'तारक मेहता का उल्टा चष्मा' लिहिणाऱ्या लेखकाने केली आत्महत्या

गोमंतक ऑनलाईन टीम
शुक्रवार, 4 डिसेंबर 2020

जगण्यापेक्षा मरणाच्याच बातम्यांनी भरलेल्या या वर्षाच्या अखेरीस आणखी एका कलाकाराने आपले जीवन संपविले आहे.

मुंबई- या वर्षभरात अनेक छोट्यामोठ्या कलाकारांनी आत्महत्या केल्या आहेत. जगण्यापेक्षा मरणाच्याच बातम्यांनी भरलेल्या या वर्षाच्या अखेरीस आणखी एका कलाकाराने आपले जीवन संपविले आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे सहलेखक अभिषेक मकवाना यांनी मागील आठवड्यातच आत्महत्या करून आपले जीवन संपविले आहे. कोरोनामुळे सर्व जगच ठप्प झाल्याने अनेकांना त्याची झळ बसली. यात कलाकारांचाही समावेश आहे. अनेकांची कामे बंद पडल्याने त्यांना उपासमारीस सामोरे जावे लागले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिषेक यांनी आपल्या आत्महत्येमागील कारण एका चिठ्ठीमध्ये लिहून ठेवले आहे. त्यात आर्थिक अडचणींमुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. यानंतर आता त्यांच्या कुटुंबाने यावर आवाज उठवत ब्लॅकमेल आणि सायबर धोक्यामुळे हे घडले असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मृत्यूनंतरही कुटुंबीयांना त्याच लोकांकडून पुन्हा फोन येत असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या नातेवाईकांना पैसे भरण्यास सांगितले जात आहे.

'मुंबई मिरर'ने दिलेल्या माहितीनुसार, चारकोप पोलिसांनी 27 नोव्हेंबरला अभिषेक यांनी आत्महत्या केल्यानंतर आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अभिषेक यांना आपण एका आर्थिक जाळ्यात अडकलो आहोत याची कल्पना आली होती, असे त्यांच्या भावाने यावेळी म्हटले. अभिषेक यांच्या मृत्यूची माहिती झाल्यावर संबंधितांकडून पुन्हा फोन यायला सुरूवात झाली. यात त्यांची भाषाही अतिशय शिवराळ होती.
 

संबंधित बातम्या