सुशांतसिंहचे औषधोपचाराकडे दुर्लक्ष

अवित बगळे
बुधवार, 22 जुलै 2020

उपचार करणाऱ्या मानसोपचारतज्ज्ञांची पोलिसांना माहिती

अंधेरी

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी पोलिस वेगाने तपास करत आहेत. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी आतापर्यंत 30 ते 35 जणांचे जबाब नोंदवले आहेत. आतापर्यंतच्या तपासामधून सुशांतने नैराश्‍यातून आत्महत्या केल्याचे संकेत मिळत असून त्यादृष्टीने पोलिसांनी त्याच्यावर उपचार करणाऱ्या तीन मानसोपचार तज्ज्ञांचाही जबाब नोंदवला आहे. त्यामध्ये सुशांतसिंह नियमित औषधे घेत नव्हता, बरे वाटताच औषधे घेणे बंद करत होता, अशी माहिती डॉक्‍टरांनी दिल्याचे या प्रकरणाचा तपास करणारे वांद्रे पोलिस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी सांगितले आहे.
सुशांतवर उपचार करणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञांमध्ये मुंबईतील एका आघाडीच्या तज्ज्ञाचा समावेश आहे. या तज्ज्ञाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार सुशांत तणावपूर्ण आयुष्य जगत होता. त्याच्यावर उपचारही सुरू होते. मृत्युपूर्वी त्याने यासंदर्भात दोन ते तीन वेळा डॉक्‍टरांची भेट घेतली होती असे सांगण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास वांद्रे पोलिस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सुशांतसिंहच्या आत्महत्येमागे नैराश्‍य हे प्रमुख कारण असल्याचे संकेत मिळत असले, तरी नैराश्‍याचे ठोस कारण अजूनही समोर आलेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

डॉक्‍टर बदलले, औषधांचा कोर्सही पूर्ण केला नाही
बॉलीवूडमधील अभिनेते साधारणत: जास्त काळ एकाच डॉक्‍टरांच्या संपर्कात राहत नाहीत. ते डॉक्‍टर बदलत असतात. सुशांतसिंह 2019 पासून तीन डॉक्‍टरांच्या संपर्कात होता. तपासणीनंतर या डॉक्‍टरांनी दिलेली औषधेही सुशांतसिंह फार फार तर तीन महिने घ्यायचा आणि बरे वाटताच औषधे घेणे बंद करत असे, असे या डॉक्‍टरांनी पोलिसांना सांगितले आहे.

लॉकडाऊनमध्ये मोबाईलवरून उपचार
सुशांतवर उपचार करणाऱ्या एका डॉक्‍टरने तपासणीनंतर सुशांतला काही औषधांचा डोस दिला होता; मात्र केवळ दोन महिने सुशांतने औषध घेतल्याचे या डॉक्‍टरने पोलिसांना सांगितले; तर सुशांत लॉकडाऊनच्या काळात डॉक्‍टरांशी मोबाईलवरून संपर्क करायचा आणि डॉक्‍टरही त्याला मोबाईलवरून औषधे सुचवायचे, असेही डॉक्‍टरांनी नमूद केले.

किमान वर्षभर तरी उपचार आवश्‍यक
सुशांतवर उपचार करणाऱ्यांमध्ये एका ब्रिटिश डॉक्‍टरचा समावेश आहे. हे डॉक्‍टर मुंबईत प्रॅक्‍टिस करतात. त्यांच्या मते नैराश्‍याच्या आजाराची औषधे किमान एक वर्ष तरी घ्यावी लागतात. काही प्रकरणांत आयुष्यभरही औषधे घ्यावी लागतात; मात्र सुशांत अल्पकाळ औषधे घ्यायचा, बरे वाटायला लागले की औषधे घेणे बंद करायचा.

पोलिसांसमोरील आव्हान
सुशांतने नैराश्‍यातून आत्महत्या केली; मात्र कमी वयात एवढे यश मिळालेल्या या अभिनेत्याला नेमक्‍या कुठल्या कारणामुळे एवढे नैराश्‍य आले की त्याने टोकाचा निर्णय घेतला, याचा तपास करणे हे पोलिसांसाठी आव्हान असल्याचे याप्रकरणी तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या