#HappyBirthdayRajnikant: रजनीकांत..कडेपठार ते चेन्नई व्हाया बंगळूर

गोमंतक ऑनलाईन टीम
शनिवार, 12 डिसेंबर 2020

साऊथमधील चित्रपटांच्या इतिहासातील सर्वाधिक चाहतावर्ग असणाऱ्या नायकाचा म्हणजेच रजनीकांतचा आज वाढदिवस. आपल्या अनोख्या शैलीमुळे असंख्य मनांवर आजही राज्य करणाऱ्या या  अभिनेत्याचे कुटुंब मुळ मराठी आहे हे अनेकांना कदाचित माहितीही नसेल.

चेन्नई- साऊथमधील चित्रपटांच्या इतिहासातील सर्वाधिक चाहतावर्ग असणाऱ्या नायकाचा म्हणजेच रजनीकांतचा आज वाढदिवस. आपल्या अनोख्या शैलीमुळे असंख्य मनांवर आजही राज्य करणाऱ्या या अभिनेत्याचे कुटुंब मुळ मराठी आहे हे अनेकांना कदाचित माहितीही नसेल. एका सर्वसामान्य कुटुंबातून एवढा मोठा सुपरस्टार होणाऱ्या या महानायकाचा प्रवास जाणून घेऊया.. 

शिवाजीचा रजनीकांत कसा झाला ?

रजनीकांत यांचा जन्म 1950मध्ये बंगळुरू येथे झाला. मात्र, त्यांचे मुळ गाव हे बंगळुरू नसून महाराष्टाच्या पुणे जिल्ह्यातील जेजुरी जवळचे कडे पठार हे आहे. वडील रामोजी राव गायकवाड आणि आई रमाबाई यांना झालेल्या चार अपत्यांमध्ये रजनीकांत सर्वांत धाकटा. वडिलांच्या पोलिसातील नोकरीमुळे त्यांना महाराष्ट्रातून बंगळुरू येथे स्थायिक व्हावे लागल्याने रजनी यांचा महाराष्ट्राशी तसा थेट संबंध नाही. कर्नाटक आणि पुढे तामिळनाडू हिच त्यांची कर्मभूमी झाली. मात्र, शिवाजीराव गायकवाड हे त्यांचे मुळ नाव त्यांना कायम मराठी असल्याची ओळख देत राहील.

वयाच्या 9व्या वर्षीच आईचे छत्र हरपल्याने त्यांच्या वडिलांवर कुटुंबाचा भार पडला. मोठ्या भावांनी मिळून वडिलांना सहकार्य केले. भावानेच रजजीकांत यांना रामकृष्ण मिशनच्या शाळेत शिक्षणासाठी दाखल केले. तेथे नेहमी सादर होणाऱ्या पौराणिक नाटकांमधूनच रजनीकांतच्या अभिनयाची खरी सुरूवात झाली. मात्र, पुढचे काही दिवस हे सर्व चालले. वडिलांना नोकरीमधून निवृत्ती घ्यावी लागल्यानंतर रजनी यांनाही शिक्षणाव्यतिरिक्त काम करावे लागले. त्यांनी हमाल, सुतार काम, असे तात्पुरत्या स्वरूपाचे काम करता करता बंगळुरूच्या बस ट्रान्सपोर्टमध्ये कंडक्टर म्हणून त्यांना नोकरी लागली. नोकरी करताना अनेक कौशल्य अंगी असलेल्या रजनीकांत यांनी त्यावेळी बसमध्ये फेकलेल्या कॉईनचे किस्से आजही लोक आवडीने सांगतात.

कंडक्टरचा हिरो होताना.. 

काही वर्ष काम केल्यानंतर अभिनयासाठी त्यांनी प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, तेथे जाणे शक्य होत नव्हते. मात्र, राजबहादूर नावाच्या एका मित्राने केलेल्या मदतीमुळे त्यांनी चेन्नईच्या फिल्म इंस्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. येथे त्यांची 'एक दुजे के लिए' या चित्रपटाचे दिग्दर्शक के बालाचंद्र यांच्याशी ओळख झाली. बालाचंद्र यांनी रजनीकांत यांना तमिळ शिकण्याचा सल्ला दिला. यानुसार रजनीकांत यांनी तमिळचे शिक्षणही घेतले. त्यानंतर बालाचंद्र यांनीच त्यांना आपल्या 'अपूर्व रांगगल्ल' या चित्रपटात संधी दिली आणि रजनीकांत यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरूवात झाली. सुरूवातीला खलनायक, बलात्कारी तरूण आणि चोर अशा भूमिकांमध्ये दिसणाऱ्या रजनीकांत यांना पहिली प्रमुख भूमिका मिळाली ती 1977 तीसुद्धा तेलुगू चित्रपटात. यानंतर त्यांनी मागे वळून बघितलेच नाही. 1978मध्ये तर एकाच वर्षात कन्नड, तेलुगू आणि तामिळ या तीन भाषांमध्ये त्यांनी एकूण 20 चित्रपट केले.
    
1980 मध्ये आलेल्या 'बिल्ला डॉन' या चित्रपटामुळे त्यांची थेट अमिताभशी तुलना होऊ लागली त्यांना साउथचा अमिताभही म्हटले जावू लागले. त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीकडेही नंतर आपला मोर्चा वळवला. फरिश्ते, आतंक ही आतंक, जॉन जॉनी जनार्दन यांसह काही हिंदी चित्रपटांमधूनही त्यांनी साहाय्यक भूमिका केल्या. मात्र, तेथे प्रमुख भूमिका न मिळाल्याने त्यांनी परत साउथमध्येच जाण्याचा निर्णय घेतला. साउथमध्ये आल्यावर त्यांचा जो प्रवास सुरू झाला तो आजतागायत सुरूच आहे.  
  
माईल्ड स्टोन- 

साउथमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या रजनीकांत यांनी साउथच नव्हे तर भारतातील सर्वच स्टार्सना मागे टाकले. शिवाजी द बॉस या चित्रपटासाठी त्यांनी तब्बल 26 कोटी रूपये मानधन घेऊन नवा विक्रम प्रस्थापित केला. आशिया खंडात जॅकी चेन या अभिनेत्यानंतर सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत ते दुसऱ्या स्थानी आले. 
 

संबंधित बातम्या