अंतराळात शुट होणाऱ्या पहिल्या सिनेमाची तयारी जोरात.....

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

निर्मात्यांच्या नजरा पृथ्वीभोवती चकरा मारणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन वर आहेत. येथे शुटींगसाठी रूसमधील सिनेमा निर्मात्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. रशियाला आशा आहे की ते अंतराळात शुटींग करणारे पहिले ठरतील.

नवी दिल्ली- बॉलिवूडचे असो की हॉलिवूडचे निर्माते, दिग्दर्शक असोत. आपल्या चित्रपटांसाठी ते नवीन नवीन जागांचा शोध घेतच असतात. आपण आता पर्यंत मोठ्या पडद्यांवर पृथ्वीच्या अनेक भागांचे दृश्य पाहिले आहे. मात्र, आता निर्मात्यांच्या नजरा पृथ्वीभोवती चकरा मारणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन वर आहेत. येथे शुटींगसाठी रूसमधील सिनेमा निर्मात्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. रशियाला आशा आहे की ते अंतराळात शुटींग करणारे पहिले ठरतील. यासाठी त्यांना एका अभिनेत्रीचाही शोध घ्यायचा आहे. त्यांच्या स्पर्धेला मात्र अमेरिका उतरला असून हॉलिवूडचे सुपरस्टार टॉम क्रुझ यांनी  याआधीच नासाबरोबर स्पेस स्टेशनवर शुटींग करणार असल्याचे जाहीर करून टाकले आहे.

यासाठी रशियन स्पेस एजन्सी रॉस्कॉसमॉसने सिनेमा तयार करण्यासाठी देशातील सर्वात मोठे टीव्ही चॅनेल 'चॅनेल वन' यांच्याबरोबर हात मिळवला आहे. या चित्रपटात एक अभिनेत्री मुख्य भूमिका साकारणार आहे. रशियन न्यूज एजन्सी तासच्या माहितीनुसार यासाठी अभिनेत्रीचा शोध सुरू असून वय वर्ष २५ ते 45 मधील अभिनेत्रींना यात संधी मिळू शकणार आहे. यासाठी सुरूवातीला ३० नावे शॉर्टलिस्ट केली जाणार आहेत ज्यात एक मुख्य अभिनेत्री आणि एक डबल असणार आहे. अभिनेत्रीची निवड झाल्यावर तिला तीन महिने रशियाच्या स्कूल ऑफ कॉस्मोनॉट्समध्ये तीन महिने कठीण प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. याबरोबरच ती उच्चशिक्षित असणेही बंधनकारक आहे. पुरूष अभिनेत्यांसाठीही हेच नियम लागू असणार आहेत. या चित्रपटाचं नाव 'द चॅलेंज' असे असण्याची शक्यता आहे. 
 

संबंधित बातम्या