`वाईफ ऑफ स्पाय`आज 51 व्या इफ्फीला निरोप देणार

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 24 जानेवारी 2021

`वाईफ ऑफ स्पाय` हा जपानी सिनेमा मास्क घालून सामाजिक अंतराचे पालन करीत सॅनिटायजर घेऊन गोव्यात पार पाडलेल्या 51 व्या इफ्फीला आज निरोप देणार आहे.

पणजी :  `वाईफ ऑफ स्पाय` हा जपानी सिनेमा मास्क घालून सामाजिक अंतराचे पालन करीत सॅनिटायजर घेऊन गोव्यात पार पाडलेल्या 51 व्या इफ्फीला आज निरोप देणार आहे.

निरोपाचा पडदा पडण्याआधी स्पर्धात्मक तसेच अन्य वर्गवारीतील बक्षिसपात्र सिनेमांची निवड घोषित करून पुरस्कार वितरणाचा सोहळा होणार आहे. 
अभिनेते विश्वजित चटर्जी यांनी भारतीय व्यक्तिमत्त्व म्हणून इफ्फीचा जीवनगौरव घोषित करण्यात आला आहे. केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यावेळी उपस्थित राहातील. ज्येष्ठ अभिनेत्री झिनत अमान, केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो इफ्फीच्या समारोप सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत.

गेली सोळा वर्षे नियमितपणे नोव्हेंबर महिन्यात राज्यात होणाऱ्या भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे इफ्फीचे वेळापत्रक कोविड 19 मुळे गेल्यावर्षी बदलावे लागले. इफ्फी यंदा निर्बंधितपणे आभासी व्यासपीठांच्या आधारे सुमारे अडीच हजार प्रतिनिधींच्या उपस्थितीत गेल्या 16 जानेवारीस सुरू झाला. मागील आठ दिवसात इफ्फीत जवळजवळ 200 चित्रपट दाखवण्यात आले. मेहरुन्निसा तसेच अन्य कांही चित्रपटांचे शोज मागणीस्तव काल पुन्हा झाले. मास्क घालून सतत आठ दिवस सिनेमा पाहाण्याचा आस्वाद सिनेप्रेमीनी घेतला. दरवर्षीच्या तुलनेत विदेशी प्रतिनिधींची संख्या कमी होती तसेच बॉलीवूडमधील ज्येष्ठ, कनिष्ठांनी इफ्फीपासून दूर राहात आभासी व्यासपीठांतून इफ्फीला दीर्घायू चिंतिले. 

संबंधित बातम्या