'तारक मेहता'च्या 'गोगी'ला मिळताहेत जीवे मारण्याच्या धमक्या..

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

 याआधीही समयच्या घराजवळ येऊन गुंडांच्या टोळीने त्याला शिवीगाळ करण्याचा प्रकार घडला आहे. काही वेळा त्याला जीवे मारण्याच्या धमक्याही त्यांनी दिल्या आहेत.

मुंबई-  सब टीव्हीवर चालणाऱ्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील सगळीच पात्रे भन्नाट आहेत. तेवढीच त्यांची लोकप्रियताही आहे. मात्र, यातीलच गोगी नावाचं पात्र साकारणारा अभिनेता समय शाहला भररस्त्यात काही गुंडांनी दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यापूर्वीही दोन वेळा काही गुंडांनी त्याच्या घरासमोरच धमकी दिली असल्याचा खुलासा त्याने केला आहे. याप्रकरणी एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून याबाबत बोरिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 याआधीही समयच्या घराजवळ येऊन गुंडांच्या टोळीने त्याला शिवीगाळ करण्याचा प्रकार घडला आहे. काही वेळा त्याला जीवे मारण्याच्या धमक्याही त्यांनी दिल्या आहेत. मालिकेचे चित्रीकरण संपवून घरी परतणाऱ्या समयला काही गुंडांनी भररस्त्यातच थांबवले. त्यानंतर त्याला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही त्यांनी दिली. समयने पोलिसांशी फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी तेथून पळ काढला. मात्र, जाताना त्यांनी त्याला परत एकदा धमकी दिली.   

सातत्याने हा प्रकार का घडत आहे किंवा ते गुंड कोण आहेत, याची कोणतीही कल्पना नसल्याचे त्याने स्पष्ट केले. तो उभा असलेल्या जागेजवळील इमारतीचे काही सीसीटीव्ही फुटेज त्याने पोलिसांच्या ताब्यात सोपवले आहेत.

संबंधित बातम्या