उत्कंठावर्धक प्रेमकथा

प्रतिनिधी
सोमवार, 17 ऑगस्ट 2020

अभिनेता विद्युत जामवाल मार्शल आर्टसमध्ये तरबेज आहे आणि त्याची कमांडो, जंगली अशा काही चित्रपटातील ॲक्‍शन सीन्स डोळ्यांचे पारणे फेडणारे आहेत; परंतु ‘खुदा हाफीज’ या चित्रपटामध्ये त्याने काहीशी वेगळी भूमिका केली आहे आणि या भूमिकेला त्याने योग्य न्यायदेखील दिला आहे. फारूख कबीरने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. 

अभिनेता विद्युत जामवाल मार्शल आर्टसमध्ये तरबेज आहे आणि त्याची कमांडो, जंगली अशा काही चित्रपटातील ॲक्‍शन सीन्स डोळ्यांचे पारणे फेडणारे आहेत; परंतु ‘खुदा हाफीज’ या चित्रपटामध्ये त्याने काहीशी वेगळी भूमिका केली आहे आणि या भूमिकेला त्याने योग्य न्यायदेखील दिला आहे. फारूख कबीरने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. 

एका सत्य घटनेवर आधारित ‘खुदा हाफीज’ आता डिस्नी हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे. समीर चौधरी (विद्युत जामवाल) आणि नर्गीस चौधरी (शिवालिका ओबेरॉय) हे या चित्रपटात पती आणि पत्नी आहेत. ते दोघेही एका कंनपनीत कामाला असतात. अचानक आर्थिक मंदीचा फटका बसतो. दोघांना कामावरून डच्चू देण्यात येतो. या परिस्थितीतून बाहेर पडावे आणि अधिकाधिक पैसे कमवावेत याकरिता ते दोघेही परदेशात जाण्याचा निर्णय घेतात. त्याकरिता एका एजंटला भेटतात आणि त्याच्यामार्फत नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करतात. पहिल्यांदा नोकरी मिळते ती नर्गीसला. खरं तर समीर तिला एकटीला तेथे पाठविण्यास तयार नसतो; परंतु हातात आलेली संधी जाऊ नये याकरिता तो तयार होतो. नर्गीस लखनौहून परदेशात जाण्यास निघते. तेथे ती पोहोचते आणि नंतर अनेक वेगवेगळ्या घडामोडी घडतात. तेथे गेल्यानंतर नर्गीस बेपत्ता होते आणि मग तिला शोधण्यासाठी समीरदेखील तेथे जातो. त्याची भेट टॅक्‍सीचालक (अन्नू कपूर) बरोबर होते. मग तो टॅक्‍सीचालक आणि समीर नर्गीसचा शोध घेतात का... नर्गीस बेपत्ता झालेली असते का... तिचे कोणी अपहरण केले असते का... या प्रश्‍नांची उत्तरे मिळविण्यासाठी ‘खुदा हाफीज’ पाहावा लागेल.

हा चित्रपट एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या नवपरिणित दाम्पत्याची आहे. विद्युत जामवालने काहीसा हतबल आणि असहाय अशा पतीची भूमिका दमदार साकारली आहे. शिवालिका ओबेरॉयदेखील नर्गीसच्या भूमिकेत छान दिसली आहे. संपूर्ण चित्रपटात अधिक भाव खाऊन गेले आहेत अन्नू कपूर. या चित्रपटातील उस्मान अली या टॅक्‍सीचालकाची भूमिका त्यांनी खुमासदार साकारली आहे. शिव पंडित, आहना कुमरा आदी कलाकारांनी चांगलाच हातभार या चित्रपटाला लावला आहे. मात्र कथेचा जीव छोटा आहे आणि दिग्दर्शकाने नको तेवढा चित्रपट खेचला आहे. संगीत, सिनेमॅटोग्राफी अगदी उत्तम आहे. हरवलेल्या प्रेमाची उत्कंठावर्धक कथा आहे. 

संबंधित बातम्या