सैफ अली खान, प्रभास व कृती सॅनॉन मुख्य भूमिकेत असलेल्या चित्रपटाच्या सेटला आग 

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

मुंबईत सैफ अली खान, प्रभास आणि कृती सॅनॉन यांच्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या सेटला भीषण आग लागली आहे.

मुंबईत सैफ अली खान, प्रभास आणि कृती सॅनॉन यांच्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या सेटला भीषण आग लागली आहे. आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे सांगितले जात आहे. तर आग लागल्यानंतर सुदैवाने या ठिकाणी कोणी नव्हते. त्यामुळे कोणतीही हानी झालेली नसल्याची माहिती मिळाली आहे. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी पोह्चल्या असून, ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचे चित्रीकरण आजच सुरु झाले होते. 

‘आदिपुरुष’ या चित्रपटाचा सेट मुंबईतील गोरेगाव पश्चिम भागातील गर्ग स्टुडिओत उभा करण्यात आला होता. त्यानंतर आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी आग लागल्याचे समजते. तर या ठिकाणी लागलेल्या आगीची तीव्रता पाहून अग्निशमन विभागाने दुसऱ्या लेवलची आग लागल्याचे म्हटले आहे. याशिवाय मुंबई पोलिसांनी या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती दिली आहे. 

'आदिपुरुष' हा बिग बजेट असलेला चित्रपट आहे. या सिनेमाची स्टोरी रामायणाच्या कथेतून प्रेरित असून, या चित्रपटात बाहुबली अभिनेता प्रभास भगवान रामाची भूमिका साकारत आहेत, तर सैफ अली खान रावणाची भूमिका साकारणार आहे. याशिवाय कृती सॅनॉन या सिनेमात सीतेची भूमिका साकारणार असल्याची माहिती याअगोदर मिळाली होती. तसेच दक्षिण चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री कीर्ति सुरेशचे नावही या सिनेमाच्या शर्यतीत असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी ऐकायला मिळाल्या होत्या. 

दरम्यान, आजपासून ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाल्याचे ओम राऊत यांनी सोशल मीडियाच्या ट्विटरवरून जाहीर केले होते. ओम राऊत यांनी केलेल्या ट्विट मध्ये चित्रपटाच्या मुहूर्ताची काही छायाचित्रे देखील पोस्ट केली होती. 'आदिपुरुष' या चित्रपटाची सहनिर्मिती भूषण कुमार यांनी केली आहे.

संबंधित बातम्या