ये अंधा कानून है

जी. बी. देशमुख
सोमवार, 17 ऑगस्ट 2020

अमिताभ त्याच्या कारकिर्दीत अनेक अटीतटीच्या प्रसंगात पडद्यावर धावला आहे. पडद्यावरची अमिताभची धावण्याची लकब बघण्यातसुद्धा एक वेगळीच गम्मत असते.

अमिताभ त्याच्या कारकिर्दीत अनेक अटीतटीच्या प्रसंगात पडद्यावर धावला आहे. पडद्यावरची अमिताभची धावण्याची लकब बघण्यातसुद्धा एक वेगळीच गम्मत असते. ‘दिवार’मध्ये शेवटी चर्चगेटच्या रिकाम्या फुटपाथवरून धावणारा विजय, ‘शोले’मध्ये लाकडी पुलावरून धावणारा जय, ‘शक्ती’मध्ये शेवटी विमान-धावपट्टीच्या परिसरात धावणारा विजय, किंवा ‘डॉन’ सिनेमात पोलिसांचा ससेमिरा चुकवत धोबीघाटातून धावणारा ‘तोतया डॉन’ विजय. प्रत्येक वेळी वेगळाच रोमांच आणि दमदार ॲक्‍शन! पण त्याने घेतलेली एक धाव भयंकर होती. 

एप्रिल-१९८३ मध्ये प्रदर्शित टी. रामाराव या दाक्षिणात्य निर्देशकाने निर्देशित केलेला ‘अंधा कानून’ हा ‘अजब’स्टार रजनीकांतचा पहिला हिंदी सिनेमा होता. पाहुणा कलाकार म्हणून या चित्रपटात आलेल्या अमिताभने अख्खा चित्रपट आपल्या मागे फरफटत नेला होता. रजनीकांत आणि इन्स्पेक्‍टर हेमामालिनी या भावंडांना वडिलांचा खून आणि थोरल्या बहिणीची बेअब्रू करणाऱ्या प्राण, डॅनी आणि प्रेम चोप्रा या खलनायकांचा सूड घ्यायची खुमखुमी लहानपणीपासून असते. या मुख्य कथेला जोडकथा होती एका प्रामाणिक वन अधिकारी ‘जॉनिसार अख्तर’ म्हणजेच अमिताभची. अमरिश पुरी या लाकडांच्या ठेकेदाराला जंगलात अवैध कामे करण्यास प्रतिबंध घालताच तो जॉनिसार अख्तरला स्वत:च्याच खुनाच्या आरोपात अडकवून खुद्द गायब होऊन जातो. अमिताभला चौदा वर्षांची शिक्षा झाल्यावर त्याची बायको (माधवी) एकुलत्या एका मुलीला ठार मारून स्वत: आत्महत्या करून घेते. शिक्षा भोगून अमिताभ जेव्हा जेलच्या बाहेर येतो तेव्हा ज्या व्यक्तीच्या खुनाच्या आरोपात तो शिक्षा भोगून आला असतो तीच व्यक्ती म्हणजे अमरिश पुरी एका सार्वजनिक सभेत भाषण देत आहे, असे त्याला दिसून पडते. प्रेक्षकांत उभा असलेला अमिताभ आणि व्यासपीठावरून बोलणारा अमरिश पुरी यांची नजरानजर होते. दोघांनाही ओळख पटते. घाबरलेला अमरिश पुरी व्यासपीठावरून उतरून रस्त्यावर पळू लागतो. अमिताभ त्याचा पिच्छा करू लागतो. एका अज्ञात माणसाच्या हातातील तलवार हिसकावून अमिताभ त्वेषात धावू लागतो. घाबरलेला अमरिश पुरी पुढे आणि अमिताभ एका हातात नंगी तलवार घेऊन मागे. एका प्रामाणिक माणसाची अन्यायाविरुद्ध पेटून उठल्यानंतरची ती धाव असते. हा धावणारा अमिताभ अडतीस वर्षांत कधी विस्मृतीत गेलाच नाही. 

जीव वाचविण्याच्या प्रयत्नात अमरिश पुरी न्यायालयाच्या आवारात पोहोचतो आणि शेवटी कोर्टाच्या एका सुनावणी सुरू असलेल्या कक्षात घुसून न्यायमूर्तींकडे जीवाची भीक मागतो. न्यायाधीशांना काही कळायच्या आत डोळ्यात रक्त उतरलेला अमिताभ भरकोर्टात अमरिश पुरीला उताणा पाडून, दोन्ही हातात मूठ धरलेल्या तलवारीने गतप्राण होईपर्यंत त्याच्या पोटावर वार करत राहतो. इथे फिल्मी योगायोग असा की न्यायासनावर आजही तेच न्यायाधीश असतात, ज्यांनी अमरिश पुरीच्या खुनासाठी आधीच अमिताभला शिक्षा दिलेली असते. सुमारे सात ते आठ मिनिटे कोर्टाला उद्देशून एक जबरदस्त भाषण अमिताभ करतो. ज्याचा सार असतो की, ‘आपका कानून किसी इन्सान को एकही जुर्म के लिये दो बार सजा नही दे सकता.’ अमरिश पुरीच्या मागे धावण्याची सुरुवात केल्यापासून ते अमिताभचे कोर्टातील स्वगत संपेपर्यंतची सुमारे पंधरा मिनिटे आपण अमिताभमय झालेले असतो. चित्रपटातील इतर सगळ्या गोष्टी आता नगण्य ठरलेल्या असतात आणि मनावर ठसतो तो कोर्टातील थरारक ड्रामा. 

मूळ सूडकथा आता दुय्यम होऊन बसलेली असते आणि अमिताभने घेतलेली जीवघेणी धाव तेवढी लक्षात राहते. भणंग दाढीवाल्याच्या अवतारात रस्त्यावरून तारस्वरात न्यायव्यवस्थेतील विरोधाभास सांगत ‘ये अंधा कानून है’ हे गाणं म्हणणारा अमिताभ इतकीच सिनेमाची ओळख उरते. एकाच प्रसंगावर लिहायला अनेक पाने कमी पडतील, असे प्रताप अमिताभने पडद्यावर करून ठेवले आहेत.

संबंधित बातम्या