'सोल टू सोल' आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवात

गोव्यातल्या (Goa) पोर्तुगीज काळाची पार्श्वभूमी असलेल्या या नाटकात प्रेम या संकल्पनेचा शोध घेण्याचा प्रयत्न आहे.
'सोल टू सोल' आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवात
Soul to Soul International Drama FestivalDainik Gomantak

निषाद, पणजी (Panaji) या संस्थेची निर्मिती असलेले ‘सोल टू सोल’ हे नाटक ‘साउथ एशियन थिएटर असोसिएशन’ने आयोजित केलेल्या ऑनलाईन आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवात (Drama) 18 ऑक्टोबर या दिवशी सादर होणार आहे.

गोव्यातल्या पोर्तुगीज काळाची पार्श्वभूमी असलेल्या या नाटकात प्रेम या संकल्पनेचा शोध घेण्याचा प्रयत्न आहे. कहाणीत एक ख्रिश्चन मुलगा आहे आणि एक हिंदु मुलगी आहे. दोघांचे जरी एकमेकावर प्रेम असले तरी पुढचा निर्णय घेण्यास ती दोघे असमर्थ आहेत. अशावेळी मग त्यांचे मन (किंवा आत्मा) त्यांच्या सहाय्याला येतो अशी या नाटकाची मध्यवर्ती कल्पना आहे. या नाटकाच्या सादरीकरणात बाहुल्यांचाही (पपेट्री)वापर करण्यात आलेला आहे.

या नाटकाचे दिग्दर्शन सतीश नार्वेकर यांनी केले आहे. ते त्यांच्या दिग्दर्शकीय टिपणीत म्हणतात, दोघानी मिळून एखाद्या निर्णयाला येण्यापूर्वी किंवा निर्णय घेण्यापूर्वी त्यांच्या मनांचे आपसात मिळणे आवश्यक असते. ‘सोल टू सोल’ हे नाटक त्यांच्या म्हणण्याप्रमाणे माणसांच्या मनातला आंतरिक संघर्ष स्पष्ट करते.

या नाटकाचा प्रयोग 2019 साली श्रीलंकेतल्या कोलंबो आंतरराष्ट्रीय महोत्सवात (International Film Festival of India) प्रथम झाला होता. गोव्यातही या नाटकाचे प्रयोग ठिकठिकाणी झाले आहेत. या नाटकाची मूळ संकल्पना आणि लेखन लिंगनाथ नाईक यांचे आहे. गीता जोशी यांनी त्याचे इंग्रजी भाषांतर केले आहे. नाटकाचा कालावधी 56 मिनिटांचा आहे.

‘साउथ एशियन थिएटर असोसिएशन’ने आयोजित केलेला हा नाट्यमहोत्सव 17 नोव्हेंबर रोजी सुरू होत आहे. नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान आणि भारत या देशातली एकंदर दहा नाटके या नाट्य महोत्सवात सादर होणार असून हा नाट्यमहोत्सव 21 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. ‘साटा थिएटर फेस्टिवल’च्या फेसबुक पेजवर आणि यूट्यूब चॅनलवर हे नाटक सायंकाळी साडेसात वाजता पाहायला मिळेल. त्यांच्या फेसबुकवर असलेल्या पेजवर जाऊन ‘झूम’साठी दिलेल्या लिंकवर क्लिक करुनही हे नाटक आपल्याला पाहता येईल.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com