पॉर्न स्टारची कशी झाली सुपरस्टार 'शकीला'?; रिचा चढ्ढा प्रमुख भूमिकेत असलेल्या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित

दैनिक गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 16 डिसेंबर 2020

या चित्रपटात रिचाने एका पॉर्न स्टारची भूमिका लिलया पेलली असून एक साधारण महिला चुकीच्या व्यवसायाच्या जाळ्यात कशी अडकत जाते, यावर कटाक्ष टाकण्यात आला आहे. 

मुंबई- आपल्या बहुमुखी अभिनयासाठी बॉलिवूडच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध असलेली अभिनेत्री रिचा चढ्ढा नवीन चित्रपट घेऊन रसिकांच्या भेटीला येत आहे. एका पॉर्नस्टारच्या आयुष्यावर आधारित 'शकीला' या चित्रपटाच्या माध्यमातून ती पडद्यावर येणार असून या चित्रपटाचे ट्रेलर आज प्रदर्शित झाले आहे.  
 
या चित्रपटात रिचाने एका पॉर्न स्टारची भूमिका लिलया पेलली असून ग्रामीण भागातील एक साधारण महिला चुकीच्या व्यवसायाच्या जाळ्यात कशी अडकत जाते, यावर कटाक्ष टाकण्यात आला आहे. तिच्यावर होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासामुळे तिला नैराश्याचा सामना करावा लागतो. मात्र, यानंतर पुन्हा नव्या उमेदीने पुढे जात तिच्या सुपरस्टार होण्याच्या प्रवासाचा आढावा चित्रपटाद्वारे घेण्यात आला आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठी आणि रिचा चढ्ढा यांच्या मुख्य भूमिका असून एका पॉर्न स्टारचा सुपरस्टार होतानाचा प्रवास चित्रपटाच्या माध्यमातून अधोरेखित केला आहे.

आज सर्वच समाज माध्यमांवर या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असू एका अभिनेत्याच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी दिसणार आहे. झी म्युझिक कंपनीने हा ट्रेलर तयार केला असून त्यांनीच यु-ट्युबवर अपलोडही केला आहे. शकीलाचे कथानक टॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आयुष्यावर आधारलेला आहे. 

 वयाच्या 16व्या वर्षीच चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणाऱ्या शकीलाने २५०पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. ९०दीच्या दशकात ती तिच्या कारकिर्दिच्या अत्यंत टोकाला होती. अनेक बड्या कलाकारांची शकिलाबरोबर काम करायची सुप्त इच्छा होती. शकीला या सिनेमाचे दिग्दर्शन  इंद्रजित लंकेश यांनी केले असून या चित्रपटाच्या ट्रेलरला समाज माध्यमांवर अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. हा सिनेमा म्हणजे डर्टी पिक्चर टू असल्याचाही अभिप्राय अनेकांनी नोंदवला आहे. 
 

संबंधित बातम्या