११६ वर्ष दुर्लक्षित राहिलेल्या हिराबाईंच्या ‘जयद्रथ विडंबन'' नाटकाचा फोंड्यात पहिला प्रयोग

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 23 डिसेंबर 2020

रंगमंच मिळू न शकलेल्या हिराबाईंच्या नाटकाला फोंड्याच्या विजयकुमार ट्रॅव्हलिंग बॉक्स थिएटर या कंपनीचे मालक विजयकुमार नाईक यांनी रंगभूमीवर आणण्याचा विडा उचलला आहे. ११६ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर ‘संगीत जयद्रथ विडंबन'' म्हणून विजयकुमार नाईक येत्या १४ रोजी रंगमंचावर घेऊन येत आहेत.  

पणजी-  मराठी नाट्यसंस्कृतीत महिला नाटककार म्हणून मूळ पेडणे व सावंतवाडीच्या हिराबाई पेडणेकर यांचे नाव घेतले जाते. हिराबाई यांनी लिहिलेले ‘जयद्रथ विडंबन'' हे नाटक रंगमंचावर येण्याचे राहून गेले. परंतु या नाटकाची संहिता वाचून अनेकांनी त्यांच्या लिखानाचे कौतुक केले. रंगमंच मिळू न शकलेल्या हिराबाईंच्या नाटकाला फोंड्याच्या विजयकुमार ट्रॅव्हलिंग बॉक्स थिएटर या कंपनीचे मालक विजयकुमार नाईक यांनी रंगभूमीवर आणण्याचा विडा उचलला आहे. ११६ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर ‘संगीत जयद्रथ विडंबन'' म्हणून विजयकुमार नाईक येत्या १४ रोजी रंगमंचावर घेऊन येत आहेत.  

स्वातंत्र्यपूर्व काळात असलेली समाजव्यवस्थेचा हिराबाई यांच्या नाटकांना फटका बसला. सावंतवाडीत त्यांचा १८८६ मध्ये जन्म झाला असला तरी पुढील बालपण, शिक्षण हे मुंबईच्या गिरगावात गेले. घरातच संगीताचा सहवास लाभल्याने त्यांनी भास्करबुवा बखले यांच्याकडे संगीताचे धडे घेतले. गोविंद बल्लाळ देवल यांच्या प्रेरणेने त्यांना मराठी नाटकाची आवड वाढू लागली. त्यामुळे त्यांनी वयाच्या विसाव्या वर्षी १९०४ मध्ये ‘जयद्रथ विडबंन'' हे नाटक लिहून पूर्ण केले. नाट्य क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळींनी नाटकाची संहिता वाचली आणि त्यांच्या लिखाणाचे कौतुक केले. पण नाटक काही रंगमंचावर येऊ शकले नाही. त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी लिहिलेले ‘संगीत दामिनी‘ हे नाटक मात्र रंगमंचावर आले. एका स्त्रीने लिहिलेल्या या नाटकाच्या सादरीकरणामुळे मराठी रंगभूमीच्या इतिहासात एक ऐतिहासिक नोंद झाली. त्याकाळी नाटक सादरीकरणात दबदबा असलेल्या किर्लोस्कर मंडळींनी हे नाटक सादर करावे, अशी हिराबाईंची इच्छा होती. पण ती काही सत्यात उतरली नाही. ‘ललित कलादर्शन''ने ‘दामिनी‘ हे ‘संगीत दामिनी‘ या नावाने नाटक रंगभूमीवर आणले आणि त्यानंतर पुढे चारवर्षे या नाटकाने रंगभूमी गाजविली, असा इतिहास आहे. 

हिराबाई पेडणेकर यांचे रंगमंचावर येऊ न शकलेले पण त्याकाळी वाहव्वा मिळविलेल्या ‘जयद्रथ विडंबन'' या पहिल्या नाटकाचा आता विजयकुमार नाईक यांनी पडदा उघडण्याचे ठरविले आहे. 

येत्या २४ रोजी फोंड्याच्या राजीव कला मंदिरात, सायंकाळी ६.३० वा. या नाटकाचा प्रयोग विनामुल्य होणार आहे. नाटकातील पदांना अजय नाईक यांनी स्वरबद्ध केले आहे. अजय फोंडेकर यांनी नेपथ्याची, अनिकेत नाईकने रंगभूषाची बाजू सांभाळली आहे. केदार मिस्त्री, शिवराज मळीक, पुरुषोत्तम म्हार्दोळकर, धीरज नाईक, आदर्श गोवेकर, रोहीत सतरकर, दिव्या गावस व तस्लिमा मयेकर यांच्या भूमिका आहेत.
 

संबंधित बातम्या