म्हापशातील बसस्थानकावर लवकरच साधन-सुविधा 

Dainik Gomantak
सोमवार, 20 जानेवारी 2020

गोवा राज्य साधन सुविधा महामंडळातर्फे तीन3 कोटी रुपये खर्च करून तात्पुरती सोय या धर्तीवर अंतरराज्यीय बसेसना थांबा देण्यासाठी साधन सुविधा उभारण्यात येणार आहेत.

शमा टोपले
म्हापसा

म्हापसा येथील नियोजित बसस्थानकाच्या जागी हंगामी तत्त्वावर साधन-सुविधा उभारण्याच्या कामाला सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. गोवा राज्य साधन सुविधा महामंडळातर्फे तीन3 कोटी रुपये खर्च करून तात्पुरती सोय या धर्तीवर अंतरराज्यीय बसेसना थांबा देण्यासाठी साधन सुविधा उभारण्यात येणार आहेत.
म्हापशाचे आमदार व गोवा राज्य साधन सुविधा महामंडळाचे उपाध्यक्ष जोसुआ डिसोझा यांनी शहराच्या प्रवेशद्वाराजवळ बसस्थानकासाठी राज्य सरकारच्या वाहतूक खात्याने वीस हजार चौरस मीटर जागा भू संपादन करून ठेवली होती. या ठिकाणी काही बसचालक व ट्रक चालक आपली वाहने आणून पार्कींग करुन ठेवत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ प्रदूषण होते. तसेच पावसाळ्यात या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य होत असल्यामुळे अंतरराज्यीय बस वाहतूक करणारे वाहतूकवाले आपल्या प्रवाशांना या ठिकाणी थांबा देऊन उतरतात. यासाठी आमदार जोसुआ डिसोझा यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याजवळ पाठपुरवठा करून तात्पुरती सोय म्हणून गोवा राज्य साधन सुविधा महामंडळातर्फे तीन कोटी रुपयांचा निधी या कामासाठी मंजूर करून घेतला आहे.
तीन कोटी रुपयांतून तात्पुरती सोय कशाप्रकारे करता येईल, यासाठी आज संध्याकाळी आमदार जोसुआ डिसोझा यांनी नियोजित बसस्थानाचे सल्लागार राहुल देशपांडे, नगराध्यक्ष रायन ब्रागांझा, माजी नगराध्यक्ष संदीप फळारी, नगरसेवक तुषार टोपले, रोहन कवळेकर, फ्रॅंकी कार्व्हालो, वाहतूक खात्याचे अधिकारी, कदंबा महामंडळाचे अधिकारी, गोवा राज्य साधन सुविधा महामंडळाचे अधिकारी तसेच म्हापसा भाजप मंडळाचे सरचिटणीस योगेश खेडेकर व यशवंत गवंडळकर उपस्थित होते.
या नियोजित वाहतूक खात्याच्या बसस्थानकावर साधन सुविधा उभारण्याचे काम गोवा राज्य साधन सुविधा मंडळातर्फे करण्यात येणार आहे. २० हजार चौरस मीटर जागेपैकी ८ ते १० हजार चौरस मीटर जागेवर पेव्हर्स घालण्यात येईल. तसेच अंतरराज्य बसेसना प्रवेश व बाहेर जाण्यासाठी दोन गेट उभारण्यात येईल. लोकांना बससाठी थांबण्यासाठी शेड, एक पदपाथ, विद्युत रोषणाई व शौचालय उभारण्यात येणार आहे. जागेच्या तिन्ही बाजूंना लोखंडी कुंपण उभारण्यात येणार आहे. या सर्व नियोजित कामासंदर्भात बसस्थानकाचे सल्लागार राहुल देशपांडे यांनी आमदार डिसोझा व इतर अधिकाऱ्यांना सविस्तर माहिती दिली. या तीन कोटी रुपयांचा विनियोग कशा प्रकारे करता येईल, याचा सविस्तर अहवाल येत्या दोन दिवसांत गोवा राज्य साधन सुविधा मंडळाला देण्यात येईल व त्यानंतर या महामंडळातर्फे लघुनिविदा काढून जिल्हा पंचायत निवडणुकीच्या आचारसंहितापूर्वी या कामाचा प्रारंभ करण्याचे ठरले.

आमदार डिसोझा यांच्याकडून
नियोजित जागेची पाहणी...

या नियोजित जागेची पहाणी केल्यानंतर आमदार जोसुआ डिसोझा यांनी पत्रकारांना सांगितले, नियोजित बसस्थानकाच्या कामासाठी ३१० कोटी रुपयांची गरज आहे. तर या नियोजित मास्टर प्लॅनद्वारे पहिल्या टप्प्यातील कामासाठी २० कोटी रुपयांची गरज आहे. मागच्या अनेक वर्षापासून या नियोजित बसस्थानकावर धूळ प्रदूषण व पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य निर्माण होते. या प्रकारामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. यासाठी आपण मुख्यमंत्र्यांशी बोलून नियोजित बसस्थानकावर बसस्थानकाचे पूर्णपणे काम सुरू होईपर्यंत तात्पुरती सोय म्हणून ३ कोटी रुपये खर्चून गोवा राज्य साधन सुविधा महामंडळ या ठिकाणी काही सुविधा उभारणार आहेत. दहा हजार चौरस मीटर जागेवर पेव्हर्स घालण्यात येईल. तसेच अन्य सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

संबंधित बातम्या