'राजकपूरना' समजून घेणे गोव्यातल्या रसिकांसाठी पर्वणीच

सिनेमा संदर्भात ‘ईएसजी’ वर्षभर चालवत असलेला एकमेव उपक्रम म्हणजे, त्यांच्या ‘सिनेफाईल फिल्म क्लब’ मार्फत दर आठवड्यात एकदा दाखवण्यात येणारे चित्रपट.
Raaj kapoor
Raaj kapoor Dainik Gomantak

सिनेमा संदर्भात ‘ईएसजी’ वर्षभर चालवत असलेला एकमेव उपक्रम म्हणजे, त्यांच्या ‘सिनेफाईल फिल्म क्लब’ मार्फत दर आठवड्यात एकदा दाखवण्यात येणारे चित्रपट. चित्रपट समीक्षक सचिन चाटे हे या उपक्रमाचे संचालन करतात. या उपक्रमाचा भाग म्हणून या क्लबने यापूर्वी सई परांजपे, गिरीश कासारवल्ली, सुमित्रा भावे यासारख्या प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शकांना आमंत्रित केले आहे.

या चित्रपट दिग्दर्शकांनी त्यांच्या चित्रपटांबद्दल, रसिकांशी विचारांचे आदानप्रदान केले आहे. 'सत्यजीत रे' आणि 'मृणाल सेन' यांच्या चित्रपटांतून प्रमुख भूमिका केलेले दिग्गज अभिनेते धृतिमान चटर्जी तसेच लेखक, संकलक अपूर्व असरानी यांच्या उपस्थितीत ‘अलीगढ’ सारखे चित्रपटही या क्लबने आपल्या उपक्रमाद्वारे दाखवले आहेत.

फिल्म क्लबने संगीतकार मदन मोहन आणि गीतकार शैलेंद्र यांच्या संबंधित ‘रेट्रास्पेक्टीव्ह’ कार्यक्रमाचेही आयोजन केले आहे. काही वर्षांपूर्वी प्रख्यात चित्रपट समीक्षक राजीव मसंद यांना घेऊन या फिल्म क्लबने ‘फिल्म जर्नालिझम’ कार्यशाळेचे तसेच पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटच्या सहयोगाने ‘चित्रपट आस्वाद’ कार्यशाळेचे आयोजनही केले होते.

आज 12 मे आणि उद्या 13 मे असे दोन दिवस ‘सिनेफाईल फिल्म क्लब’ विख्यात सिनेमा दिग्दर्शक राजकपूर यांनी दिग्दर्शित केलेल्या दोन महत्त्वाच्या चित्रपटांचे (Movie) विशेष प्रदर्शन ‘ईएसजी’च्या मॅकिनेझ पॅलेस-1 या चित्रपटगृहात घडवून आणत आहे.

आज 12 मे रोजी ‘मेरा नाम जोकर’ हा चित्रपट दाखवण्यात येईल तर उद्या 13 मे रोजी ‘श्री 420’ हा चित्रपट दाखवण्यात येईल. ‘मेरा नाम जोकर’ पासून राजकपूरना त्यांच्या प्रत्येक सिनेमासाठी दिग्दर्शन सहाय्य करणारे व नंतर चित्रपट दिग्दर्शक म्हणून हिंदी सिनेमासृष्टीत स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण करणारे दिग्दर्शक राहूल खैल हे 13 मे रोजी या कार्यक्रमाला हजर असतील.

राजकपूर यांच्यासारख्या हिंदी चित्रपटसृष्टीला मोलाचे योगदान देणाऱ्या चित्रपट दिग्दर्शकासोबत काम करताना त्यांना जे अनुभव आले त्याबद्दल ते या कार्यक्रमात बोलतील.

‘श्री 420’ आणि ‘मेरा नाम जोकर’ हे दोन्ही चित्रपट आज अभिजात चित्रपट म्हणून गणले जात. केवळ हिंदी चित्रपटसृष्टीत नव्हे तर जागतिक पातळीवर या सिनेमांनी आपले स्थान निश्‍चित केले आहे.

या दोन्ही चित्रपटांत सामान्य माणसाची सुखदुःखे, त्याची भाबडी स्वप्ने यांना राजकपूर यांनी कलात्मकतेने सादर केले आहे. त्यापैकी ‘श्री 420’ हा चित्रपट तिकिटबारीवर यशस्वी ठरला होता पण ‘मेरा नाम जोकर’ ला अफाट अपयश पहावे लागले.

पण त्यानंतर भविष्यकाळात हाच चित्रपट उत्कृष्ट कलात्मक चित्रपट म्हणून चित्रपट समीक्षकांच्या आणि रसिकांच्या मनात स्थान निर्माण करणारा ठरला. या चित्रपटाच्या बाबतीत राजकपूर (Raj Kapoor) काळाच्या पुढे होते हेच नंतर सिध्द झाले. एका सामान्य चित्रपट रसिकाला तसेच चित्रपट अभ्यासकांना हे दोन्ही चित्रपट त्यातील दिग्दर्शकीय गुणवत्तेमुळे आजही भावतात.

राहुल खैलसारख्या चित्रपट दिग्दर्शकांबरोबर संवाद साधून राजकपूर यांना आणि त्यांच्या चित्रपट प्रभुत्वाला समजून घेणे ही गोव्यातल्या (Goa) चित्रपट रसिकांसाठी आणि अभ्यासकांसाठी पर्वणी असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com