कांजिवरम म्हटलं की, डोळ्यापुढे उभी राहाते ती रेखाचं

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 1 जानेवारी 2021

तेव्हा नाजूकपणे मोकळे केस सावरत वावरणाऱ्या रेखाच्या साडीकडं आपलं लक्ष गेलं नसेल तर नवलच. हीच ती कांजीवरम साडी. रेखाकडं कांजीवरम साड्यांचा हटके असा संग्रह आहे.

अभिनयाच्या क्षेत्रात आपल्या अदाकारीनं आजही भुरळ घालणारी लावण्यवती अभिनेत्री म्हणजे रेखा. अलीकडच्या काळात कोणत्याही ॲवॉर्ड शोमध्ये जेव्हा जेव्हा रेखा दिसली आहे, तेव्हा नाजूकपणे मोकळे केस सावरत वावरणाऱ्या रेखाच्या साडीकडं आपलं लक्ष गेलं नसेल तर नवलच. हीच ती कांजीवरम साडी. रेखाकडं कांजीवरम साड्यांचा हटके असा संग्रह आहे.

तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यात नववधूची लग्नातील साडी म्हणजे कांजीवरम. अलीकडे महाराष्ट्रातही नववधूच्या साड्यांमध्ये कांजीवरम साड्यांचा ट्रेंड दिसतो. या साडीत प्रामुख्यानं मलबेरी सिल्कचा धागा वापरतात. साडीत वापरण्यापूर्वी हा धागा तांदळाच्या पाण्यात बुडवून वाळवला जातो; जेणेकरून तो चिवट आणि मजबूत होतो.

मलबेरी सिल्कसोबत एक खास ‘जर’ वापरतात. कांचीपुरम साडीचा मधला भाग, काठ आणि पदर वेगवेगळे विणले जातात. नंतर ते काठ आणि पदर मुख्य साडीला इतक्या सफाईदारपणे जोडले जातात, की संपूर्ण साडी अखंडच विणल्याप्रमाणे वाटते. साडीच्या या वैशिष्ट्यामुळे काही सिनेतारकांचे ड्रेस डिझायनर खूप हटके अशा रंगसंगतीत काठ, पदर आणि मधली साडी कारागिरांना ऑर्डर देऊन बनवून घेतात. म्हणजेच, कांचीपुरम ही एक पारंपरिक साडी असली, तरी आपण तिला एक डिझायनर टच देऊ शकतो. कांजीवरमची खासियत म्हणजे रुंद आणि कॉन्ट्रास्ट काठ जे साडीच्या मधल्या रंगाला अजूनच खुलवतात. कांजीवरम साडीवरच्या नक्षीकामात दाक्षिणात्य मंदिरांमधील कोरीवकामाचा आणि पौराणिक संदर्भांचा प्रभाव दिसतो. या साडीला बऱ्याचदा टेम्पल बॉर्डरही असते. कधीकधी चौकटी किंवा पट्टे किंवा बुट्टेही विणलेले असतात. अशी ही खास कांजीवरम साडी आपल्याही साड्यांच्या खजिन्यात असावीच, नाही का?

 

संबंधित बातम्या