काय सांगताय.... देवीच्या सजावटीला एक कोटीच्या नोटा?

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

तेलंगणाची देवी परमेश्वरीच्या मंदिरात फुलांच्या आकाराच्या नोटांनी देवीचा साज-श्रृंगार करण्यात आला होता. एवढ्या प्रचंड प्रमाणात नोटांचा वापर करून त्या देवीला अर्पण केल्याची बातमी सर्वत्र चांगलीच व्हायरल होत आहे.     

हैदराबाद- नवनवीन धार्मिक विधी, प्रथा, परंपरांसाठी दाक्षिणात्य राज्य अत्यंत प्रसिद्ध आहेत. एखादा देव किंवा देवीप्रति असलेल्या श्रद्धेपोटी काहीही करण्याची त्यांची तयारी असते. असेच काहीसे दृश्य तेलंगणा राज्यात बघायला मिळाले. राज्यातील एका मंदिरात दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर देवीचा एक कोटी रूपयांच्या नोटांनी श्रृंगार करण्यात आला होता. तेलंगणाची देवी परमेश्वरीच्या मंदिरात फुलांच्या आकाराच्या नोटांनी देवीचा साज-श्रृंगार करण्यात आला होता. एवढ्या प्रचंड प्रमाणात नोटांचा वापर करून त्या देवीला अर्पण केल्याची बातमी सर्वत्र चांगलीच व्हायरल होत आहे.     

एनडीटीव्हीवर प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टनुसार, परमेश्वरी देवीचा नोटांनी पूर्ण श्रृंगार करण्यात आला होता. फूलांपासून ते फूलांच्या मालिकेपासून सर्व काही नोटांनी झाकोळून टाकले होते. मंदिरात अन्य देवी-देवतांनाही नोटांचे हार अर्पण करण्यात आले होते.

'मागील वर्षी तर मंदिरात देवीच्या पूजेत तीन कोटींपेक्षा जास्त नोटांचा वापर करण्यात आला होता. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींमुळे यंदा कमी नोटा अर्पण करण्यात आल्या. या नोटा स्थानिक लोक पूजेसाठी देतात. पूजा संपन्न झाल्यानंतर या नोटा त्यांना परत केल्या जातात. या वर्षी देवीच्या सजावटीसाठी 40-50 लोकांनी पैसे दिले होते', अशी माहिती मंदिराचे कोषाध्यक्ष पी रामू यांनी दिली. 

संबंधित बातम्या