'लॉकडाऊन नंतर सरसेनापती हंबीरराव'च्या टीमचे पावसाशी दोन हात; अखेर मोहिम फत्ते'

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑक्टोबर 2020

अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित ‘सरसेनापती हंबीरराव’ या भव्य ऐतिहासिक चित्रपटाची प्रेक्षकांना मोठी उत्सुकता आहे. उर्विता प्रॉडक्शन्स निर्मित ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचे केवळ तीन दिवसाचे शूटिंग बाकी होते
 

मुंबई - कोणत्याही ऐतिहासिक चित्रपटाचे चित्रीकरण सलगपणे करणे निर्मात्याच्या दृष्टीने फायद्याचे ठरते. कारण मोठ्या ऐतिहासिक चित्रपटांसाठी उभारले जाणारे भव्य सेट, पटकथेतील काळाची वातावरणनिर्मिती यासाठी मोठे निधी तर लागतोच शिवाय मोठे मनुष्यबळही उभे करावे लागते. उर्विता प्रॉडक्शन्स निर्मित ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचे केवळ तीन दिवसाचे शूटिंग बाकी असताना त्याची संपूर्ण तयारी झाल्यावर लॉकडाउन जाहीर झाल्यामुळे शूटिंग थांबवावे लागले होते. अखेर सात महिन्यांनातर या चित्रपटाच्या राहिलेल्या चित्रीकरणाला परवानगी मिळाली आहे. अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित या भव्य ऐतिहासिक चित्रपटाची प्रेक्षकांना मोठी उत्सुकता आहे. 

 या चित्रपटाच्या शूटसाठी भोर येथे नव्याने भव्य सेट उभारण्यात आला. शूटिंगला सुरुवातही झाली आणि ऐनवेळी पावसाने जोरदार हजेरी लावत परत एकदा व्यत्यय आणला. मात्र, ‘सरसेनापती हंबीरराव’च्या लढाऊ मावळ्यांनी आलेल्या संकटाशी दोन हात करत नियोजित शूटिंग मोठ्या जिद्दीने पूर्ण केले. पावसाबरोबर यशस्वी मुकाबला करत शूटिंग पूर्ण केल्यानंतर दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे म्हणाले, 6 जून 1674 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला. त्यावेळीही पहाटे पाऊस पडला होता. आज शिवराज्याभिषेक सोहळा शूटिंग करतानाही पाऊस पडत आहे, या पावसामुळे शूटिंगमध्ये व्यत्यय निर्माण झाला तरी आम्ही या गोष्टीकडे सकारात्मक बाब म्हणून बघतो.

चित्रपटाचे निर्माते संदीप मोहिते-पाटील म्हणाले, लॉकडाऊनमुळे तीन दिवसांचे चित्रीकरण बाकी होते. परवानगी मिळाल्यानंतर शूटिंग सुरू केले. मात्र, ऐन शूटिंगच्या वेळी वादळी पावसाने हजेरी लावली. यामुळे शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या भव्य सेटचे मोठे नुकसान झाले असले तरी चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे, डिओपी महेश लिमये, अभिनेते उपेंद्र लिमये, रमेश परदेशी, सुनील अभ्यंकर, देवेंद्र गायकवाड, कार्यकारी निर्माते विशाल चांदणे यांच्यासह संपूर्ण टीम या संकटाशी यशस्वीपणे झुंजली आणि नियोजित शूटिंग वेळेत पूर्ण केले. ही बाब आमचा उत्साह वाढवणारी आहे. आता पोस्ट प्रॉडक्शनचे काम पूर्ण करून ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी आम्ही तयार ठेवणार आहोत.

संबंधित बातम्या