्रवेश, जाणून घ्या..

गोमंतक ऑनलाईन टीम
गुरुवार, 3 डिसेंबर 2020

रजनीकांत मागील काही महिन्यांपासून राजकारणात सक्रिय आहेत. मात्र, निवडणुकीच्या राजकारणात येत असल्याचे त्यांनी आज पहिल्यांदाच जाहीर केले.

चेन्नई- दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांत वयाच्या 69व्या वर्षी अखेर निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश करणार आहे. पुढील वर्षाच्या जानेवारी महिन्यात आपला नवीन पक्ष काढणार असल्याचेही त्यांनी आज जाहीर केले. नवीन पक्षाची औपचारिक घोषणा 31 डिसेंबर रोजी केली जाणार असल्याचे सांगत आम्ही यासाठी अतिशय मेहनत घेऊ आणि जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.  

रजनीकांत मागील काही महिन्यांपासून राजकारणात सक्रिय आहेत. मात्र, निवडणुकीच्या राजकारणात येत असल्याचे त्यांनी आज पहिल्यांदाच जाहीर केले. स्वत:चा पक्ष काढण्याबरोबरच ते विधानसभा निवडणूक लढवणार असून या निमित्ताने तामिळनाडूच्या राजकारणात आणखी एका अभिनेत्याची एन्ट्री होत आहे. याआधीही तामिळनाडूमधल्या सिने विश्वातील कलाकारांनी राजकारणात उतरून यश संपादन केले आहे. 

वर्षभराआधीच कमल हसन यांच्याबरोबर युती करणार असल्याचे सांगितले होते-

रजनीकांत यांनी मागील वर्षीच अभिनेता कमल हसन यांच्या पक्षाबरोबर युती कऱणार असल्याचे सांगितले होते. त्यावेळी रजनी यांनी म्हटले होते की,'राज्याच्या जनतेच्या हितासाठी जर कमल हसन यांच्याबरोबर युती करावी लागली तर आम्ही जरूर एकमेकांना साथ देऊ.'  

  
याआधी राजकारणात मोठे झालेले काही अभि'नेते'- 

डॉ. एमजी रामचंद्रन- 
 एमजीआर नावाने प्रसिद्ध असलेले रामचंद्रन तामिळ चित्रपटांतील अतिशय मोठे नाव होते. कलाविश्वातून सर्वप्रथम त्यांनीच राजकारणात प्रवेश केला होता. त्यांनी सुरूवातीला सीएन अन्नादुराई यांच्या द्रमुक मध्ये प्रवेश केला. अन्नादुराई यांच्या निधनानंतर आपले मित्र करूणानिधी यांच्याशी मतभेद होऊन त्यांनी 'अन्नाद्रमुक' या नावाने आपला नवीन पक्ष स्थापन केला. ते 1977 ते 80 आणि 1980ते 84 असे दोनवेळा तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते. 
 
एम करूणानिधी- 
तामिळ चित्रपटांमध्ये स्क्रीन प्ले राइटर म्हणून कारकिर्दीला सुरूवात केली. कित्येक चित्रपटांच्या पटकथांचे लेखन केल्यानंतर द्रमुख पक्षात प्रवेश करून तब्बल पाच वेळा तामिळनाडूचे मुख्यमंत्रीपद भुषविले आहे.

विजयकांत- 
  विजयकांत हे दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता आहेत. त्यांनी देसीय मुरपोक्कु द्रविड़ कड़गम (DMDK) नावाने आपला पक्ष स्थापून 2011च्या विधानसभा निवडणुकीत 29 जागाही जिंकल्या. ते आता आपल्या पक्षाचे महासचिव आणि आमदारही आहेत.    

जयललिता-
तामिळ चित्रपटांतील आपल्या काळाची एक आघाडीची अभिनेत्री म्हणून सर्वत्र प्रसिद्ध होत्या. MGRसोबत कित्येक चित्रपटांतून काम करत राजकारणात प्रवेश केला. अन्नाद्रमुकधून राजकीय कारकिर्दीला सुरूवात करून पुढे 4 वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला.     

कमल हसन- 
अभिनेता म्हणून केवळ दक्षिणेतच नव्हे तर सबंध भारतभरात हसन यांची ख्याती आहे. चित्रपटांचे निमार्ते म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही अनेक चांगले चित्रपट केले आहेत. 2018 मध्ये त्यांनी राजकारणाला सुरूवात करत 'मक्कल निधि मय्यम' नावाने नवा पक्ष स्थापन केला. निवडणुकीच्या राजकारणात अद्याप त्यांनी प्रवेश केला नसला तरी लवकरच त्यांनी निवडणूक लढविल्यास नवल वाटायला नको.   
 

संबंधित बातम्या